लहानपणापासूनच मला सतत आरोपीच्या पिंजर्यात उभे रहाण्याची सवय जडली आहे. मला आजपर्यंत अनेकांनी अनेकवेळा निरनिराळ्या आरोपांखाली आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. आणि गंमत म्हणजे जे मला आरोपीच्या पिंजर्यात उभे करतात तेच न्यायाधीश होऊन न्याय निवाडा करतात व मला निरनिराळ्या शिक्षा फर्मावतात.
मी आधीच सांगतो की मी कमी बुद्धी असलेला व अत्यंत सामान्य पर्सनॅलिटी असलेला एक अती सामान्य माणूस आहे. माझी पर्सनॅलिटी ‘बावळट’ या कॅटेगरीतली आहे. बुद्धीने म्हणाल तर शाळेत असताना दर वर्षी कसेतरी काठावर पास होत वरच्या वर्गात चढत गेलो. 36 टक्के मार्क मिळवून 10 वी व 40 टक्के मार्क मिळवून 12 वी पास झालो. पुढे ‘थर्ड क्लास बी.कॉम.’ अशी पदवी मिळवली व गावातील एका छोट्या बँकेत ‘टेम्पररी क्लार्क’ अशी सामान्य नोकरी मिळवली, ती सुद्धा वशिल्याने. थोडक्यात माझे आयुष्य तसे फालतुच आहे. याचा माझ्या वडिलांना फार राग यायचा व ते मला सारखे घालून पाडून बोलायचे, सतत अपमान करायचे. आता वडीलच असे करतात म्हटल्यावर बाकीचे काय गप्प बसणार? मी बावळट आहे. मी मूर्ख आहे. मला अजीबात अक्कल नाही. माझ्या तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही. मला साध्या साध्या गोष्टी सुद्धा कळत नाहीत. मला हे येत नाही, ते येत नाही असे आरोप सतत माझ्यावर होत आले. मग या साठी मला ‘याला घरातून हाकलून द्या. याच्या चार मुस्कटात मारा. याच्याकडे लक्ष देऊ नका. याला रात्री उपाशी ठेवा’ अशा प्रकारच्या शिक्षा मला देऊन झाल्या. ‘याला उपाशी ठेवा’ ही माझ्या वडिलांची सर्वात आवडती शिक्षा! त्यामूळे कित्येक रात्री मी पाणी पिऊन उपाशी पोटी काढल्या आहेत.
अर्थात याला कारण आहे माझा स्वभाव. एखादी गोष्ट जोपर्यंत मला पटत नाही तो पर्यंत मला ती स्विकारता येत नाही. आता हेच बघाना. गणितामधे 1 अधीक 1 बरोबर 2 हे सर्वांनाच माहीत आहे. पण 1 अधिक 1 हे 2 नच कां, 3 का नाही किंवा 0 का नाही? इथेच गणिताची गोची झाली. इंग्रजीमधे I am आणि We are. I नंतर are का नाही किंवा we नंतर am का नाही? किंवा दोन्ही नंतर am किंवा are पैकी एकच का नाही? म्हणून इंग्रजीत दांडी. मराठीचे पण तसेच. आणि व पाणी. आणितला ण र्हस्व तर पाणीमधला णी दीर्घ असे कां? दोन्ही र्हस्व किंवा दीर्घ का नाही? त्यामूळे मराठीतपण बोर्या वाजलेला. लकांना माझे प्रश्न ‘स्टुपिड’ वाटायचे म्हणून मी मूर्ख! असो.
बँकेमधे मी कामाला लागलो ते क्रेडिट सेक्शनला! बँकेमधे जे ड्राफ्ट येतात ते त्या त्या अकाऊंटला जमा करायचे माझे काम. कुलकर्णी हे माझे बॉस होते. ते बँकेचे सिनियर ऑफीसर होते. गोगटे साहेब हे आमच्या बँकेचे मॅनेजर होते. माझा त्यांच्याशी फारसा संबंध यायचा नाही. ड्राफ्ट आला की मग त्याचे एक व्हाऊचर बनवून व त्यावर माझ्या व कुलकर्णी साहेबांच्या सह्या घेऊन तो पास झाला की मगच त्या ड्राफ्टची रक्कम त्या अकाऊंटला क्रेडीट व्हायची. आणि इथेच माझी व कुलकर्णी साहेबांची झकाझकी चालायची. कारण व्हाऊचर बनवताना माझा नेहमी गोंधळ उडायचा. लिखीत रक्कम व अक्षरी रक्कम यात नेहमी घोळ व्हायचा. लिखित रक्कम चार लाख असेल तर अक्षरी रक्कम 40 हजार असायची किंवा याच्या उलटे असायचे. त्यामूळे मला सारखी कुलकर्णी साहेबांची बोलणी खावी लागायची. ‘मी आहे म्हणून तु टिकला आहेस नाहीतर तुझी केव्हाच हकालपट्टी झाली असती’ हे कुलकर्णी साहेबांचे फार आवडते वाक्य. बँकेतील लोक कुलकर्णी साहेबांना फार घाबरायचे. तसा त्यांचा दराराच होता. त्यांच्यामूळे पूर्वी तिन चार लोकांची हकालपट्टी झाल्याचे ऐकीवात होते. गोगटे साहेब दोन वर्षांनी रिटायर होणार होते व त्यांच्या जागी कुलकर्णी साहेबांची वर्णी लागायची दाट शक्यता होती.
मी नोकरीला लागून दोन एक महिने झाले असतील. एके दिवशी बँकेत सुटाबुटातला पॉश माणूस आला. तो कुलकर्णी साहेबांचा मित्र होता. त्याने त्याच्या कंपनीच्या नावाने बँकेत अकाऊंट उघडले. कुलकर्णी साहेबांनी सगळी मदत केली. त्याने दहा हजार रुपयांचा एक ड्राफ्ट भरला. कुलकर्णी साहेबांनी तो ड्राफ्ट ताबडतोब पास करून ती रक्कम त्यांच्या अकाऊंटवर क्रेडीट करायला सांगीतली. पार्टीला गरज होती म्हणून त्यांनी आठ हजार रुपये ताबडतोब काढून पण घेतले. त्यानंतर त्या पार्टिच्या नांवाने रोज ड्राफ्ट जमा होऊ लागले. आधी ते 5 हजार, 10 हजार अशा किरकोळ रकमांचे असायचे पण पुढे पुढे रकमा वाढत वाढत लाखांच्यावर गेल्या. कुलकर्णी साहेबांचे या ड्राफ्टवर खास लक्ष असयचे. ड्राफ्ट बँकेत भरला गेला की तो ताबडतोब क्रेडीट व्हायला हवा अशा मला त्यांच्या ‘स्टिक्ट इन्स्ट्रक्शन’ होत्या. ड्राफ्ट क्रेडिट झाल्यावर ताबडतोब त्याचे पैसे काढले जातात हे माझ्या धान्यात आले होते. पण का कुणासठाऊक पहिल्यापासुनच हे ड्राफ्टबद्दल मला कसला तरी संशय वाटत होता. यात काहीतरी गडबड आहे असे वाटत होते. मी एक दोन वेळेला ही गोष्ट कुलकर्णी साहेबांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला पण उलट त्यांनीच मला झापडले.
आता त्या पार्टीच्या नावाचा 22 लाख रुपयांचा ड्राफ्ट माझ्याकडे आला व त्यात मला खाडाखोड आढळली. मी तो ड्राफ्ट पास न करता बाजुला ठेऊन दिला. मधे दोन तिन दिवस असेच गेले. त्यामधे एक सुट्टीचा दिवस पण होता. तिसर्या दिवशी सकाळी सकाळीच कुलकर्णी साहेब माझ्याकडे आले ते रागाने लालबुंद होऊनच. मी ताबडतोब तो 22 लाखांचा ड्राफ्ट पास करून क्रेडीट का केला नाही म्हणून मलाच झापडु लागले. मी पण वैतागलो होतो. ‘त्या ड्राफ्टमधे काहीतरी गडबड आहे. मी तो पास करणार नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्हीच तो पास करा!’ मी कुलकर्णी साहेबांनात सांगीतले. हे ऐकुन ते चांगलेच खवळले. ‘तु स्वतःला काय समजतोस रे भडव्या! थांब मी आता तुला चांगलाच इंगा दाखवतो.’ असे बडबडत ते तडक गोगटे साहेबांच्या केबीनमधेच घुसले. आज पहिल्यांदाच कुलकर्णी साहेब मला ‘भडव्या’ म्हणाले होते. आता माझे काही खरे नाही, माझी आता गच्छंती होणार हे आता अटळ आहे याची सर्वांना जाणीव झाली होती. खाटकाकडे नेणार्या कोकराकडे लोक जसे सहानुभूतिने बघत असतात त्याच नजरेने आता माझे सहकारी माझ्याकडे बघत होते.
थोड्याच वेळात कुलकर्णी साहेब केबीनंधून बाहेर आले ते विजयी हास्य घेऊनच. थोड्याच वेळात मला गोगटे साहेबांचे बोलावणे आले. ते पण बरेच रागावलेले दिसत होते. ‘ही ड्राफ्टची काय भानगड आहे?’ त्यांनी रागानेच विचारले. मी काय ती भानगड त्यांना सांगीतली. ‘तो ड्राफ्ट घेऊन या!’ ते मला म्हणाले. मी तो 22 लाखांचा ड्राफ्ट घेऊन त्यांचोकडे गेलो व मला आलेल्या शंका त्यांना बोलुन दाखवल्या. ‘जरा थांब’ म्हणून त्यांनी कोणालातरी फोन केला. फोनवर त्यांचा मित्रच असावा. कारण आधी ते हसुन बोलत होते पण ड्राफ्टचा विषय काढताच ते एकदम गंभीर झाले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमू लागले. त्यांनी मला केबीनमधे थांबायला सांगीतले व भराभरा कुठे कुठे फोन करायला सुरवात केली. ते फोनवर अगदी खालच्या आवाजात बोलत होते. त्यांनी मला बाहेर जाऊन शांतपणे बसायला सांगीतले. काही वेळातच एक पोलिस व्हॅन बँकेसमोर येऊन उभी राहिली. त्यातुन एक पोलिस इन्स्पेक्टर, चार पोलिस व टाय लावलेले एक गृहस्थ उतरले. सगळेजण बँकेत शिरले व पोलिस इन्स्पेक्टर व टाय लावलेले गृहस्थ गोगटे साहेबांच्या केबीनमध्ये शिरले. थोड्याच वेळात गोगटे साहेबांनी बँकेचे कामकाज बंद करायला व बँकेचे दरवाजे बंद करायला सांगीतले व ‘मी सांगीतल्याशीवाय कोणीही घरी जायचे नाही’ असे सक्त फर्मान काढले. हा सगळा गोंधळ बघुन आम्ही हादरुनच गेलो होतो. कारण या आधी बँकेत पोलीस कधीच आले नव्हते. गोगटे साहेबांनी मला लगेच केबीनमधे बोलावले. टाय लावलेले गृहस्थ पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे एक मोठे अधीकारी होते. मी गोगटे साहेबांना दिलेला 22 लाखांचा ड्राफ्ट त्यांच्या हातात होता. तो बोगस असल्याचे ते सांगत होते. मला आलेल्या शंका बरोबर असल्याचे ते सांगत होते. मला त्या पार्टीच्या नावाने आधी आलेले ड्राफ्ट पण आणायला सांगीतले. मी ते ड्राफ्ट आणायला स्ट्रॉंग रुमकडे जाताना सहज पाहिले तर कुलकर्णी साहेबांचा चेहेरा प्रचंड घाबरलेला दिसत होता. ते फोनवर कुणाशीतरी हळू आवाजात पण भरभर बोलत होते. मी त्या पार्टीने जमा केलेले सगळे ड्राफ्ट गोगटे साहेबांपूढे ठेवले. ते सगळे बोगस निघाले. या बोगस ड्राफ्टच्या रुपाने कुलकर्णी साहेबांच्या या सुटाबुटातील मित्राने आमच्या बँकेला 32 लाखांचा चुना लावला होता व अजून 22 लाखांचा चुना लावायला निघाला होता. यात कुलकर्णी साहेबांचा पण हात होता असे पोलिसी खाक्या दाखवताच आढळून आले. तेवढ्यात बँकेचे चेअरमन व एम. डी. पण येऊन पोचले होते. कुलकर्णी साहेबांना अटक तर झालीच पण त्यांना सस्पेन्ड पण करण्यात आले.
दोन दिवस बँकेतील वातावरण तंग होते. आता माझी पाळी होती. कारण माझ्या पण व्हाऊचरवर सह्या असल्यामूळे मी पण या फ्रॉडमधे सामील आहे असे कुलकर्णी साहेब वारंवार जीव तोडून सांगत होते. कामात मी कसा गलथान आहे याचा पाढा पण त्यांनी वाचून दाखवला होता. त्यामूळे माझी पण गच्छंती अटळ आहे असे मला वाटत होते. गोगटे साहेबांचे बोलावणे आले आणि फाशीच्या तख्तावर जाणार्या कैद्यासारखा मी त्यांच्या समोर उभा राहीलो. आता ते टर्मीनेशची ऑर्डर केव्हा देतात याची मी वाट पहात होतो.
‘तुमची कुलकर्णींच्या जागी नेमणूक करण्यात आली आहे’ ते म्हणाले तेव्हा मी उडालोच. ‘साहेब मी टेम्पररी क्लार्क. थर्ड क्लास बी.कॉम.!’ मी कसेतरी पुटपुटलो. ‘तुमच्यामूळे बँकेतले एक मोठे फ्रॉड सापडले. तुम्ही बँकेला संकटातून वाचवलेत. आजपासून तुमचे सिनियर ऑफीसर म्हणून प्रमोशन करण्यात येत आहे. तसेच तुम्हाला नोकरीत पर्मनन्ट करण्यात येत आहे. ही घ्या त्याची ऑफीस ऑर्डर. दुसरी गोष्ट. आपल्या बँकेने पण सायबर सेल काढायचे ठरवले आहे. त्याचे प्रमुख म्हणून तुमची निवड करावी अशी शिफारस मी केली आहे. बँकेत परत अशी फ्रॉड होऊ नयेत यासाठी हा सायबर सेल काढण्यात येत आहे. बेस्ट ऑफ लक.’ सायबर सेलचा प्रमुख मी त्यानंतर पाच फ्रॉडची प्रकरणे उजेडात आणली. याचा फायदा असा झाला की लोक मला आरोपीच्या पिंजर्यात आता उभे करत नाहीत.
हे कशामूळे घडले? एखादी गोष्ट जो पर्यंत मला पटत नाही तो पर्यंत स्विकारायची नाही व प्रश्न, मग ते कितीही ‘स्टुपीड’ का असेनात, विचारायला घाबरायचे नाही हा माझा स्वभाव. किंवा ती माझी ‘ओरिजिनॅलिटी’ आहे म्हणाना!
देवाने प्रत्येकालाच काही ना काही तरी ‘ओरिजिनॅलिटी’ ही दिलेलीच असते. ती एक दैवी देणगीच असते. पण बरेच जण आपल्या या ‘ओरिजिनॅलिटी’ चा र्हास तरी करततात किंवा घालवून तरी बसतात. असे करू नये. कारण शेवटी मला माझ्या ‘ओरिजिनॅलिटी’ नेच आधार दिला.
पण शेवटी आपली ‘ओरिजिनॅलिटी’ टिकवून ठेवायची की नाही हा ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे नाही का?
तुम्हाला काय वाटते?
(संदर्भः-
एनरॉन ही एनर्जी व पॉवर जनरेशन क्षेत्रातली एक नावाजलेली व दिग्गज अमेरिकन कंपनी. 1985 साली स्थापन झालेली ही कंपनी 2004 साली पत्यांचा बंगला कोसाळावा तशी कोसळली. इतकेच नव्हे तर ऑर्थर अँडरसन या एका आघाडीच्या सि.ए. फर्मला पण गाशा गुंडाळावा लागला. हे सगळे घडले ते आर्थिक घोट्याळ्यांमूळे. आणि हे उघडकिला आणले ते अकाऊंट सेक्शनमधे क्लार्कचे काम करणार्या एका सर्वसामान्य महिलेले. खोटे हिशोब दाखवणे, आस्तित्वात नसलेल्या कंपन्यांमधे गुंतवणूक केल्याचे दाखवून सरकारी कराची चोरी करणे, कंपनीचा रेव्हेन्यु कृत्रीम रित्या फुगवून दाखवणे, या जोरावर स्टॉक मार्केटमधे कंपनीच्या स्टॉकची किंमत वाढवणे व त्याचा वैय्यक्तिक स्वार्थासाठी फायदा करून घेणे असे अनेक आरोप कोर्टात सिद्ध झाले. याबद्दल कंपनीचे प्रमुख केनेथ ले यांना 65 वर्षांची शिक्षा होणार होती. या आधीच त्यांचे निधन झाले पण त्यांची बायको रस्त्यावर आली. तसेच कंपीच्या अनेक वरिष्ठ अधिकार्यांना दिर्घकाळाच्या सक्षम कारावासाच्या शिक्षा झाल्या आहेत. कोर्टामधे या महीलेची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण ठरली. तिने साक्ष देऊ नये म्हणून तिच्यावर दडपण आणण्यात आले. तिला प्रलोभने दाखवली गेली. इतकेच नाही तर तिला व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पण ती या कशालाही बधली नाही. कोर्टामधे अमेरिकेतील अनेक बड्या बड्या वकीलांची फौज तिच्याविरुद्ध उभी करण्यात आली. तिची साक्ष खोटी पाडण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आज ही महिला अमेरिकेची ‘हिरो’ आहे.)

No comments:
Post a Comment