Friday, November 27, 2015

Chandrashekhar Gokhale

(आग्रहाखातर)
आई लहनपणी आम्हाला एका खेडुताची गोष्ट फार रंगवून सांगायची...
साधाभोळा खेडूत त्यावेळचा तो काळ, प्रवास म्हणजे पायपीटी शिवाय पर्याय नसायचा..मग आई प्रमाण द्यायची अरे इथनं साधं भागवत मावशीकडॆ जायला दिवस लागायचा.. दिवसभर चाललायचं तिन्हिसांज झाली की जवळपास पडकं देऊळ बघून मुक्काम करायचा.. ते पडकं देऊळ बहुदा मारुतीचंच असायचं..मग तिथेच एक आडोशाची जागा बघून जरा झाडून बिडून घ्यायची.. मग बरोबर आणलेली शिदोरी काढायची..मीठ मिरची, कोरडा भाकर तुकडा चवीला गुळाचा खडा..
.देवाला नैवेद्य दाखवला की त्या मिणमिणत्या प्रकाशात चार घास खायचे आणि लोट्यातलं पाणी पिऊन तिथेच आडवं व्हायचं.. दमलेल्या देहाची कधी मुटकुळी व्हायची हे त्याचं त्यालाही कळायचं नाही.. पाहटे जाग आली, देवाच्या पाया पडलं की पुन्हा पायपीटीला सुरुवात..तर असा एक खेडूत मजल दर मजल करत तिन्हिसांजेला एका टुमदार गावाच्या वेशीपाशी पोहोचतो..जवळची शिदोरी संपत आलेली असते चालून चालून पाय तुटायची वेळ आलेली असते दिवसही चांगला कललेला असतो.. आता अंधारात ठेचकाळत पुढे जाण्यात काही राम नसतो.. त्या पेक्षा इथेच कुणाला विनंती करून त्याच्या ओसरीत अंग पसरावं आणि रात्र ओसरली की पुढचा रस्ता धरावा अशा तो सुद्न्य विचार करतो
त्या विचारात चालत असताना त्याला एक टूमदार वाडा दिसतो..बरीच चेहेल पेहेल त्या वाड्यात दिसते कसलं तरी शुभकार्य त्या वाड्यात होणार असतं तिथली लगबग बघून याचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो नर नारी नटून थटून मिरवत असतात.. त्यांच्या समोर हा म्हणजे अगदीच... त्या बि चार्‍याशी बोलायला काय साधं त्याचं म्हणणं ऐकायला कोणाला वेळ नसतो.. त्याचा साधा प्रश्न असतो.. या वाड्याचा धनी कोण? म्हणजे त्याची परवांगी घेऊन हा आपली पथारी वाड्याच्या एका कोपर्यात पसरणार असतो, पण छे! कोणी त्याच्याकडॆ बघायला तयार नसतं..तो खूप विचार करतो परवांगी नं घेता आश्रय घेणं त्याला रास्त वाटत नाही त्याचही बरोबरच असतं सामान्य माणूस अपमानाला फार भितो.. जेंव्हा आमच्याकडे राहयला घर नव्हतं तेंव्हा... असो!
तर खूप विचार केल्यावर त्याला एक जगावेगळी कल्पाना सुचते तो अंगणातला एक भलामोठा धोंडा दिवाणखान्यात मधेच आणून ठेवतो आणि गम्मत बघत कोपर्‍यात उभा राहतो... लोक येत असतात जात असतात इकडून तिकडे तिकडून इकडे उगीच घाई दाखवत फिरत असतात ज्याला त्याला त्या धोंड्यची अडचण होते.. दखल प्रत्येकजण घेतो कोणी चरफडतं कोणी अडखळतं कोणी दुसर्‍याला तो धोंडा बाजुला फेकायचा हुकुम सोडतं पण वाकून तो धोंडा उचलायची तसदी कोणी घेत नाही
तेव्हढ्यात एकजण येतो असा मधोमध धोंडा बघून हातातलं सामान बाजुला ठेवत अरे हा धोंडा इथे कोणी ठेवला असं तोंडाने पुटपुटत वाकतो आणि तो धोंडा उचलायला जातो तो धोंडा उचलतो आणि बाहेर टाकयला जात असताना हा खेडूत घाईने पुढे येतो आणि त्याच्या हातातून धोंडा घेत विचारतो.. या वास्तूचे तुम्ही मालक ना? या घराचे कर्ते पुरुष?.. मालक हो म्हणत विचारतो.. तुम्ही कसं ओळखलत?.. खेडूत म्हणतो धोंडा मीच हीतं ठ्येवला...मालक चकीत होत त्याच्याकडे बघायला लागतो तसा तो वरमून हसत म्हणतो.या वाड्याचा धनी हुडकत होतो जी स्मदेजन तालेवार खरा मालक कसा वळकणार?..म्हणून हा उपाय क्येला... धा डझन माणसं हितनं तिथे गेली तिथस्न हिते आली सम्द्यानी हा धोंडा पायला दात वोट बी खाल्ले पर उचलायची तसदी कोणी घेईना झालं पर तुम्ही आलासा आणि काळजीपोटी कोणाची बी वाट नं बघता हातातलं काम टाकून तुम्ही धोंडा उचलायला वाकलासा जी काळजी मालकाला वाटल ती आलेल्या पै पाहुण्याला वाटल का? मालकाला त्या खेडुताचं भारी कौतूक वाटतं एकतर त्याची हुशारी दुसरा त्याचा प्रामाणीकपणा.. नाहीतर इतक्या मोठ्या वाड्यात इतक्या गोतवळ्यात तो सहज खपून गेला असता.. एका रात्रीचाच तर प्रश्न होता... तो मालक दिलदार असतो कार्य पार पडेपर्यंत त्याला ठेऊन घेतो मानपान करतो..मा~रल आफ द स्टोरी काय जी काळजी घरच्या मालकाला घरा बद्दल वाटेल ती परक्याला वाटेल का?
ही घरी नाहिये म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली.. नाहीतर ही तत्परतेने म्हणेल हे मा~रल बिरल तुम्हाला लागू होत नाही... तुम्ही त्या वाड्यचे मालक असता तर त्या बिचार्या खेडुताला बाप जन्मात कळलं नसतं त्या वाड्याचे मालक कोण ते..

No comments: