Friday, January 8, 2016

चांदण्यात फिरताना भाग २

स्मिता हल्ली उदास उदास राहायची. तिच्या मैत्रिणींना सुद्धा कळलं होतं.
“काय झालं स्मिता? गप्प गप्प असतेस?” तशी स्मिता रडायला लागली.
“अगं, मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना. कुठे गेला कळतंच नाही मला.” रडतच ती सांगत होती.
“मग त्याला फोन करायचा ना.”
“नाही वापरत तो mobile.”
“पहिलं तुझं रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते.” स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली.
“तुला सांगितलं होतं ना तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं. दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला तेव्हापासून आज आठवडा झाला तरी तो मला भेटलाच नाही.”
“अगं उशिरा निघत असेल तो.”
“नाही गं. रोज एक तास तरी थांबते मी. नाहीच येत तो.”
“आणि mobile चं काय बोललीस?”
“तो म्हणायचा गावात रेंज नाही येत मग mobile कशाला वापरायचा. घरीही फोन नाही. गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो. कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ
भेटायलाच जातो, असं म्हणाला तो.” दोघीही गप्प झाल्या.
“आता काय करायचं गं. पप्पा बोलले मी येऊ का गावात त्याची चौकशी करायला.”
“नको, पप्पांना नको बोलावू. मला वाटते तो ना चोर असणार. गावात असे खूप असतात गं फसवणारे. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर. तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया हरवल्याची.”
“ठीक आहे. चल.” असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या.


“सर, आम्हाला एक व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवायची आहे.”
“ठीक आहे. फोटो आणला आहे का हरवलेल्या व्यक्तीचा?” तश्या दोघी एकमेकांकडे बघायला लागल्या.
“नाही. फोटो तर नाही आहे.” स्मिताची मैत्रीण म्हणाली.
“फोटो नाही. मग त्याला शोधणार कसा. बरं नाव आणि पत्ता तरी आहे त्या व्यक्तीचा.” पोलिसांचा पुढचा प्रश्न.
“त्याचं नाव आहे यश.”
“पूर्ण नाव सांगा बाई.”
“माहित नाही सर.”
“बरं, पत्ता?”
“तोही माहित नाही.”
तसा तो पोलिस त्यांच्याकडे बघायला लागला. “तुमच्या ड्रेस वरून तुम्ही शिकलेल्या वाटता आणि तक्रार नोंदवताना काय माहिती दयावी एवढं साधं माहित नाही तुम्हाला.”
दोघी शांत बसल्या. कोणास ठाऊक त्या पोलिसाला त्यांची दया आली.
“बरं, त्या यशला कोणी पाहिलं आहे का?”
“हं... हो मी बघितलं आहे.” स्मिता लगेच बोलली.
“तो बघा, त्या खोलीत आमचा स्केच artist आहे. त्याचं वर्णन करून सांगा त्याला. तो काढेल चित्र त्याचं. मग आम्हालाही बरं पडेल शोधायला. मी आता बाहेर जातो आहे, चित्र झालं कि तक्रार नोंदवून घ्या, आम्हाला भेटला तर तुम्हाला कळवतो.” असं म्हणून तो पोलिस निघून गेला.
स्मिता लगबगीने त्या रूम मध्ये गेली.
“मला सविस्तर वर्णन सांगा. तसं मी स्केच काढतो.” स्मिताने लगेच त्याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्याने स्केच काढायला. अर्ध चित्र झालं असेल तसा तो मधेच बोलला.
“थांबा.”
“का? काय झालं?”
“तुम्ही “आधार” हॉस्पिटल मध्ये काम करता का?” त्या प्रश्नाने दोघीही दचकल्या.
“आणि तुम्ही नक्की डॉक्टरच असणार.”
“हो. आम्ही आधार हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहोत. पण तुम्हाला कसं माहित?”
“मग हे स्केच काढायची गरजच नाही.” असं म्हणत तो उठला आणि कपाटातून कसलीशी फाईल काढली.
“हि फाईल बघा. वेगळीच फाईल बनवली आहे मी.” फाईल उघडताच एक स्केच होतं. यशचचं.... अगदी हुबेहूब...!
“हाच.. हाच यश आहे.” स्मिता आनंदाने म्हणाली. तिच्या मैत्रिणीने तिला गप्प केलं आणि त्यालाच उलट प्रश्न केला.
“पण याचं स्केच तुमच्याकडे कसं?” तसा तो हसला.
“तुम्ही नवीन आहात वाटतं इकडे?”
“हो. आम्ही दोघीही ६ महिन्यापूर्वीच जॉबला लागलो.”
“मग बरोबर. तुम्हाला माहीतच नसणार.”
“काय ते?”
“तुमच्याच हॉस्पिटल मधल्या आतापर्यंत ९ जणींनी येथे ‘यश’ संबंधी तक्रार नोंदवली आहे.” तश्या त्या दोघीही आश्चर्यचकित झाल्या.
“बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत. ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने.”
“कोणी? संगीता नाव होतं का तिचं?”
“हो. संगीताच नाव होतं तिचं.”
“आणि पुन्हा विचार करा या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारायला आले नाही. तुम्ही उगाच तक्रार करू नका.”
“पण, त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत?”
“सगळ्याच्या तक्रारी तो हरवल्याच्या आहेत.”
“हे कसं शक्य आहे?”
“ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका.” स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली,
“‘मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा?”
“या ९ तक्रारी गेल्या १० वर्षातल्या आहेत. प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त. जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली. इकडे आता सगळेच नवीन आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचं तसं काही माहित नाही. पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या. त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला. आता एवढा माणूस जाणार कुठे? तरी मला वाटते तो चोर असावा. शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल. पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित. आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची.नाहीतर गेलो असतो तिकडे पण. तुम्ही तसच करा. तक्रार करू नका. तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा. मी कळवतो काही कळल तर.” त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.
“हे कसं शक्य आहे? जो माणूस मला रोज भेटायचा तो १० वर्षापूर्वी कसा काय हरवू शकतो?” स्मिता तिच्या मैत्रिणीला बोलली.
“काही तरी नक्कीच गडबड आहे. मला तर वाटते.”
“काय?”
“तो खरंच चोर असेल गं.”
“अगं, मग तो पोलिसांना कसा भेटत नाही.”
“माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता.”विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला. अचानक तिला आठवलं त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो.
“काय नाव होतं कंपनीचं.. हा...Eco. तेच नाव होतं. त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होतं मी.” आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि “Eco” नावाची एक कंपनी होती, शहरापासून थोडी अलीकडे. शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं, त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही. अगदी बॉसलाही. तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं. स्मिताला रडूच आलं. आता कुठे शोधू मी त्याला. रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.
तेवढयात मागून “थांबा madam” असा आवाज आला.
वॉचमननी हाक मारली होती. “काय झालं madam? कशाला रडता. बसा इकडे. उनाचं बाहेर नका जाऊ. पाणी प्या.” स्मिता शांत बसली आणि पाणी पिऊन बरं वाटलं.
“काका, मी इकडे आले होते एकाला शोधायला. पण इकडे कोणालाच माहित नाही.”
“कोणाला?”
“यश नाव आहे त्याचं.”
“यश साहेब..” वॉचमन बोलला. तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली.
“तुम्ही ओळखता त्याला? कुठे आहे आता तो?”
“माहित नाही madam. यश साहेब होते इकडे कामाला पण १० वर्षापूर्वी. नंतर कुठे गेले माहित नाही आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत.” या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला.
“हा पण आमचे जुने साहेब त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांना माहित असेल.” ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात. खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्यांचं घर.
“नमस्कार सर, तुम्ही Eco कंपनीत जॉबला होतात ना?” दरवाजा उघडताच स्मिताने प्रश्न केला.
“हो. पण तुम्ही कोण?” आता त्यांना खरं तर सांगू शकत नाही.
“मी स्मिता, यशची मैत्रीण. तुम्ही ओळखता ना यशला.”
“तुम्ही प्रथम आतमध्ये या. मग बोलू आपण.” तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली.
“हं... बोला आता. काय काम होतं तुमचं? आणि यशची कशी ओळख?”
“मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे.” स्मिताला खोटंच बोलावं लागलं.
“खूप वर्षांनी आली मी भारतात. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला. मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.”
“यश Actually मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.”
“म्हणजे?”
“तो होता माझ्या हाताखाली कामाला. चांगला होता. पण १० वर्षापूर्वी.”
“१० वर्षापूर्वी?”
“हो. मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.”
“नक्की काय ते मला कळलं नाही सर.”
“तो अचानक जॉबला येईनासा झाला. नंतर काही तो आला नाही कधी.” सर बोलत होते.
“मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का?”
“केलेला. एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो. पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते.”
“तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा?”
“आहे ना. ‘कुंभार’ गावात सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. ‘धर्माधिकारी’ नाव आहे घराचं.”
“अरे, माझ्या रूमच्या मागेच आहे घर वाटते.” स्मिता मनातल्या मनात बोलली.
“तरी तुम्हाला काय वाटत सर, कुठे गेला असेल तो?”
“तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता. त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस. म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाणं त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते. परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.”
“बायको?” स्मिता उडालीच.
“तशी बायको म्हणता येणार नाही. पण लग्न करणार होते ते लवकरच. मग तिच्या बरोबर तो गेला असेल.”
“काय... काय नाव होतं तिचं?”
“नाव... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती. इकडे पुढे ‘आधार’ नावाचं हॉस्पिटल आहे ना तिकडे डॉक्टर होती ती. नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.”
“बरं, Thanks Sir” असं म्हणत यशचा गावातला पत्ता घेऊन ती निघून आली. सगळंच काही विचित्र होतं. पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून.... कदाचित.

No comments: