Friday, January 8, 2016

ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनांतला का तेथे असेल रावा? ॥धृ॥
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा ॥१॥
घे साऊली उन्हाला कवळून बाहुपाशी
लागून ओढ वेडी खग येति कोटरासी
एकेक चांदणीने नभदीप पाजळावा ॥२॥
स्वप्नामधील गांवा स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखांचा स्वप्नीच वेध घ्यावा ॥३॥

No comments: