Saturday, December 26, 2015

लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड! atul kulkarni talk about his way of life

‘‘.. यापुढेही वाट असणार आहे तोवर त्या वाटेवरची निरनिराळी वळणंही येतच राहणार आहेत. परंतु तरीही माझ्या आयुष्याचं शेवटचं वळण कसं असावं, याबाबत माझी काही निश्चित मतं आहेत. सर्व सोडून अलिप्तपणे मला कुठे तरी जाता आलं पाहिजे. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, त्याप्रमाणे ‘लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!’ त्यांच्या या म्हणण्यानुसार मला जगता येईल का?’’ आयुष्य हा एक अखंड प्रवास असतो. त्या प्रवासात खाचखळगे, अडचणी, चढउतार, वळणं ही येतच असतात. या साऱ्यातून तावूनसुलाखून निघत माणूस म्हणून तुम्ही घडत असता. या प्रवासाला, वळणांना काही ना काही कारणं ही असतातच. त्यामुळे वळणांतून निर्माण होणाऱ्या नवनवीन वाटा अशा अर्थानं या सदराचं ‘वळणवाटा’ हे शीर्षक मला विशेष वाटतं. म्हणूनच तुम्ही कुठे जन्मता, कोणत्या घरात, गावात यालाही तितकंच महत्त्व असतं. मी मूळ कर्नाटकमधला असलो तरी सोलापुरात वडील उद्योजक असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. कर्नाटकी असूनही माझ्यावर महाराष्ट्रीय संस्कार होणं, हे महत्त्वाचं वळण वाटतं, कारण त्याचा स्वाभाविक पुढे परिणाम होत गेला. माझं बालपण अतिसामान्य होतं. अभ्यासात, खेळात किंवा कलेतही यथातथाच होतो. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी बेळगावी माझे अजितकाका, अलकाकाकू यांच्याकडे शिकायला गेलो. शालेय वयातून बाहेर पडत जीवनशिक्षणाच्या व्यापक जगाशी तोंडओळख होण्याचं ते वय! अशा वेळी काकाकाकूंनी तोवरच्या सोलापुरात वाढलेल्या टिपिकल अतुलमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. दोन अडीच र्वष त्यांच्याकडे राहिलो. त्यांनी इंग्रजी भाषेची ओळख करून देत माझ्याकडून इंग्रजीतूनच बोलण्याबद्दलचा आग्रह धरत त्या भाषेबद्दलची गोडी वाढवली. आपल्या मातृभाषेइतकीच अन्य भाषा शिकण्याबाबतचा त्यांचा असा दृष्टिकोन आणि अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी नव्याने त्यांच्याकडून, त्या वास्तव्यातून शिकलो. आपण जे घडतो, त्या घडण्यावर आई-वडिलांबरोबरच इतरांचे संस्कारही होतच असतात. मी असं वाचलेलं होतं की, एक मूल वाढायला अख्खं गाव हातभार लावत असतं. वास्तव्याचं ठिकाण, भवताल, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती या आणि अशा गोष्टींचा परिणाम, संस्करण तुमच्या घडण्यावर होत असतं. आई-वडिलांइतकंच तेही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणे बेळगावातल्या वास्तव्याच्या काळातले माझी मित्रमंडळी, नातेवाईक, परिस्थिती यांनी मला एका अर्थानं माझ्या कोषातून बाहेर काढत जगण्याची एक नवी दृष्टी दिली. त्यामुळे हे आयुष्याच्या घडणीतलं हे वळण महत्त्वाचं ठरतं. मी १२ वीत नापास झालो. ते खूप महत्त्वाचं नि आयुष्याला कलाटणी देणारं वळण होतं. जर मी हुशार विद्यार्थी असतो, बारावी उत्तम गुणांनी पास होऊन इंजिनीअिरगला व्यवस्थित पास झालो असतो तर मी वेगळा माणूस झालो असतो. मात्र बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवलं. हे अपयश पचवून त्यापुढील तीन-चार र्वष बीए पूर्ण होईपर्यंत ते अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये याच काळानं बरंच काही शिकवलं. नापास होणं, इंजिनीअिरग सोडून परत येणं आणि त्यानंतर मी बीए होणं ते एनएसडीला जाण्याचा निर्णय घेईपर्यंतचा सात-आठ वर्षांचा काळ मोठ्ठं वळण होतं, थोडक्यात म्हणजे ते ‘यू टर्न’ होतं. त्या सगळ्या काळात खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात असं मला वाटतं. अभिनयाच्या व्यवसायात आल्यामुळे जे बघायला-करायला मिळतंय, मला जे एक्सपोजर मिळालं आहे, चेहऱ्याच्या ओळखीमुळे तसंच ग्लॅमरमुळे खूप गोष्टी मला करता येऊ शकताहेत. हे अत्यंत वेगळं आयुष्यं मी जगू शकलो आहे, ते केवळ मी नापास झाल्यामुळे जगू शकलो आहे. पास होऊन सुरक्षित चौकट मिळाली असती तर इंजिनीअिरग करता करता असं काही या व्यवसायात करू शकलो असतो का? मला नाही वाटत. जेव्हा मी इंजिनीअिरग सोडलं त्या वेळेस माझ्या घरची परिस्थिती काही फारशी बरी नव्हती. त्यामुळे नक्कीच असं वाटतं की, मी त्याच कोषात राहिलो असतो. मात्र, सुदैवाने या अपयशाने मला रिस्क घ्यायला लावली. बी.ए. झाल्यानंतर जेव्हा मी अभिनेता म्हणून व्यवसाय करायचं ठरवलं तेव्हा माझ्यापुढे दोन मार्ग होते. पैकी सरळ मुंबईला यायचं किंवा एनएसडी, एफटीआयसारख्या संस्थेत जाऊन रीतसर प्रशिक्षण घेऊनच या व्यवसायात उतरायचं. त्यापूर्वी सोलापुरातल्या ‘नाटय़ आराधना’ या हौशी नाटय़संस्थेमध्ये काम करत होतो. अभिनयाची मुळाक्षरं तिथेच गिरवली. परंतु मला मनापासून असं वाटत होतं की, मी एकाच पठडीत-काही एका मर्यादेतच काम करत राहिलोय. व्यवसाय म्हणून हे स्वीकारायचं असेल तर मला या मर्यादा तोडायला हव्यात. त्यासाठी लागणाऱ्या वेगळ्या अनेक गोष्टी शिकणं अत्यावश्यक वाटलं. कारण, अभिनयाची, नाटकाची एकच एक अशी व्याख्या नसते. अन्य गोष्टींचीही माहिती हवी. त्यासाठी एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणं महत्त्वाचं वाटलं. ती वाट मी निवडली. मुंबईला थेट येऊ शकत होतो. कारण, ‘चाफा’, ‘माणूस नावाचं बेट’, ‘आपण सारेच घोडेगांवकर’ ही माझी सोलापुरातली नाटकं गाजलेली होती. त्याचे पुण्या-मुंबईत प्रयोग झालेले होते. त्यामुळे तशा मला ऑफर्सही येत होत्या. तरीही ते सर्व नाकारून मी एनएसडीला जायचं ठरवलं, तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. हे समोर दिसत होतं की, शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी ३० वर्षांचा होईन आणि त्यानंतर माझं प्रोफेशन सुरू होईल. तेदेखील अशा क्षेत्रामध्ये की जे अगदीच बेभरवशाचं समजलं जातं. या व्यवसायाच्या दृष्टीने मी अगदी म्हातारा होऊनच इथे आलो होतो. मला फार बरं वाटतं की, मुंबईला थेट येण्याचा मोह टाळून मी एनएसडीला गेलो, हा निर्णय योग्यच होता. ‘नाटय़आराधना’ने घालून दिलेली वाट आणखी पुढे नेत एनएसडीचं वळण त्या निर्णयामुळे आयुष्याला मिळालं, ते सर्वात महत्त्वाचं वाटतं. दिल्लीच्या एनएसडीमध्ये देशभरातून विद्यार्थी आणि परदेशातून शिकवण्यासाठी येणारे शिक्षक यांच्या सहवासाचा फायदाच मला झाला. तिथे जाण्याच्या, शिकण्याच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे एक व्यावसायिक नट म्हणून अभिनयाकडे पाहण्याचा अभ्यासू दृष्टिकोन तसंच नाटकाचं, वेगवेगळ्या कलांचं, माणसांचं प्रचंड एक्स्पोजर एनएसडीनं दिलं. दहावीनंतरच्या शिक्षणासाठी बेळगांव तेथून पदवी शिक्षणाकरिता पुणे आणि दिल्लीच्या एनएसडी आणि एनएसडीची पदवी घेऊन मुंबईपर्यंतच्या प्रवासाचं हे वळण माझ्या अनुभवाच्या कक्षा रुंदावणारं ठरलं. वैयक्तिक आयुष्यात मला गीतांजली तिथे भेटली. १९९३ साली एनएसडीमध्ये आम्ही भेटलो. त्याला आता जवळजवळ २२ वर्षे होतील. ही या वळणात मिळालेली खूप चांगली गोष्ट होती. लग्न वगैरे बाबतीत मी फार रोमँटिक नाही परंतु एक व्यक्ती इतक्या जवळ, इतका दीर्घकाळ तुमच्यासोबत असते तेव्हा स्वाभाविक परस्परांवर परिणाम होत असतो. तुम्ही एकत्र एक विश्व उभं करत असता. आम्हाला फक्त घर किंवा नातेवाईकच आहेत असं नव्हे तर ‘क्वेस्ट’ नावाची संस्था एकत्र चालवतो. आमचा वनकुसवडय़ाला जंगल प्रकल्प आहे. सोनाळ्यामध्ये बांधलेल्या आमच्या घरात ‘तारपा’ नावाची संस्था गीतांजलीने सुरू केलेली आहे. असं मोठं विश्व निर्माण होणं हे नवरा-बायकोच्या पलीकडचं आणि म्हणूनच दोघांनी मिळून निर्मिलेलं हे जग अधिक प्रभावी आहे. आमचं घर तर त्यातला फारच छोटासा भाग आहे. नातेवाईक, मित्रमंडळी, सामाजिक काम हे सगळं त्यात आले. एनएसडीला गीतांजली भेटणं, आमचे विचार जुळणं. त्यातले अर्थातच कुठल्याच दोन व्यक्तींमध्ये शंभर टक्के विचार कधीच जुळत नसतात. परंतु आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि ते आजवर राहिलो आहोत. चांगला संवाद आमच्यात होतो, हे महत्त्वाचं वाटतं. दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमचा आम्हाला अवकाश आहे किंबहुना तो असावाच, असं मला वाटतं. पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट काही मला मान्य नाही. एका छताखाली आमची दोघांची वेगळी विश्वं आहेत, हे आम्ही मानतो. आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे. एनएसडीवरून परत आल्यानंतर मला ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे व्यावसायिक नाटक मिळालं आणि ते माझ्या आयुष्यातलं नट म्हणून पहिलं व्यावसायिक वळण ठरलं. या नाटकाने मला ‘अतुल कुलकर्णी’ ही ओळख मिळवून दिली. हिंदी, मराठी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांतून झालेल्या या नाटकात गांधींच्या भूमिकेसाठी चंद्रकांत कुलकर्णीनी मला निवडलं, त्याला सारं श्रेय जातं. तिन्ही भाषांमध्ये गांधी मीच होतो, अन्य कलाकार बदलले. आमच्या व्यवसायात किती बरं काम करता यापेक्षासुद्धा लोक तुम्हाला ओळखतात की नाही, तुम्हाला ‘ओळख’ आहे की नाही हे महत्त्वाचं ठरतं. ‘गांधी विरुद्ध गांधी’ने मला ही ओळख मिळवून दिली. माझा चेहरा नाटकाच्या वर्तुळात माहीत झाला आणि हे नाटक महत्त्वाचं अशासाठीसुद्धा ठरलं की, त्यामुळे ‘हे राम’ हा पहिला सिनेमा मिळाला. कमल हासन यांनी गांधींबद्दल ऐकलेलं होतं. त्यांनी ‘हे राम’मध्ये गांधींविरोधी असलेल्या श्रीराम अभ्यंकरची भूमिका दिली. कमल हासन हा माझ्या पुढच्या आयुष्याला मिळालेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठय़ा वळणासाठी कारणीभूत आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी सिनेमाच करतो आहे. ‘हे राम’मुळे ‘चांदनी बार’ मिळाला. ‘चांदनी बार’ गाजला त्याने मोठं व्यावसायिक यश मिळवून दिलं. त्या यशाने पुढच्या वाटचालीकरिता पुढचे चित्रपट मिळत गेले. या दोन्ही चित्रपटांकरिता राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्या दृष्टीने ‘चांदनी बार’ हे महत्त्वाचं वळण आहे. ‘हे राम’ माझ्या व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचं वळण याकरिता की, मी नाटकातला माणूस होतो, हे कमल हासन जाणून होते. सिनेमा हे संपूर्णपणे वेगळं माध्यम आहे. हासन यांनी हे माध्यम काय आहे, हे मला छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून समजावून दिलं. सिनेमाचे ‘बेसिक्स’ शिकवले. नाटकाच्या तंत्रापासून ते सिनेमाच्या तंत्रापर्यंतचं शिक्षण याच काळात झालं. विजय तेंडुलकर यांच्याशी माझ्या अगदी शेवटी शेवटी गप्पा झाल्या होत्या, त्या दरम्यान ते म्हणाले होते, की ‘माध्यम हे महत्त्वाचं नाही तर तुमचं सांगणं हे अधिक महत्त्वाचं आहे!’ सिनेमा या माध्यमामधून सांगणं हे मला आवडतंय आणि ही माझी अत्यंत वैयक्तिक निवड आहे. ‘हे राम’ हा सिनेमा तीन भाषांत हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये झाला. त्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की, दाक्षिणात्य भाषांमध्ये मी जाऊ शकलो. हिंदीच्या बरोबरीनेच तिथेही सिनेमे करतोय. आजतागायत चारही दाक्षिणात्य भाषांमध्ये काम करतो आहे. दरवर्षी एक किंवा दोन दाक्षिणात्य भाषांमधले चित्रपट प्रदर्शित होतात. ऑक्टोबरमध्ये हिंदीमध्ये ‘जज्बा’, मराठीमध्ये ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ आणि मल्याळम्मधला मोहनलाल सोबतचा ‘कनल’ सिनेमा असे तीन भाषांमधले सिनेमे प्रदर्शित झाले. ‘रंग दे बसंती’ने हिंदी सिनेमामधलं मोठ्ठं व्यावसायिक यश मिळालं. एकूणच हिंदी सिनेमामध्ये हा सिनेमा म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्ट फिल्म आहे ती. वैयक्तिक आयुष्यात मला अत्यंत जवळची मित्रमंडळी या सिनेमामुळे मिळाली. मराठीच्या बाबतीत ‘नटरंग’ हे महत्त्वाचं वळण होतं. तो फार खास सिनेमा होता. त्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. झी सिनेमाची टीम आणि रवि जाधव यांना त्याचं सर्व श्रेय जातं. व्यावसायिक यश, आव्हानात्मक भूमिका या अर्थाने तो एक महत्त्वाचा टप्पा मराठी सिनेमा क्षेत्रात सांगता येईल. २००० पासून ते आजपर्यंत अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य भाषांमधले सिनेमे केले. ‘दहावी फ’, ‘देवराई’, ‘वळू’, ‘सुखान्त’, ‘नटरंग’, ‘पोपट’ ते अगदी अलीकडचा ‘प्रेमाची गोष्ट’, ‘हॅपी जर्नी’पर्यंत तर हिंदीमध्येही ‘चांदनी बार’नंतर ‘८८ अँटॉप हिल’, ‘खाकी’, ‘रंग दे बसंती’, ‘चालीस चौरासी’, ‘पेज थ्री’, ‘सत्ता’, ‘जंजीर’ ते अलीकडच्या ‘डर्टी पॉलिटिक्स’पर्यंत विविध भूमिका साकारल्या. या आणि यांसारख्या सिनेमांतून, त्या त्या वेळच्या अनुभवांतून खूप काही शिकायला मिळालं. व्ही. शांताराम म्हणाले होते की, ‘सिनेमा म्हणजे २० टक्के कला आणि ८० टक्के व्यवसाय आहे!’ अगदी खरं आहे, त्यांचं म्हणणं. म्हणूनच सिनेमाचा व्यवसायाच्या अंगानेही विचार करत राहणं महत्त्वाचं आहे. विविध भाषांमधून, इंडस्ट्रीतून काम केल्यामुळे अनुभवाचं क्षेत्रं विस्तारलं. प्रत्येक इंडस्ट्रीची स्वत:ची अशी संस्कृती असते. त्यानुसार तेथील सिनेमे घडत असतात. पूर्वी दाक्षिणात्य सिनेमे हे चेन्नईतच बनवले जात आणि तेथून मग अन्यत्र त्यांचं वितरण होत असे. यामुळे चेन्नईमध्ये आजही तुम्हाला सिनेकल्चर पाहायला मिळतं. मल्याळम्मध्ये साहित्याचा पगडा आहे. तो मला मराठीच्या अधिक जवळ जाणारा वाटतो. या सगळ्याचा फायदा आज मला ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ हा सिनेमा निर्माण करताना एक निर्माता म्हणून नक्कीच झाला. केवळ सिनेमा निर्मित करून सर्व संपत नसतं तर त्याचं प्रदर्शन करणं हेही आव्हानात्मक असतं आणि आज हीच कला, प्रदर्शित करणं, दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. अभिनेता म्हणून असलेला ‘कम्फर्ट झोन’ सोडून निर्माता म्हणून उतरायचं ठरवल्यानंतर त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या या नटापेक्षाही १०० टक्क्यांनी जास्त आहेत. एकाच वेळी युनिट, कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी बांधील असणं, बजेटमध्ये हे सारं बसवणं, योग्य ते निर्णय त्यांच्या जबाबदारीसह योग्य वेळी घेणं ही सारी आव्हानं आज मी तितकीच एन्जॉय करतो आहे. त्यामुळे निर्माता म्हणून आयुष्यातलं हे वळणंही मला बरंच काही देऊन जाईल, असं वाटतं आहे. अभिनय हा व्यवसाय म्हणून करायचा असं जरी ठरवलेलं असलं तरीदेखील तेच काही आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नव्हतं आणि नाहीए, यावर मी आधीपासूनच ठाम आहे. त्याबरोबरीनेच अनेक गोष्टीही महत्त्वाच्या आहेत, ज्या एक माणूस म्हणून करणं, मला अत्यंत आवश्यक वाटतं. अभिनय करता करताच वनकुसवडे येथे साधारण २४ एकरांची जमीन घेऊन तिथे आम्ही जंगल प्रकल्प राबवितो आहोत. पर्यावरणाची अपरिमित हानी झाल्याने होत असलेले दुष्परिणाम आपण सारेच पाहतो आहोत. निसर्गाचा हा समतोल आपल्याकडून सांभाळला जावा, या हेतूने मानसी आणि केतकी या मैत्रिणींच्या साह्य़ाने हा प्रकल्प हिरवा होतो आहे. (www.oikos.in/pages/home.html) त्याचबरोबरीने सध्याच्या शिक्षणपद्धतीबाबतही मी अजिबात समाधानी नाही. केवळ परिस्थिती, व्यवस्थेला नावं ठेवण्यापेक्षा आपण पुढाकार घेऊन काही करू शकतो का, या विचाराला शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांची साथ मिळाली आणि मगाशी म्हटलं तसं, ‘क्वेस्ट’ ही आमची संस्था वाडा येथील सोनाळा या गावी आकाराला आली. तिथे आमचं घरही आहे. शिक्षण हे माणसाला विचारप्रवृत्त करणारं असावं, या मताचा मी आहे, परंतु आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ही विचारप्रक्रिया निर्माण होण्याऐवजी केवळ स्पर्धाच होताना दिसते आहे. अशी प्रवृत्ती निर्माण होण्याला खरं तर पालक जबाबदार आहेत. शिक्षणाचा एक शास्त्र म्हणून विचार आणि संशोधन करून त्याप्रमाणे त्याची आखणी करणं, त्याची अंमलबजावणी होणं हे निकडीचं आहे. आपल्या इथे रुजलेला स्वार्थीपणा, विविध समस्यांचं मूळ हे चुकीच्या शिक्षणपद्धतीमध्ये आहे, त्यामुळे तिच्यातच आमूलाग्र बदल होणं आणि ते अधिकाधिक आधुनिक तंत्राशी जोडत विचारप्रवण करणारं व्हावं, याकरिता आमची ‘क्वेस्ट’ (QUEST-quest.org.in) काम करते. तसं दर्जात्मक शिक्षक प्रशिक्षणही या संस्थेमध्ये दिलं जातं. आज एकूण ५ जिल्ह्य़ांमध्ये १० हजारांहून अधिक मुलं आणि ३०० शिक्षकांबरोबर काम सुरू आहे. सोनाळे इथे काम करत असताना मला व्यक्तिश: तेथील आदिवासी संस्कृतीचा जवळून परिचय झाला. एक वेगळा सामाजिक स्तर अनुभवत असताना आपल्यापेक्षाही त्यांची संस्कृती ही किती तरी प्रगल्भ नि आधुनिक असल्याचा प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणूनही क्वेस्ट संस्थेची उभारणी होणं, त्यानिमित्ताने समाजात एकरूप होत माणूस म्हणून अधिक समृद्ध होताना ते वळणही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं. माझा एकच एक कुणीही गुरू नाही किंवा गुरू मी मानतही नाही. आज मी जो कुणी आहे, ते आजवरच्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींकडून, संस्कृती, पुस्तकांतून, अनुभवांतून शिकत गेलो त्या साऱ्या एकत्रित अनुभवांचं ते फलित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शिकण्याच्या प्रक्रियेत मी लहान-मोठा असा भेद कधी केला नाही. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मधल्या माझ्याहून लहान असलेल्या कलाकारांकडूनही बरंच शिकता आलं. निर्माता या वळणानंतर कदाचित पुढे दिग्दर्शन करण्याचंही वळण असू शकेल, तशा सूचनाही आसपासच्या लोकांकडून मला केल्या जाताहेत. यापुढेही वाट असणार आहे तोवर त्या वाटेवरची निरनिराळी वळणंही येतच राहणार आहेत. परंतु तरीही माझ्या आयुष्याचं शेवटचं वळण कसं असावं, याबाबत माझी काही निश्चित मतं आहेत. या जगामध्ये आपण वस्तू, माणसं, व्यवसाय अशा अनेक बाबींमध्ये गुंतलेले असतो. ते सर्व सोडून अलिप्तपणे मला कुठे तरी जाता आलं पाहिजे. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, त्याप्रमाणे ‘लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!’ त्यांच्या या म्हणण्यानुसार मला जगता येईल का?, ते माझ्या आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट असू शकेल का?, म्हणजे मी कधी, कुठे, कसा मेलो हे कुणालाच कळता कामा नये, असं जगून जाता येईल का? किंबहुना, तसं जाता यावं, याच दृष्टीने आयुष्याची वळणवाट असावी असे प्रयत्न सुरू आहेत. atul@atulkulkarni.com शब्दांकन – अनुराधा परब anuradhaparab@gmail.com

डी. एस. कुलकर्णी

‘टेलिस्मेलने सुरू झालेला उद्योगाचा प्रवास नंतर गृहउद्योग, ‘डीएसके टोयोटा’, ‘डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस’, ‘डीएसके मोबिलीज्’, ‘मिल्कोट्रॉनिक्स रोबो’, ‘डीएसके ड्रीम सिटी’ अशी अनेक वळणं घेत पुढे चालूच आहे.. आयुष्य आता पासष्टी ओलांडत आहे. आणखी पुढे किती वळणं आहेत..माहीत नाहीत..पण मीही त्याच झऱ्यासारखा आनंदात..शीळ घालत आजही पुढे निघालो आहे.’’ अनेकदा तरुणांसमोर जेव्हा मी माझ्या अनुभवांची शिदोरी उलगडत असतो तेव्हा झऱ्याचा उल्लेख आपसूकच येतो. रानातला झरा पाहा, मुक्तछंदात गात.. अनेक वळणं घेत वाहातच असतो. यातल्या कुठल्या वळणावर काय असतं.. या झऱ्याला ते ठाऊक नसतं. एखाद्या वळणावर काटेकुटे आले तरी तो गुदगुल्या झाल्यासारखा हसत पुढे जातो. कुठे मध्ये भलामोठा दगड आला तर.. त्याला टकरा देण्यापेक्षा वळसा घालून झरा आपली पुढची वाट आनंदात पकडतो. आपलंही आयुष्य असंच वळणा-वळणाचं असतं.. असं मला कायमच वाटत आलंय. माझ्या आयुष्याला वळण देणारी पहिली व्यक्ती म्हणजे माझी आई. माझ्या आईचे शालेय शिक्षण दुसरीपर्यंत झाले होते आणि ती एका बालवाडीत मदतनीसाचे काम करीत असे. एकदा कधीतरी कशावरून तरी तिचे तिथे बिनसले. त्यानंतर माझ्या आईने पुण्यातल्या सोमवार पेठेत स्वतची चौथीपर्यंतची शाळा सुरू केली आणि ती अनेक वष्रे यशस्वीपणे चालवूनही दाखवली. लहानपणापासून तिची ही धडाडी-जिद्द मी बघत आलो आहे. त्या वयात हे शब्द ठाऊक नव्हते. पण तिचे हे संस्कारच मला घडवत आले आहेत. माझ्यातल्या उद्योजकाला पहिलं वळण लागलं ते मुठा नदीच्या काठावर असणाऱ्या कसबा पेठेमुळेच! टिळकांच्या भाषेतली ही तेल्या-तांबोळ्याची वस्ती. या पेठेमुळेच कष्टाचे वळण अगदी लहान वयात लागले. ज्याचा फायदा या वयातही मला होत आहे. मी कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकायचो. दुपारी शाळा सुटली की इतर मुलांसारखंच मलाही खेळावंसं वाटत असे, पण माझे सगळे सवंगडी कष्टकरी घरातले.             रतन परदेशीच्या वडिलांची अहिल्यादेवीसमोर चन्यामन्याची गाडी होती. भरत राठोडच्या घरात त्या काळी मिळणाऱ्या त्रिकोणी आकाराच्या कागदी पुडीत सुगंधी सुपारी भरायचे काम चालायचे. आमच्या बबन गोळेचा टांगा होता. गणेश नावाचा मित्र ‘अमृततुल्य’मध्ये काम करायचा तर अरुण कुलकर्णीची दुधाची व पेपरची लाइन होती. या मित्रांना दुपारी खेळासाठी बोलवायचे म्हणजे आधी त्यांचे काम संपणे गरजेचे असायचे. मग मी त्यांना कामात मदत करत असे. मला आजही आठवतंय, मी घोडय़ाला खरारा केलाय, गणेशबरोबर हॉटेलात कपबशा विसळल्या, वातीचा स्टोव्ह, पातेली स्वच्छ केली. भरतच्या घरात सुगंधी सुपारीच्या पुडय़ा भरल्या. या कामांची मलाही जशी लाज वाटली नाही तशीच माझ्या घरच्यांनीही मला कधी अडवले नाही. आमचं घर मध्यमवर्गीयाचं होतं, पण श्रमाला महत्त्व देणारी मनाची श्रीमंती माझ्या आईवडिलांमध्ये होती. ही कामे मी करायचो ते केवळ मित्रांनी माझ्यासोबत खेळायला यावं म्हणून. पण मी काम करतोय हे पाहून मित्रांचे वडीलदेखील, कुणी चार-आठ आणे तर कुणी १-२ रुपये मला देत. त्यामुळेच वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच माझी ‘खरी कमाई’ सुरू झाली असे म्हणता येईल. रतन परदेशीच्या चन्यामन्याच्या गाडीनं तर मला त्या वयात मार्केटिंगचं कौशल्य शिकवलं असंच मी म्हणेन. अहिल्यादेवी शाळेसमोर रतनची एक आणि दुसऱ्याची एक अशा दोन चन्यामन्याच्या गाडय़ा उभ्या असायच्या. दुसऱ्या गाडीवरचा चन्यामन्यावाला म्हणजे कळकट पायजमा, शर्टाच्या दुमडलेल्या आणि घामाचे डाग पडलेल्या बाह्य़ा, वाढलेले दाढीचे खुंट आणि कानात अर्धवट विझवलेली बिडी अशा अवतारात उभा असायचा. याउलट मी. आईने तेल लावून नीट भांग पाडायची लावलेली सवय (जी आजही आहे), इस्त्रीचे नसले तरी स्वच्छ धुतलेले कपडे, पायात स्लीपर असा व्यवस्थितपणे चन्यामन्या विकायला उभा असायचो. चन्यामन्याला छान गोडेतेलाचा हात लावून पाणी मारायचो. त्यामुळे ते चमकायचे. मधोमध गुलाबाचं फूलही ठेवायचो आणि मग मधली सुट्टी व्हायची, तेव्हा माझ्याच गाडीवरचे चन्यामन्या सर्वात जास्त विकले जायचे. प्रेझेंटेशनचा हा धडा त्या काळी मी शिकलो तो आजही उपयोगी पडत आहे. अशा रीतीने काम करून तेव्हा वर्षांला २५-३० रुपये कमवीत असे. आम्हा चारही भावंडांना वडिलांनी दिवाळीत आणलेले ५ रुपयांचे फटाके पुरत असत असा तो काळ. अरुणच्या मदतीनं मीही मग सकाळी वर्तमानपत्रे टाकायला सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता जावं लागायचं. एकदा मला चांगलाच उशीर झाला. पोहचल्यावर पेपर एजन्सीच्या मालकानं रागावून माझ्या थोबाडीत मारली. त्याच दिवशी मी ठरवलं, ‘बस्स्! यापुढे नोकरी करायची नाही.’ नंतर मला वेळेच्या शिस्तीचंही चांगलंच भान आलं. पण या घटनेनं आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण दिलं. ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी ठरली. काही दिवसातच माझी स्वतची वर्तमानपत्राची लाइन मी सुरू केली होती. नंतर पुढे भाजी, पुस्तके, लॉटरीची तिकिटे, अत्तरे, फटाके अशा वेगळ्यावेगळ्या गोष्टी विकतच माझं बालपण वळणं घेत गेलं. पुढे दहावीत मी ५६ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. आईची इच्छा होती की मी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं. डॉक्टर होणं शक्यच नव्हतं. तिच्या आग्रहाखातर आणि तिच्या जिद्दीमुळेच..मला वाडिया कॉलेजात प्री-डिग्री सायन्सला प्रवेश मिळाला. मला इंग्रजीचा गंध नसल्यामुळे आणि उनाडक्या केल्यामुळे पहिल्याच वर्षी मराठी सोडून सर्व विषयांत २-३ मार्क मिळाले. मराठीतही सावरकरांवर निबंध लिहिल्याने आमच्या सावरकरप्रेमी सोमणसरांनी मला चक्क ८० गुण दिले होते. पण एकूणातच माझ्या ‘इंजिनीअर’ होण्यावर लाल फुली पडली होती. मी आईला सांगितलं की, तू मला कॉमर्सला घाल आणि एमईएस म्हणजे गरवारे कॉलेजमध्ये मी दाखल झालो. या वळणावर आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. प्री ्रएफ.वाय.मध्ये असताना मी कॉलेजलाइफ छान अनुभवत होतो. याच काळात एक मुलगी माझ्या आयुष्यात आली, जिच्याशी मी आळंदीला जाऊन गुपचूप लग्नही केलं. त्यावेळी एप्रिल-मेच्या सुट्टीत कॉलेजतर्फे मुलांना अनुभवासाठी कंपन्यांमध्ये पाठवलं जायचं. मीही ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’मध्ये काम करण्यासाठी गेलो. तिथे मी त्यांचा त्या काळातला टेलिफोन एक्स्चेंज पाहिला. तो मोठा ईपीबीएक्सचा बोर्ड. फोन आला की ऑपरेटर्स बोर्डावरील वायरींची अदलाबदल करत. या ऑपरेटर्सच्या कानावर विमानातल्या पायलटसारखा हेडफोन असायचा. ते पाहून मलाही खूप आकर्षण वाटायचं. कुठलीही नवीन गोष्ट शिकणं हा माझा स्वभावच होता. तिथल्या सोनपाटकीसाहेबांना मी विचारलं आणि दुपारच्या वेळेत ‘शिक’ म्हणून त्यांनी सांगितलं. मी तिथे बसलो. हेडफोन कानाला लावला आणि तो माईक तोंडासमोर आला तसा मी तो हाताने लांब भिरकावला. कारण त्यात ठेवलेल्या डेटॉलच्या बोळ्याचा उग्र वास मला सहन झाला नाही. तेव्हाही ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’ ही मोठी कंपनी होती. तिथे दर अध्र्या तासाला ऑपरेटर बदलत असत. तेव्हा तो फोन र्निजतुक करण्यासाठी त्या माईकमध्ये डेटॉलचा बोळा ठेवत असत. त्याच वेळी माझ्या मनात कल्पना आली की, याऐवजी सुगंधी अत्तर का असू नये? आणि या एका कल्पनेतून ‘टेलिस्मेल’ हा माझा खऱ्या अर्थाने पहिला मोठा व्यवसाय सुरू झाला. फोन स्वच्छ करून सुगंधित ठेवण्याचे तंत्र माझ्या बायकोनेच शोधून काढलं. त्यासाठी स्वतच्या कानातले डूल आणि ट्रान्झिस्टर विकून तिने मला ७० रुपये भांडवल दिलं. या भांडवलातूनच सुरू झालेल्या या व्यवसायाने पुढे ‘डीएसके’ उद्योगसमूहाचा पाया रचला. या व्यवसायाला सुरुवात केल्यावर किर्लोस्कर ऑईल इंजिनमधले, महाराष्ट्र बँकेतले अनेक ग्राहक मला मिळाले. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशा १२ तासात.. पुण्यापासून चिंचवडपर्यंत मी दिवसभर सायकलवर फिरून सुमारे १५० फोन पुसायचो. सकाळी ऑफिसेस्, गर्दी नसलेल्या वेळेत दुकानात आणि दुपारी घराघरात मी जायचो. ही वेळेची शिस्त मला वर्तमानपत्रातल्या त्या अनुभवानं शिकवली.  रोजचे १५० फोन पुसून माझा रोजचा टर्नओव्हर सरासरी ८० रुपये व्हायचा. महिन्याकाठी २४०० रुपये हातात पडायचे. त्यातला माझा निव्वळ नफा १५०० रुपये होता. आताच्या तरुणांना या नफ्याचे गणित मुद्दाम समजावून सांगायला हवे. १९७० सालातली ही गोष्ट आहे. तेव्हा मी कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षांला होतो. कॉमर्सची पदवी मिळवून बँकेत कारकून म्हणून लागलो असतो तर तेव्हा मला महिन्याला २१० रुपये एवढाच पगार मिळाला असता. साहेबांचा पगार साडेचारशे..अगदी जास्तीत जास्त ८०० रुपये. अशा काळात कुठलीही पदवी नसताना..कॉलेज करून मी १५००-१६०० कमावीत होतो. तेही केवळ कष्टाच्या भांडवलावर! हे करत असताना कॉलेजमध्ये मात्र तासाला बसू शकत नव्हतो. घरी हा उद्योग आणि मी केलेला लग्नाचा उद्योग..दोन्ही माहीत नव्हतं. आईने एक्सटर्नल बसू दिलं नसतं. करावं तरी काय? मग शेवटी ‘नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स’चे प्रिन्सिपल व्ही. के. नूलकरसरांना जाऊन भेटलो. सगळी सत्य परिस्थिती त्यांना सांगून म्हटलं, ‘सर, तुमच्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन द्या. पण मी एकाही तासाला बसणार नाही.’ नूलकर सरही म्हणाले, ‘एका अटीवर. फोन पुसण्याचं काम संध्याकाळी ७ ला संपलं की रात्री आठला माझ्या घरी अभ्यासाला यायचं’..असे गुरू मला त्या काळात लाभले, ज्यांच्यामुळे आयुष्याला योग्य ते वळण देता आलं. या सरांनी मला व्यवसायाचेही धडे द्यायला सुरुवात केली. एकदा मला ५०० रुपयांचे भांडवल हवे होते. तेव्हा नूलकरसर स्वत मला घेऊन ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या नवी पेठ शाखेत घेऊन गेले. तिथे त्यांनी मला आयुष्यातलं पहिलं ५०० रुपयांचं भांडवल मिळवून दिलं. तेव्हा सरांनी मला बजावलं, ‘डी.एस. या बँकेचे हे ५०० रुपये व्याजासकट वेळेवर परत दे. कॉलेजच्या आणि माझ्या नावाची अब्रू राख. तू हे पसे वेळेत परत कर आणि बँकेचा विश्वास संपादन कर. मग बघ, हीच बँक तुला पाच लाखाचंही कर्ज देईल.’ सरांचे ते शब्द अक्षरश खरे ठरले! मी बँकेचा विश्वास मिळवू शकलो. आजही मी मागेल तेवढे पसे द्यायला भारतातल्याच नव्हे, तर परदेशातल्या बँकाही हव्या त्या वेळी तयार आहेत. या विश्वासाच्या खात्यानंही माझ्या आयुष्यातल्या अनेक वळणांवर मला मोलाची मदत केलेली आहे आणि करत आहे. ‘टेलिस्मेल’चा हा व्यवसाय पुण्यासोबतच मुंबई शहरातही जोरात सुरू झाला. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडून सर्व बँका माझ्या ग्राहक होत्या, टेल्को सोडून जवळपास सर्व फॅक्टऱ्यांमधले फोन मी पुसायचो. आता कामाला मुलं ठेवली होती. व्याप वाढत चालला होता. घरगुती फोन पुसता पुसता मी घरातल्या इतर कामांनाही सुरुवात केली होती. कुणाचा नळ बिघडलाय. बदलून दे. कुणाची दारं-खिडक्या दुरुस्त करून दे, फरशी बदल, रंगकाम कर, फíनचर कर..असा घराचा कानाकोपरा बदलत गेलो आणि एक मनात आलं की, आता घराची एवढी कामं आपण करत आहोत तर मग ‘आपणच घर का बांधू नये?’ याच विचारानं आयुष्याला एक नवं वळण मिळालं आणि ‘घराला घरपण देणारी माणसं’ हे ब्रीदवाक्य घेऊन १९८०च्या दशकात मी गृहनिर्मिती सुरू केली. एकीकडे घरं बांधत असतानाच इतर दुसरे व्यवसायही खुणावत होते. मला पुण्यात अमेरिकन वडापाव म्हणजेच मॅक्डोनाल्ड्स सुरू करायचे होते. त्यासाठी कंपनीच्या लोकांना भेटण्यासाठी मी बेंगळुरूला गेलो. तिथं त्यांनी ‘टेरेटरी’ची समस्या सांगत मला दक्षिण भारतासाठी परवानगी देऊ केली. पण मला काही ते पटलं नाही. तिथे माझा बेंगळुरूमधला एक मित्रही होता. त्याने मला ‘टोयोटा’च्या डीलरशिपसाठी सुचवलं. मी त्याही लोकांना भेटलो आणि पुण्याला येताना ‘डीएसके टोयोटा’ ही नवी कंपनी घेऊनच परतलो. आता या वळणावर खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला होता. काही काळातच महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्य़ांमध्ये ‘डीएसके टोयोटा’ची आंतरराष्ट्रीय दर्जाची शोरूम्स व सíव्हस स्टेशन्स सुरू झाली. या कंपनीनं पहिल्या दिवसापासून उदंड यश मिळवलं ते आजतागायत वाढतच आहे. माझं सगळं आयुष्य कष्टातच गेलं असल्यामुळे व्यवसाय करत असताना सामाजिक जाणदेखील मनात असते. कॉमर्सची पदवी मिळूनही तरुण किती कमावू शकतो..याची मला कल्पना होती आणि लॉर्ड मॅकेन्ले नावाच्या इंग्रजाने आपल्यावर लादलेल्या शिक्षण पद्धतीचा तिटकाराही मनात होता. नोकरशाही घडविणारी ही शिक्षण पद्धती आपल्याला बदलता येईल का? हा विचार मनात सतत सुरू होता. यातूनच फ्रान्समधला अ‍ॅनिमेशन, गेिमग व डिझायिनगचा अभ्यासक्रम मी घेऊन आलो आणि पुण्यात ‘डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस’ सुरू केलं. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी तिकडची गोरी मंडळी पुण्यात आणली. इथं पुस्तकी अभ्यास नाही तर तरुणांच्या कल्पकशक्तीला, सृजनशीलतेला वाव दिला जातो. इथं शिकलेला तरुण नोकरीच्या मागे धावत नाही तर जग त्याच्या पाठीमागे येतं. परदेशी मुलंही इथं शिकायला येतात..असं हे जगाला गवसणी घालणारं मोठ्ठं वळण ठरलं. ‘लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करता येईल का?’ आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पडलेला हा प्रश्न. जो सोडविण्यासाठी मी व माझ्या पत्नीने पुढाकार घेतला.  डॉ. माशेलकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सौर ऊर्जेवर चालणारं ‘डीएसके मोबिलीज्’ हे जगातलं पहिलं डिव्हाईस संशोधन करून विकसित केलं. वजनाला हलकं, वापरायला सोपं आणि चक्क ३६ भाषेत बोलणारं हे डिव्हाईस आज बहुउपयोगी ठरलं आहे. मुलं, शेतकरी, बचत गटाच्या बायका, गावातले तरुण यांना त्याचा फायदा होतच आहे. पण या मोबिलीजने आज खेडोपाडी (अगदी चंबळच्या खोऱ्यातही) जाऊन गोरगरिबांची बँक खाती उघडून अक्षरश क्रांती घडविली आहे. पंतप्रधानांच्या ‘जन-धन’ योजनेचं काम गेल्या ४-५ वर्षांपासून या डिव्हाईसवर सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देखील माझ्यासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. या शेतकऱ्यांसाठी मी काय करू शकतो? या प्रश्नातून मी ‘मिल्कोट्रॉनिक्स’ नावाचा ‘रोबो’ तयार केला. शेतकऱ्यांकडे दूधदुभत्याची जनावरं असतातच. पण दूध डेअरीतदेखील त्याची फसवणूक केली जाते. तिथे आता हा रोबो वरदान ठरला आहे. हा रोबो गावोगावी, घरोघरी जातो. दूध तपासून त्यात पाणी किती, युरिया किती अशी त्याची प्रतवारी करून दुधाची किंमतही सांगतो. आणि शेतकऱ्यांची जर आधीची काही देणी असतील तर ती रक्कम कापून उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लगेच जमा करतो आणि शेतकऱ्यांच्या हातात लगेच पसे पडत आहेत. ग्रामीण भागासोबतच शहरी माणसाचं आयुष्यही फार सुखावह नाही..याचीही मला जाणीव झाली. आज या माणसांकडे पसा आहे, पण सुख नाही. प्रदूषण, चिंता, एकटेपण, तणाव अशा अनेक गोष्टींनी त्याला घेरलं आहे. शहरातील मुलं मदानात खेळण्याऐवजी कॉम्प्युटर आणि मोबाइल घेऊन बसली आहेत. यांना आनंदात कसं जगता येईल यावर विचार करत असताना मला माझं बालपण आणि बालपणीचं सुंदर पुणं आठवलं. जिथं नदी होती, झाडे होती, पक्ष्यांची किलबिल होती आणि माणसांमध्ये संवाद घडत होता. आणि तेव्हाच ठरवलं, जगात कुठेही नसेल असं एक सुंदर शहर आपण पुण्यात साकारायचं. जिथं प्रत्येकाला त्याला हवं तसं आयुष्य आनंदात जगता येईल. याच सुंदर स्वप्नातून मी पुण्यात ‘डीएसके ड्रीम सिटी’ साकारत आहे. असा हा माझा वळणदार प्रवास निरंतर सुरू आहे. या प्रत्येक वळणावर समाजाबद्दलची बांधीलकी मला जाणवते आणि ती मी जपतदेखील आहे. ‘देणे समाजाचे, देतो आनंदाने’ असे म्हणत समाजासाठी जे जे करणं शक्य आहे ते सारं मी करत आहे. अशी अनेक वळणं घेत आयुष्य आता पासष्टी ओलांडत आहे. आणखी पुढे किती वळणं आहेत..माहीत नाहीत..पण मीही त्याच झऱ्यासारखा आनंदात..शीळ घालत आजही पुढे निघालो आहे.  डी. एस. कुलकर्णी – dsk@dskdl.com

नाणेफेकीचा ‘कौल’-डॉ. राजन बडवे

करिअर निवडताना ‘आयआयटी’मध्ये जायचं की वैद्यकीय व्यवसायाकडे वळायचं, हा प्रश्न निर्माण झाला होता. गणित उत्तम असल्यामुळे ‘आयआयटी’त जावं, असं एक मन सांगत होतं, तर आजीचा सेवाभाव वैद्यकीय शिक्षणाकडे खेचत होता.. शेवटी निर्णय घेतला टॉस करण्याचा.. पुढेही पदव्युत्तर शिक्षण ‘गायनॅक’मध्ये करायचं की सर्जरीमध्ये? प्रश्न पडला. नाणेफेकीत कौल मिळाला सर्जरीला. ही दोन्ही दानं माझ्या बाजूने पडली म्हणून मनासारखं काम करता आलं. नाही तर? प रमेश्वर तुमच्यासाठी काय योजना आखतो हे त्याचं त्यालाच माहीत असतं.. माझ्या बाबतीतही त्याची काही योजना असावी.. म्हणूनच कदाचित एका नाणेफेकीच्या ‘कौला’नं माझ्या जीवनाची दिशा बदलली.. तसा मी मध्यमवर्गीय कुटुंबातला. वडील महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात काम करायचे, तर आई गृहिणी. माझी आजी, आईची आई इंदुमती पुंडे ही कस्तुरबा रुग्णालयात मेट्रन होती. असाधारण सेवाभाव होता तिच्यात. रुग्णसेवा हाच धर्म होता. तिच्याकडूनच तो वारसा माझ्यात झिरपला. आजीच्या आयुष्याची थिअरी काही वेगळीच होती. कोणत्या वर्षी मनुष्यानं काय केलं पाहिजे याबाबत तिचे आराखडे होते.. ठोस मतं होती.. म्हणजे तिशीपासून चाळिशीपर्यंत सर्वशक्तिनीशी माणसानं काम केलं पाहिजे.. चाळिशीनंतर संध्याकाळचं जेवण कमी करणं, पन्नाशीनंतर बाहेरचं खाणं कमी करणं, सत्तराव्या वर्षी आंबट खाणं सोडणं, ८० व्या वर्षी कडक बिछान्यावर झोपणं आणि नव्वदाव्या वर्षी आसक्ती सोडणं गरजेचं आहे, असं ती सांगायची. यामागे कर्मसिद्धांत होता. आजीचं निधन ७९ व्या वर्षी झालं; परंतु विचार व सेवाभावी वृत्तीची पुंजी ती माझ्यासाठी कायमची ठेवून गेली. आमच्या येथे आठवडय़ातून एकदा ज्ञानेश्वरीवर प्रवचन व्हायचं. साधारणपणे वयस्कर अशी पन्नासेक माणसं जमायची. थोडी लहान मुलं असायची. आजगावकर गुरुजी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर तेथे जमलेल्या सर्वाना एकमेकांच्या पाया पडायला लावायचे. प्रत्येक माणसात परमेश्वर असतो, या भावनेतून या वेळी मोठी माणसे माझ्याही पाया पडायची. मला त्याची मोठी गंमत वाटायची.. आमच्या वडिलांचं गणित उत्तम होतं. ते खुल्या विचारांचे असल्यानं त्यांनी माझ्यावर त्यांचे विचार अथवा मी काय बनावं हे कधीच लादलं नाही. माझंही गणितावर प्रभुत्व होतं. बहुतेक वेळा पैकीच्या पैकी गुण मिळायचे. त्यामुळे ‘आयआयटी’मध्ये जायचं की वैद्यकीय व्यवसायाकडे वळायचं, हा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. गणित उत्तम असल्यामुळे ‘आयआयटी’त जावं, असं एक मन सांगत होतं, तर आजीचा सेवाभाव वैद्यकीय शिक्षणाकडे खेचत होता. काय करावं याचा निर्णय घेता येत नव्हता.. शेवटी निर्णय घेतला टॉस करण्याचा.. नाणेफेकीत जो कौल येईल त्या क्षेत्रात जायचं.. आणि वैद्यकीय शिक्षणाचा कौल लागला. पुढे परळच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला. तेथे डॉ. रेगे, डॉ. मेहता, डॉ. मनू कोठारी, डॉ. रामचंदानी यांच्यासारखे नामवंत शिक्षक लाभले. सेवाभाव आणि शिकविण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या शिक्षकांमुळे आयुष्याला एक दिशा मिळाली. डॉ. भटनागर यांचं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर बारीक लक्ष असायचं. महाविद्यालयीन जीवनात मी क्रिकेट खेळायचो. क्रिकेटचा सचिवही होतो. टेबल टेनिसही उत्तम खेळायचो. याच काळात मृदुलाची ओळख झाली.. केईएममध्येच आमची ‘केमिस्ट्री’ जमली. तिनं फिजिओथेरपीमध्ये शिक्षण केलं. ‘एमबीबीएस’ला मला गायनॅकमध्ये उत्तम गुण मिळाले. त्या तुलनेत सर्जरीमध्ये कमी मार्क होते. त्यामुळे पुन्हा प्रश्न पडला की, पदव्युत्तर शिक्षण ‘गायनॅक’मध्ये करायचं की सर्जरीमध्ये? कारण कॅन्सर सर्जन बनावं असंही वाटत होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ‘टॉस’ केला आणि कौल मिळाला ‘सर्जरी’ला. माझं पदव्युत्तर शिक्षण सुरू झालं.. केईएममधल्या शिक्षणाबद्दल काय बोलायचं.. खरंच आम्ही खूप भाग्यवान होतो. आम्हाला लाभलेले शिक्षक असाधारण कौशल्य असलेले व सेवाभावी वृत्तीचे होते. डॉ. रवी बापट यांच्या किती तरी आठवणी सांगता येतील. बापट सर कधी वॉर्डामध्ये येतील सांगता येत नसे. त्यामुळे आमची वॉर्ड सोडून जायची हिंमत नसायची. डॉ. बापट सरांसाठी वॉर्ड हे दुसरं घरच होतं. डॉ. सम्सी यांचे वर्णन शब्दांच्या पलीकडलं.. सकाळी बाहय़ रुग्ण विभागात रुग्णांना तपासायचं. साधारणपणे दीड-दोन वाजायचे. त्यानंतर डॉ. सम्सी सर वॉर्डात जाऊन रुग्णांना भेटायचे. इथे आमच्या पोटात कावळे कोकलत असायचे आणि डॉ. सम्सी सर प्रत्येक रुग्णाला जाऊन कसा आहेस, जेवलास का, शिरा खाणार का, असं आत्मीयतेनं विचारत असायचे.. कामावरील पराकोटीची निष्ठा कशाला म्हणतात हे डॉ. बापट व डॉ. सम्सी यांच्याकडून शिकायला मिळालं. एम.एस. झाल्यानंतर मी केईएममध्येच पोस्टिंग न घेता कूपरला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं; तथापि कूपर रुग्णालयात प्रत्यक्ष कामाचा खूप अनुभव मला मिळाला. केईएममध्ये डॉ. अविनाश सुपे यांच्याशी गट्टी जमली ती आजतागायत! डॉ. सुपे सध्या केईएमचे अधिष्ठाते आहेत, तर मी गेली आठ वर्षे ‘टाटा मेमोरियल सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम करत आहे. एस.एस. केल्यानंतर कर्करोग शल्यविशारद होण्यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयात ‘हाऊसमन’ म्हणून दाखल झालो. गंमत म्हणजे तेथे पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर हे दिवसभर वॉर्डात माझे रजिस्ट्रार म्हणजे ‘बॉस’ असायचे आणि संध्याकाळी मी त्यांना शिकविण्याचं काम करायचो. एम.एस. केल्यानंतर म्हणजे पदव्युत्तर शिक्षणानंतरही मी तब्बल नऊ वर्षे शिकतच होतो. यात इंग्लंडमध्ये स्तनाच्या कर्करोगावर काम केलं. तिथे तसंच भारतात मला या विषयावर मूलभूत संशोधन करता आलं. कर्करोगाच्या वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास या काळात केला. यातूनच ‘लॅन्सेट’मध्ये माझा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्याची दखल घेऊन इंग्लंडच्या ‘रॉयल कॉलेज’नं त्यांच्याकडे अध्यापनासाठी मुलाखतीला बोलावलं. मला भारतात येण्याची ओढ होती. एक वर्ष भारतात काम करून पाहातो. तिथं जमलं नाही तर परत येईन, असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. इथं संशोधन व कामासाठी वातावरण कसं असेल. माझं जमेल का, हा प्रश्न होता; तथापि टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल झालो आणि पुन्हा वळून बघण्याची गरजच पडली नाही. परदेशात पैसा आहे, संशोधनाला वाव आहे; परंतु रुग्णसेवेचा भाव व रुग्णांशी जुळणारं भावनिक नातं जसं इथे आहे त्याची सर जगात कोठे येणार नाही. जिव्हाळा.. आपुलकी हे पैशाने विकत मिळणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो- केईएममध्ये असताना एका शिक्षकावर मी शस्त्रक्रिया केली होती. कोकणातील कोणत्या तरी गावचे ते शिक्षक होते. निघताना त्यांनी मला गेली तीस वर्षे ते वापरत असलेलं पार्करचं पेन भेट म्हणून दिलं. त्या वेळचे त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे भाव आजही मी विसरू शकत नाही. असाच एक ज्ञानेश्वर नावाचा रुग्ण. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी गेला आणि मला तार पाठवली. केईएममध्ये मला कोण तार पाठवणार, असा प्रश्न पडला. मी शस्त्रक्रिया करत असल्यामुळे माझ्या सहकाऱ्याला तार वाचायला सांगितली. तरेत ज्ञानेश्वरनं लिहिलं होतं, ‘घरी सुखरूप पोहोचलो.’ एक रुग्णाने तर चक्क पिशवी भरून पापलेट आणली होती. असे असंख्य किस्से सांगता येतील. हे सारे परदेशात दिसणारही नाही. टाटा रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी तगमग याचं वर्णनही करता येणार नाही. कर्करोगाच्या पाशातून सुटण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड. जीवन-मरणाच्या या लढाईत डॉक्टरांची सुरू असलेली शर्थीची झुंज.. इथं सारं काही वेगळंच आहे. माणुसकीच्या ओलाव्याच्या अनेक कहाण्या इथं घडत असतात, पाहायला मिळतात. रुग्ण आणि डॉक्टरांचं एक वेगळंच विश्व इथे आहे. डोळे पाणावणाऱ्या अनेक घटना इथे घडतात. एक दिवस ‘श्वास’ चित्रपटातील कथेप्रमाणे एका लहान मुलाला त्याचे आई-वडील घेऊन आले. त्याच्या दोन्ही डोळ्यांत कर्करोग होता. शस्त्रक्रिया करून त्याला वाचवता येणार होते, परंतु दृष्टी जाणार होती. मुलाच्या आई-वडिलांना कल्पना दिली आणि त्याला दाखल करून बेडही दिला. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया होती. सायंकाळी राऊंड घेण्यासाठी गेलो, तर बेडवर कोणीच नव्हते. वाटले, बहुतेक मुलाला घेऊन गेले घरचे. स्वाभाविक होतं. त्यांच्यासाठी निर्णय मोठा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला घेऊन त्याचे आई-वडील आले. त्यांना विचारलं तेव्हा म्हणाले, ‘‘शस्त्रक्रियेचा आमचा निर्णय पक्का आहे. मुलाची दृष्टी शस्त्रक्रियेनंतर जाणार, असं तुम्ही सांगितले. त्याच्या हातात केवळ बारा तास होते. तेवढय़ा वेळात जेवढी मुंबई दाखवता येईल तेवढी रात्रभर फिरवून दाखवली.’’ आजही त्या आठवणीनं डोळ्यांत पाणी येतं. एक तरुण मुलगी टाटामध्ये दाखल झाली होती. तिचा आजार बळावला होता. जास्तीत जास्त सहा महिने तिनं काढले असते. तिच्याबरोबर एक तरुण अहोरात्र तिची शुश्रूषा करायचा. त्या मुलीला बेडवरून उठणंही कठीण होतं; परंतु त्या मुलाचं तिच्यावर प्रेम होतं. तिच्याशी लग्न करायचं होतं. त्यासाठी रुग्णालयातच भटजी बोलावून लग्नही केलं. अशा अनेक घटना हृदयाच्या तारा छेडतात.. मुळापासून हलवून सोडतात. अश्रूंना मोकळेपणे वाट करून देतात. आज जगभरात कर्करोगावर जसं संशोधन सुरू आहे तसंच भारतात ‘टाटा’मध्येही मोठय़ा प्रमाणात सुरू असतं. येथील अनेक डॉक्टरांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध तर होतातच, शिवाय येथील संशोधनावर आधारित उपचार पद्धतीचं अनुकरणही परदेशात केलं जातं. डॉ. डिक्रुझा यांचा मानेमध्ये गाठी असताना शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील शोधनिबंधाची ‘अ‍ॅस्को’मध्ये (अ‍ॅस्को-अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल आँकोलॉजी) दखल घेतली गेली. गर्भाशयाच्या कर्करोगावरील डॉ. दीक्षित यांचा शोधनिबंध ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाला. अशा कित्येक गोष्टी टाटा मेमेरियलमध्ये होत असतात. ‘अ‍ॅटॉमिक एनर्जी’कडून संशोधनासाठी सर्व प्रकारचं सहकार्य मिळतं. यातून काही औषधं तसंच उपचार पद्धतींमध्ये मोठय़ा प्रमाणात संशोधन झालं. गर्भाशयाचा कर्करोग यावर संशोधन केलं. यात एक चाचणी व सर्वेक्षण पद्धती विकसित केली. यासाठी अत्यंत स्वस्तात म्हणजे एका चाचणीसाठी केवळ नऊ रुपये एवढा खर्च येतो. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या शेकडो रुग्णांचा जीव वाचू शकला आहे. आम्ही ‘व्हीआयएफ’ पद्धती वापरून केलेल्या कामामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तीस टक्के रुग्णांना वाचवू शकलो. हा एक प्रकल्प होता. संपूर्ण भारतात याची अंमलबजावणी केली, तर वर्षांकाठी २२ हजार मृत्यू टाळता येतील. अमेरिकेत ‘अ‍ॅस्को’ परिषदेत याबाबतचा शोधनिबंध वाचून दाखवला तेव्हा उपस्थित जगभरातील तज्ज्ञांनी उभं राहून टाळ्यांनी स्वागत केलं. याबाबत काही राज्यांमध्ये आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. एखादं औषध चांगलं आहे, परंतु ते परवडू शकत नसेल तर त्याचा उपयोग काय? आम्ही भारतातील रुग्णांचा विचार करून उपचार पद्धतीचा विचार करतो. ‘तंबाखू मुक्ती’साठीही टाटा मेमोरियलचे सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. तंबाखूमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण प्रचंड आहे. गुजरातमधील एका खेडय़ात एकदा गेलो होतो. तिथे शेताला कुंपण म्हणून तंबाखूची झाडं लावतात. तंबाखूच्या वासाने जनावरं शेतात येत नाहीत असं एका म्हाताऱ्या शेतकऱ्यानं सांगितलं. तो म्हणाला, आता कुंपणच शेत खात आहे. आमची पिढी तंबाखू खाऊन कर्करोगाने मरत आहे. हे सारं थांबायला पाहिजे. तंबाखू मुक्तीसाठी टाटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. देशभरातून टाटा रुग्णालयामध्ये रुग्ण येत असतात. त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचा होणारा खर्च, प्रवासाची दगदग लक्षात घेऊन देशभरात ६४ ठिकाणी कर्करोग केंद्राच्या माध्यमातून एक समान उपचार देण्याची योजना आखली आहे. यासाठी दोन बैठका पार पडल्या असून देशभरातील २९ मोठय़ा कर्करोग उपचार केंद्रांनी यात सहभाग घेतला होता. प्रत्येकाला परवडू शकेल असे उपचार देण्यावर ‘टाटा’चा भर आहे. केवळ मोठय़ा शहरांमध्येच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावरील उपचार पोहोचला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर ग्रिड’च्या माध्यमातून पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. उपचारात सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यात येत आहेत. यासाठी डाटा जमा करणं, संशोधन, प्रशिक्षण आणि उपचार असे सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश व पंजाबमध्ये ठोस कामही सुरू झालं आहे. या साऱ्यांत राज्यकर्त्यांचं सहकार्य आवश्यक असतं. देशाचे माजी व विद्यमान पंतप्रधान तसंच राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्र्यांचं कायमच सहकार्य मिळालं आहे. राजकारणी लोकांमधील एक गोष्ट मला आकर्षित करते, ती म्हणजे, माणसं व त्यांची गुणवत्ता ओळखण्याची त्यांची क्षमता. मी पाहिलेल्या मुख्यमंत्री व पंतप्रधानांसह काही मोठय़ा नेत्यांमध्ये माणसं हेरण्याची शक्ती थक्क करणारी होती. असंख्य व्यवधानं सांभाळताना नेमकी माणसं हेरणं, हा त्यांचा गुण वेगळाच म्हणावा लागेल. पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळाले, मानसन्मान मिळाला. देशविदेशात अनेक मोठय़ा माणसांच्या संपर्कात येऊ शकलो, तरी रुग्णसेवेतून जे समाधान मिळतं ते कशातूनही मिळू शकणार नाही. टाटा मेमेरियल सेंटरमध्ये चालणारं संशोधन व उपचार पाहण्यासाठी परदेशातून तज्ज्ञ डॉक्टर मंडळी येतात. इथल्या कामाचं, त्यातही कमी जागेत मोठय़ा प्रमाणात रुग्णांवर केले जाणारे उपचार पाहून ते थक्क होतात. एक खरं की, उपचारासाठी येणारी रुग्णांची संख्या आणि जागा याचा ताळमेळ तसंच कमी जागेत होत असलेले उपचार याबाबत त्यांचे काही आक्षेप आहेत. त्याचा विचार करून नवी मुंबई तसंच हाफकिन संस्थेत आम्ही विस्तारित कर्करोग प्रकल्प राबविण्याचं काम हाती घेतलं आहे. हाफकिनमध्ये पाच एकर जागेत रुग्णांसाठी तीनशे खाटा व नातेवाईकांसाठी तीनशे खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. नवी मुंबई तसंच मुंबईत आणखी एका ठिकाणी रुग्ण व नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचं काम सुरू असून त्यामुळे टाटा रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण व नातेवाईक रस्त्यावर पथारी पसरून असल्याचं चित्र आगामी काळात दिसणार नाही. माझ्या आजीचा वसा घेऊन माझी रुग्णसेवा सुरू आहे. त्यातून मिळणारं समाधान कोटय़वधी रुपयांनीही विकत घेता येणार नाही. आज मागे वळून बघताना सहज मनात विचार येतो.. तेव्हा नाणेफेकीने आयआयटीत जाण्याचा कौल दिला असता तर? . डॉ. राजन बडवे (संचालक ‘टाटा मेमोरियल सेंटर’) शब्दांकन – संदीप आचार्य sandeep.acharya@expressindia.com

प्रतीक्षा आयुष्य बदलवणाऱ्या भूमिकेची!

‘‘माझं सगळं जगणं ही एक आनंदयात्रा आहे. या आनंदयात्रेचा उद्देश अभिनय पंढरीला जाऊन पोहोचणं हाच होता. तक्रार असेल तर ती एवढीच माझ्यातील पुरेपूर क्षमतांचा वापर करणारी जबरदस्त भूमिका अद्याप मिळाली नाही. आयुष्य बदलवून टाकणारी भूमिका मिळणाऱ्या ‘त्या’ क्षणाची मी आजही वाट पहातोय! मा झं सगळं जगणं ही एक आनंदयात्रा आहे. या आनंदयात्रेचा उद्देश अभिनय पंढरीला जाऊन पोहोचणं हाच होता. या यात्रेत कधी ऊन होतं. कधी सावली होती. कधी आभाळमाया पसरली होती तर कधी संघर्षविजांचा कडकडाट होता. पहिल्यांदा रंग तोंडाला लागला तो ४२ वर्षांपूर्वी. तेव्हाच निश्चित झालं होतं की, मनोजला जगायचंय ते रंगभूमीसाठीच. दुसरं काही, कदाचित, मला जमलं नसतं! आम्ही गुजराती. पण रायगड जिल्ह्य़ातल्या गोरेगावमध्ये २००हून अधिक वर्षे राहतोय, म्हणून मी मराठी! माझे वडील नवनीतभाई जोशी. ते मराठी व गुजराती भाषेत कीर्तन करायचे. मराठी व गुजरातीमधील नारदीय कीर्तन परंपरेचा, ते एक महत्त्वाचा दुवा आहेत. त्यामुळे आमच्या घरात कीर्तनकारांचा कायम वावर असायचा. गोविंदस्वामी आफळे, खरेबुवा, आज करवीर पीठाचे शंकराचार्य असणारे रामचंद्रबुवा कऱ्हाडकर येत असत. वडिलांबरोबरच्या त्यांच्या गप्पा, चर्चा ऐकायला मिळत. तो एक मोठा संस्कार होता. आमच्या शाळेतल्या दानवे गुरुजींनी मला हेरले व शाळेच्या ‘भरतभेट’ नाटकात मला भरताची भूमिका दिली व नंतर मी शाळेच्या नाटकांत कायम काम करू लागलो. वडिलांनी मला कीर्तन शिकवलं, हार्मोनिअम-तबल्याच्या शिकवण्या लावल्या. सातवी पास झालो व आम्ही गोरेगावातून मुंबईत विलेपार्ले येथे राहायला आलो. अगदी ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात आल्यावर मला मोठा सांस्कृतिक धक्का बसला. महिला संघाच्या शाळेत प्रवेश घेतला. आठवीत गणितात नापास झालो. नववीतही तीच स्थिती. माझं गोरेगावमध्ये रमलेलं मन मुंबईत रमेना. वडिलांनी मला पुन्हा गोरेगावला पाठवलं. तिथे मी दहावी उत्तीर्ण झालो. आजोबा होते, काका होते.    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करणारे ‘दलितमित्र’ अधिकारी वकील होते, वडिलांचे शिक्षक व स्नेही भातखंडेशास्त्री होते. भातखंडेशास्त्रींबरोबर दररोज संध्याकाळी मी फिरायला जायचो. त्यांच्याकडून पुराणं, भागवतातल्या गोष्टी ऐकायचो, त्यांनी त्या फिरण्यादरम्यान मला गीता समजावून दिली. लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य उलगडून दाखवलं. चाणक्याचं अर्थशास्त्र उकलून दाखवलं. फार काही कळत नसे, पण कानावर पडत होतं, ते महत्त्वाचं आहे हेही उमगत होतं. त्यांनी लोकमान्यांची भाषणे ऐकून स्वत:च्या हातांनी लिहून काढली होती. माझी चित्रकला उत्तम होती. जे. जे. स्कूलला प्रवेश घ्यावा असं वाटत होतं, पण त्या वर्षी लगेच जमलं नाही. वर्षभर काय करायचं. म्हणून मिठीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला कला शाखेत. वर्गात प्रवेश केल्यावर दिसल्या त्या फक्त मुली. ९५ टक्के मुली होत्या व आम्ही चार-पाच मुलं. आजवर मराठी माध्यमात शिकलेलो. तिथे इंग्रजीत शिकवत होते. काहीच कळेना. मन रमेना. वर्षभर वेळच काढायचा होता. बाहेर आलो तर समोर मराठी वाङ्मय मंडळाचा (मवामं) बोर्ड. नाटकाच्या ऑडिशन्स लावल्या होत्या. नाटकात निवड झाली. नंतरचे दिवस छान गेले. मवामंच्या कार्यकर्त्यांना मान होता आणि नाटकाच्या काळात कूपन्स मिळायची. कॅन्टिनमध्ये खायला मिळायचं तेही फुकट! आईच्या लक्षात आलं की मी वर्गाबाहेरच अधिक असतो. रोजचा दहा रुपयांचा पॉकेटमनी तिने बंद केला, पण माझं नाटक सुरूच राहिलं. मी वाया जाईन असं वाटून तिनं मला पुन्हा गावी कॉलेजात शिकायला पाठवलं. आर्ट्समधून अकरावी. नंतर कॉमर्स! नापास होण्याखेरीज पर्याय नव्हता. मुंबईतल्या सहा महिन्यांत मला इप्टा, आय्.एन्.टी., यूथ फेस्टिवलची जादू कळली. नाटक करायचं तर मुंबईतच असायला हवं. मी नंतरच्या वर्षी मुंबईत परतलो. जे.जे.ला ‘हॉबी पेन्टिंग’मध्ये प्रवेश मिळाला. संध्याकाळी पब्लिकेशन डिझायनिंगचा कोर्स लावला. इतर वेळात नाटक सुरू झालं. वडिलांनी नोकरी करून सर्व उद्योग कर असा सल्ला दिला. पब्लिकेशन डिझायनिंगच्या बळावर नंतर १७ नोकऱ्या केल्या. दोन नाटकांच्या दरम्यान नोकरी करायची. नोकरीत मिळवलेले पैसे नाटकासाठी खर्च करायचे. सर्व तात्पुरत्या नोकऱ्या होत्या. गॅली लावण्यापासून, ते पेज डिझायनिंगपर्यंत सारी कामं करायचो. ‘युवदर्शन’, ‘मध्यंतर’ ते ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’ अशी सतरा पब्लिशिंग हाऊसेस केली. त्यात शेवटच्या ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली’मध्ये मी कायमतत्त्वावर नोकरीवर होतो. येथे एम. जे. अकबर, प्रकाश बाळ यांसारख्या मान्यवरांना नेहमी भेटायची संधी मिळे. पण माझं मन नाटकातच रमायचं. राज्य नाटय़ स्पर्धा, वेगवेगळ्या ठिकाणच्या नाटय़ स्पर्धातून भाग घ्यायचा, कामं करायची, स्पर्धा जिंकायच्या, हरलो तर आत्मपरीक्षण करायचं, असा सारा खाक्या होता. इथेच मला मिहीर भुता भेटला. दाजीशास्त्री पणशीकर हे माझ्या वडिलांचे स्नेही. माझी नाटकाची आवड पाहून दाजींनी मला प्रभाकर पणशीकरांकडे पाठवलं. ते म्हणजे स्वत:च एक संस्था होते. एक माणूस कित्येक लोकांचा पसारा सांभाळतो, दैनंदिन व्यवहार पाहतो, नवनवीन नाटकं निर्माण करतो, ‘तो मी नव्हेच’सारख्या नाटकात चतुराईनं आणि चपळाईनं कपडे बदलतो, लोकप्रिय असतो, तरीही त्याचा अहं न करता हसतखेळत सारं करतो, हे ‘नाटय़संपदा’सोबत असताना मी पाहिलं. जाणवायला लागलं की मराठी रंगभूमीवर केवढे तरी मोठे कलाकार आहेत, हिंदीतही आहेत. आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी स्वत:च नाटक निर्माण केलं पाहिजे, स्वत:ची निर्मिती संस्था असायला हवी. तेव्हा मी एकविशीत होतो. मिहिरशी बोललो. तोही राजी झाला. तो नाटक लिहिणार होता. भातखंडेशास्त्रींबरोबरच्या चर्चेतून कौटिल्य-चाणक्य ही व्यक्तिरेखा मनात ठाण मांडून बसली होतीच.  मिहिरला मला कळलेला चाणक्य सांगितला. ‘तो पुरेसा नाही’ असं तो म्हणाला. मग त्याच्यासमोर ‘मुद्राराक्षस’ नाटक ठेवलं. ‘कौटिलिय अर्थशास्त्र’ ठेवलं. भारतीय विद्या भवन व एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात अभ्यास केला. चाणक्यांचा प्रयत्न एकसंध भारत निर्माण करण्याचा होता, हा उद्देश सर्वासमोर आणायचं ठरवलं. मिहिरने गुजराती भाषेत पदवी मिळवली होती. तो म्हणाला, ‘‘हे नाटक आपण गुजराती भाषेत करू.’’ चार वर्षांच्या अखंड प्रयत्नांतून ‘चाणक्य’ लिहून पूर्ण झाले. त्याचा निर्मितीखर्च, तामझाम अवाढव्य होता. त्या काळात ३० हजार रुपयांची गरज होती. आम्ही दोघेही तसे फाटके! निर्मात्याचा शोध सुरू होता. एक निर्माते आम्हाला सापडले. पण त्यांचा कल वेगळ्या नाटकांकडे होता. मी ‘चाणक्य’ त्यांच्या गळी उतरवलं. त्याच दरम्यान मी पूर्वी ज्या ‘अभियान’मध्ये काम करायचो त्या पब्लिशिंग हाऊसने नाटय़स्पर्धा आयोजित केली होती. पहिलं पारितोषिक एक लाख रुपयांचं होतं. निर्मात्यांना आम्ही विनंती केली, स्टॅम्पपेपरवर लिहून दिलं की, ‘‘जर नाटकाला पारितोषिक मिळालं नाही, तर आम्ही हा खर्च भरून देऊ.’’ प्रयोग झाला. स्पर्धेत परेश रावळ, भक्ती बर्वे आदींसारख्यांनी भाग घेतला होता. आमच्या नाटकाला, मला अभिनयाचं, मिहिरला लेखनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. दुसऱ्या दिवशी मी नोकरीचा राजीनामा दिला. बक्षिसाची अकरा हजार रुपयांची रक्कम आईच्या नावावर बँकेत ठेवली, तिने ती अजून जपून ठेवलीय. त्या दिवसापासून आजवर ‘चाणक्य’ आम्ही निष्ठेनं करतो आहोत. कोणतीही गोष्ट करताना पॅशन हवंच. स्वत:ला झोकून दिल्याखेरीज काहीही होत नाही. तुम्ही तुमच्या कलेला सर्वस्व समर्पण करायलाच हवं. मनाची त्वचा सोलून तिचा होम करायला हवा, तेव्हा कुठे ही रंगदेवता प्रसन्न होते. मी व्यसनांपासून दूर आहे. कलेची धुंदी मला जगण्यासाठी पुरेशी आहे. ‘चाणक्य’ या नाटकानं ही धुंदी फुलवली; राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान, राष्ट्रतेज, एकसंधता या गोष्टी बोलण्याच्या नसून अमलात आणण्याच्या आहेत ही जाणीव दिली. नुकतीच १३ सप्टेंबरला या नाटकाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला हे नाटक करताना काही तरी करण्याची ऊर्मी होती, ऊर्जा होती; आज पंचवीस वर्षांनंतर हे नाटक वेगळं जीवनभान देतं. तीच ऊर्जा, तीच ऊर्मी आज अधिक समंजसपणे व समृद्धतेने मांडता येते. याच नाटकाच्या एका प्रयोगाला रचना वाघमारे स्मिता तळवळकरांना घेऊन आली. विंडोतून प्रयोग पाहिला त्यांनी. स्मिता म्हणाली, ‘‘हा सुटेबल बाज्या आहे.’’ मला काही कळलंच नाही. तिनं सांगितलं, ‘‘इनामदारांच्या ‘राऊ’ कादंबरीवर मालिका करतो आहोत. तुषार दळवी बाजीराव करत होता. पण त्याला जमत नाहीए. तू करशील का?’’ पण हे नाटक जोरात सुरू होतं. म्हणून म्हटलं, ‘‘निर्मात्यांची परवानगी घेतो, मग सांगतो.’’ निर्मात्यांनी परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी आम्ही इनामदारांना भेटलो. त्यांनी आशीर्वाद दिले. म्हणाले, ‘‘पक्के बाजीराव दिसता.’’ आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी ६ ते रात्री १० शूटिंग सुरू. संजय सूरकरांनी ट्रेनमध्येच कथा ऐकवली. २६ दिवस शूटिंग सुरू होतं. पाच मिनिटांचीही फुरसत नसायची. पहाटे ५ला उठायचं. ५.३०ला मेकअप, ६ वाजता पहिला शॉट. त्यानंतर सकाळची न्याहारी. कमालीचा अनुभव! अश्विनी भावे मस्तानी करत होती. प्रेमप्रसंग चित्रित करायचा होता. माझ्या अभिनयाच्या क्षेत्रातला पहिलाच अनुभव. मी बावरलो होतो. अश्विनीच्या कपाळावर ओठ टेकवायचे होते. मी तिला इतक्या जोरात पकडलं की, तिचा विग माझ्या हातात आला. काय झालं असेल नंतर कल्पना करा. दुसऱ्या एका प्रसंगात राऊ मद्यपान करतात. त्या वेळी पितळी ग्लासात कोकम सरबत ओतून ठेवलं होतं. झालं. त्यात रासायनिक प्रक्रिया घडली. मी त्या पेल्यातलं पेय प्यायलो आणि दहा-बारा सेकंदांत उलटय़ा सुरू झाल्या. शूटिंगचा पार विचका झाला. अशा एक ना अनेक गमती. ‘राऊ’ या मालिकेनं कमीत कमी वेळात आपलं सवरेत्कृष्ट कसं द्यायचं, हे शिकवलं. त्यानंतर मी दूरदर्शनवरच्या ‘चाणक्य’ मालिकेत चाणक्याचा मित्र म्हणून आलो आणि मालिकांचा क्रम सुरू झाला. मी असंख्य मालिका केल्या. मालिकांमुळे तुम्हाला प्रचंड लोकप्रियता मिळते. पण अलीकडच्या काळात मालिकांवर टी.आर.पी.चे राज्य आलंय. त्यामध्ये यांत्रिकता येत चाललीय. कामापेक्षा कधी कधी कारागिरी अधिक होतेय. पैसे खूप मिळतात, पण समाधान हरवतंय. हे बदलायला हवं. माझा जीव नाटकात, चित्रपटात रमलेला आहे. हिंदी-गुजराती रंगभूमीवर मी खूप काम केलंय. मराठीत मी फारसा आलेलो नाही. ‘चाणक्य’नंतर नवनवे विषय घेऊन खूप नाटकं केली. ‘गांधी विरुद्ध गांधी’ गुजरातीत केलं, ‘शपथ’ केलं, ‘सुखाशी भांडतो आम्ही’चा गुजराती अनुवाद केला. एकदा ‘हसवाफसवी’चा गुजराती प्रयोग पृथ्वी थिएटर्सवर चालू होता. मस्त रंगला होता आणि अचानक पाय मुरगळला. काही भाग शेवटी बसून केला. नाटकाला बाबा, यशवंत दत्त आले होते. मध्यंतरात ते आत आले व म्हणाले, ‘‘एक दोरी आण.’’ कोणी तरी सुतळ आणली. बाबांनी स्वत: एकेक बोट सुतळीनं विशिष्ट पद्धतीनं, तळपायाच्या सांध्याजवळ बांधलं. तेल घेऊन स्वत:च्या हातांनी मालिश केलं. म्हणाले, ‘‘आता काम कर जा.’’ पुढचा प्रयोग व्यवस्थित केला. केवढा ज्येष्ठ कलावंत पण केवढी आपुलकी! हिंदी चित्रपटांमध्ये खूप काम केले. १००हून अधिक चित्रपट केले. भारतातल्या प्रत्येक मोठय़ा चित्रपट दिग्दर्शकाबरोबर काम केलं. मणिरत्नम, सूरज बडजात्या, संजय लीला भन्साळी, प्रियदर्शन, जॉन मॅथ्यू मत्थन, मधुर भांडारकर, कुंदन शहा, सुधीर मिश्रा हे त्यातील काही. संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’च्या सेटवर एकदा चक्कर येऊन पडलो. असा पडलो की पुढे चार दिवस मी कोमात होतो, काही दिवस मला दिसत नव्हतं, पुढे वर्षभर अंथरुणात पडून होतो. मेंदूत कुठे तरी बारीक रक्तगाठ आली होती. बुद्धी व स्मरणशक्ती शाबूत होती. कोमातून शुद्धीवर आलो तो नाटकाचे संवाद म्हणतच. त्या वेळी विक्रम गोखले, मला भेटायला कायम रुग्णालयात यायचे. खचून गेलेल्या मला धीर द्यायचे. विश्वास द्यायचे. मी त्यांचा कृतज्ञ आहे. सर्व स्थिरस्थावर व्हायला चार वर्षे लागली. मग मला ‘कहता है दिल’ ही मालिका मिळाली व हळूहळू लोकांना कळलं की मी पुन्हा काम करू लागलो आहे. काम मिळू लागलं. त्याच वेळी योगायोगाने मला प्रियदर्शन यांचा ‘हंगामा’ सिनेमा मिळाला. ‘सरफरोश’ हा माझा पहिला चित्रपट होता, पण त्याचा फायदा नाही झाला. ‘हंगामा’मध्ये मी केलेली भूमिका अशीच योगायोगाने मिळाली. प्रियदर्शनना माझ्याबद्दल फारसे माहिती नव्हते. मला ती भूमिका दिग्दर्शकांनी समजावून सांगितल्यावर माझ्या वकुबाप्रमाणे जशी वठवता आली तशी मी वठवली. ती भूमिका मी माझे गोरेगावचे चित्रकलेचे शिक्षक ज्या आवाजात बोलायचे तसा टोन लावून केली. फिल्मच्या ट्रायलला मी गेलो नव्हतो, कारण माझ्या ‘महापुरुष’ या गुजराती नाटकाचा प्रयोग सुरू होता. त्या वेळी मोबाइलवर मला कॉल आला, ‘‘मी प्रियदर्शन बोलतोय.’’ मला कोणी तरी मस्करी करतोय असं वाटलं. मी फोन कट केला. असं चार वेळा झालं. नंतर ‘हंगामा’च्या निर्मात्यांचा फोन आला, ‘‘अरे बाबा, तुला प्रियदर्शन बोलवताहेत. पार्टी सुरू आहे, तू ये.’’ मी रिक्षाने जुहूला गेलो. तोवर सारं संपलं होतं. प्रियदर्शन जिना उतरत होते. त्यांनी मला मिठी मारली व म्हणाले, ‘‘सॉरी मित्रा, मी तुला अंडरएस्टिमेट केलं.’’ त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांची फिल्म जाहीर होते, दोन महिने आधी मला फोन येतो, रोल समजावला जातो व मी ती भूमिका करतो. असे १२ चित्रपट आम्ही केले. बच्चनसाहेब वगळता सर्व मोठय़ा अभिनेत्यांबरोबर मी काम करू शकलो. शिवाय राजकुमार हिरानी, तिग्मांशू धुलिया, आशुतोष गोवारीकरबरोबर अद्याप काम करायचं राहिलंय. राजूबरोबरची एक मोठी संधी हुकली. मुन्नाभाईमधली एक भूमिका देऊ केली. लूक टेस्ट झाल्यावर मी त्याला म्हणालो, ‘‘या भूमिकेपेक्षा मला सर्किटची भूमिका दे. मी फुकट करेन. ती भूमिका तेव्हा मकरंद देशपांडे करणार होता व मुन्नाभाई करणार होता शाहरुख खान. त्याला अपघात झाल्यावर ती भूमिका संजय दत्तला मिळाली व मकरंद ऐवजी अर्शद वारसी आला. निराश अर्शदसाठी ही संधी नशीब बदलवून जाणारी ठरली. ‘‘अरे कुछ नही होगा यहाँ यार,’’ असे वैतागून म्हणणारा इरफान खानही नंतर टॉपला गेला. नवाजुद्दीन सिद्दिकी ‘सरफरोश’मध्ये एका शॉटपुरता होता. आज त्याचं आयुष्य केवढं गतिमान झालंय. ‘तो’ एक क्षण आयुष्यात आला पाहिजे. आजही मी वाट बघतोय अशाच एका क्षणाची! त्या भूमिकेची! ‘चाणक्य’नंतर अर्थातच मी काही छान भूमिका केल्या. ‘गांधी विरुद्ध गांधी’मधला हरिलाल केला. महापुरुषाच्या प्रचंड व्यक्तिमत्त्वासमोर उभा राहिलेल्या, पण पराभूत मनोवृत्तीच्या हरिलालची भूमिका करताना मला स्वत:ला शोधता आलं. हरिलालने बापूंना २७ पानी पत्र लिहिलं होतं. त्यात तो सर्व काही स्पष्टपणे लिहितो, त्यातून मला हरिलाल शोधता आला. तुमच्यात नऊ रसांची माती हवी. शरीर, आत्मा नवरसांचा हवा. मी सतत त्यांचा शोध घेत राहतो. २००८ मध्ये तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही ‘चाणक्य’ या नाटकाचा प्रयोग केला. निमंत्रितांसाठीच तो प्रयोग होता. आम्ही त्या कुटुंबीयांना मदत म्हणून दीड लाख रुपये दिले. अक्षयकुमारने, ‘यार, तू तो बडा काम कर रहा है,’’ असं म्हणून पाच लाख दिले, जॅकी श्रॉफने पंचाहत्तर हजार दिले. त्या दिवशी ओंबळे यांच्या कन्येच्या हाती आम्ही नऊ लाख रुपये सुपूर्द करू शकलो. आज नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. अभिमान वाटतो त्यांचा. सामाजिक जबाबदारीचं भान कलावंताला असतंच, ते असं व्यक्तही व्हावं असं मला वाटतं. मी भाग्यशाली यासाठी की संस्कारांचा समृद्ध वारसा देणाऱ्या घरात ईश्वराने जन्म दिला, योग्य सहधर्मचारिणी मिळाली, छान मुलं देवानं दिली. मनाजोगता व्यवसाय करू शकलो. व्यवसाय हा पैसे कमवायचं साधन न बनता तो आनंद बनला. तक्रार असेल तर ती एवढीच माझ्यातील पुरेपूर क्षमतांचा वापर करणारी एखादी भूमिका मिळावी व ती आनंदयात्रा महाआनंदयात्रा बनावी. माझ्या या प्रवासात चारूची, माझ्या बायकोची साथ मोलाची आहे. एका लग्नात माझी व तिची ओळख जिजाजींनी करून दिली. आम्ही एकमेकांना समजून घेत अडीच वर्षांनी लग्न केलं. त्या वेळी मी नोकरी करत होतो. ऑफिसमधून पस्तीस हजार रुपयांचं कर्ज लग्नासाठी म्हणून काढलं. त्यातले तीस हजार रुपये नाटकावर खर्च केले. चारूच्या हातात पाच हजार ठेवले. काही दिवसांनी ‘चाणक्य’ला पारितोषिक मिळाले. मी तिच्याशी बोलून दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. माझा हा स्वभाव तिने सांभाळला, त्याला कोंदण दिलं, सांभाळलं. उतार-चढाव आले पण त्याचा परिणाम आमच्या संसाराच्या आनंदयात्रेवर तिने होऊ दिला नाही. प्रारंभी तिने शिकवण्या करून संसार उभा केलाय. माझ्या भयाण आजाराच्या काळात ती ठामपणे उभी राहिली, म्हणून तर आजवर मी जे काही थोडंफार करू शकलो ते झालं. आम्हाला दोन गुणी मुलं आहेत. रुद्र आणि धर्मज. चारू आमची दोन प्रॉडक्शन हाऊस सांभाळते. रुद्र, धर्मज आणि मी अशी तीन मुले सांभाळते. शिवाय नाटकात कामंही करते. मराठी चित्रपटात मी खूप मोजकं काम केलंय. बहुधा लोकांना वाटत असावं, मी मराठीत काम करणार नाही. पण तसं नाही. ‘बालगंधर्व’, ‘यलो’, ‘नारबाची वाडी’ मी केलं. ‘वाघ्या’ नावाचा एक चित्रपट अवघ्या चार तारखा जुळू शकल्या नाहीत, म्हणून मला सोडावा लागला. खूप वाईट वाटलं त्या वेळी. नुकताच मी ‘किल्ला’ पाहिला, ‘फँड्री’ पाहिलाय. ‘एलिझाबेथ एकादशी’ हे चित्रपट आवडले. मराठीत जसं काम होतं, तसं अन्य भारतीय भाषांत फारसं होत नाही. प्रेक्षक फारसे वळत नाहीत. भलाभक्कम पाठिंबा असणारे चित्रपट चालतात. ते हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन, महाराष्ट्रात एक पडदा चित्रपटगृहे १७५ आहेत. त्यांना १ टक्के व्याजाने कर्ज देऊन  तंत्रदृष्टय़ा अद्ययावत करा व कटाक्षाने प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवावेत असे बंधन घाला. नवीन निर्मात्यांची मोठी सोय होईल. चित्रपट महामंडळानेही यासंदर्भात भूमिका घेत जबाबदारी उचलायलाच हवी. शब्दांकन- प्रा. नितीन आरेकर  , nitinacomrekar@gmail. - See more at: http://www.loksatta.com/chaturang-news/manoj-joshi-biography-1146892/#sthash.IMHANSLW.dpuf

vijay bhatkar- ‘परम’ विजयानंद !







भारताला संगणक देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शविल्यानंतर जगाला भारतीय बुद्धिमत्तेचे दर्शन घडवायचे या उद्देशाने झपाटलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तरुणांनी ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती केली आणि आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संगणकीय प्रगतीचा पथदर्शी असलेल्यांपैकी एक असलेल्या विजय भटकर यांचा जीवनपट त्यांच्याच शब्दांत. एकीकडे जगातील सर्वात समृद्ध मानला जाणारा भारत जगातील सर्वात गरीब देश होत होता. तर दुसरीकडे देश स्वतंत्र होण्याच्या उंबरठय़ावर होता. या देशाच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या काळात म्हणजेच ११ ऑक्टोबर १९४६ रोजी माझा जन्म झाला, विदर्भातील अकोला जिल्ह्य़ातल्या जेमतेम तीनशे लोकसंख्या असलेल्या मुरंबा या गावी. माझे आई आणि वडील दोघेही त्या काळी गावाकडे आले होते. दोघेही गांधीजींनी पुकारलेल्या स्वातंत्र्य लढय़ात सक्रिय होते. वडील उच्चशिक्षित होते. बी. एड. करून ते मुख्याध्यापक झाले तर आईही देवास येथील एका शाळेत मुख्याध्यापिका होती. महात्मा गांधींनी ‘भारताचा विकास व्हायचा असेल तर आधी गावांचा विकास झाला पाहिजे,’ असे सांगत ‘खेडय़ाकडे चला’ असा नारा दिला होता, तो शिरसावंद्य मानून माझे आई-वडील गावात आले. त्यानंतर त्या भागात सुरू झालेले धार्मिक दंगेधोपे सोडविण्याची जबाबदारी माझ्या वडिलांना देण्यात आली होती. हे काम करताना ते अनेकदा जखमी झाले होते. माझा जन्म झाला आणि लगेचच भारत स्वतंत्र झाला व वडीलही त्या सर्वातून बरे झाले म्हणून माझ्या आईने माझे नाव विजयानंद ठेवले. पुढे त्याचे विजय झाले. घरात शिक्षणाचे वारे आधीपासूनच असल्यामुळे लहानपणापासूनच वाचन सुरू होते. घरात स्वत:चे ग्रंथालय होते. मोठमोठे ग्रंथ याचबरोबर विविध इंग्रजीसह मराठी पुस्तकांचा साठाही त्यात होता. माझ्या जडणघडणीत आजीचा वाटाही मोठा होता. शिस्त आणि इतर संस्कार आजीने माझ्यावर केले. आमच्या गावात एक राम मंदिर होते. तेथेच आमची शाळा भरायची. एकच शिक्षक पहिली ते चौथीचे वर्ग घ्यायचे. यामुळे सगळे वर्ग एकत्रच भरायचे. आजही अनेक एकशिक्षकी शाळा आहेत. पण आम्हाला त्या शाळेत खूप अगदी उत्तम शिक्षण मिळाले. इतकेच नव्हे तर शिक्षकांचे प्रत्येकाकडे बारीक लक्ष असायचे. कुणाला काय येते कुणाला काय येत नाही हेही ते पाहायचे. त्यापुढील शिक्षण गाडगेबाबांनी उभारलेल्या शाळेत झाले. ही शाळा उभारण्यात माझ्या वडिलांचाही वाटा होता. त्या शाळेत रोज सकाळी गाडगेबाबा स्वत: यायचे आणि ती जागा स्वच्छ करायचे. त्यानंतर ते आपलं खापर काढायचे आणि त्यात आम्ही माधुकरी द्यायचो. त्या वेळेस आम्हाला गाडगे महाराज किती मोठे होते हे माहीत नव्हते. ‘बाबांनो उपाशी राहा, पण शिका’ हा त्यांचा मूलमंत्र होता म्हणून त्यांनी ठिकठिकाणी शाळा उभारल्या, धर्मशाळा उभारल्या. त्यांच्या कीर्तनाचे आज अवलोकन करत असताना असे जाणवते की त्यांची संवादक्षमता किती उत्तम होती. ज्याचा वापर आजच्या जीवनात खूप मोलाचा ठरू शकतो. प्रयोगशाळा उभारली माझा एक अट्टहास असायचा की मला माझ्या मोठय़ा भावासोबतच शिक्षण घ्यायचे होते. यामुळे मी थेट चौथ्या वर्गातच शिकायला बसलो. यामुळे माझे शिक्षण लवकर सुरू झाले. आमच्या शाळेत प्रयोगशाळा नव्हती. यामुळे मी आणि माझ्या भावाने ठरविले की आपण स्वत: प्रयोगशाळा उभारायची म्हणून माझे वडील नागपूर, अमरावती किंवा बेंगळुरू असे कुठेही गेले की आम्ही त्यांना सांगायचो आमच्यासाठी टेस्ट टय़ूब किंवा चुंबक आदी गोष्टी आणा. अशा प्रकारे सर्व साहित्य आम्ही जमवले. सी. व्ही. रामन किंवा जगदीशचंद्र बोस यांनी ज्या वेळेस संशोधन केले त्या वेळेस त्यांनाही कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. जगदीशचंद्र बोस यांनी वायरलेसचा शोध लावला तर प्रयोगशाळा मिळत नव्हती. त्या वेळेस त्यांना एकाने एका स्वच्छतागृहात जागा उपलब्ध असल्याचे सांगितले. त्या स्वच्छतागृहात बदल करून त्यांनी प्रयोगशाळा उभारली. म्हणजे आपल्याकडे साधने नाहीत म्हणून हातावर हात ठवून न बसता ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रयोगशाळेचे साहित्य मिळवून प्रयोगशाळा उभारल्या. माझी आजी आम्हाला सांगायची की केवळ एकाच पुस्तकाचं वाचन न करता त्यातील मजकुराशी संबंधित अवांतर वाचन करा. यामुळे आम्ही विविध प्रयोग आणि त्यांचे उपयोग समजत गेलो. शिक्षकांचंही खूप मार्गदर्शन मिळत होते. पुढे मॅट्रिकमध्ये आम्ही दोघेही गुणवत्ता यादीत आलो. आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता. मग माझा भाऊ जीवशास्त्राकडे वळला आणि मी गणित व भौतिकशास्त्राकडे वळलो. रेडिओ बनविला माझे बारावीपर्यंतचे शिक्षण अमरावतीमधील महाविद्यालयात झाले. तेथेही मी जास्तीतजास्त वेळ ग्रंथालयात घालवायचो. आज मराठी माध्यमांच्या मुलांना पदवी शिक्षण सुरू झाल्यावर इंग्रजीची भीती वाटते. तशीच मलाही होती. त्यात मला विज्ञान घ्यायचे असेल तर गणित आणि इंग्रजी आलेच पाहिजे हे कळून चुकले, मग मी तसा प्रयत्न सुरू केला. इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, अवांतर पुस्तके वाचून मी इंग्रजी पक्कं करण्याचा चंग बांधला आणि मला त्यात यश आले. यानंतर मी अभियांत्रिकी शिक्षणासाठी नागपूरला व्हीआयटीमध्ये गेलो. साधारणत: ६३-६४ ची गोष्ट होती. त्या वेळेस चीनचे युद्ध झाले होते म्हणून देशाला जास्तीतजास्त अभियंत्यांची गरज निर्माण झाली. मग आमचा अभ्यासक्रम चार वर्षांऐवजी तीन वर्षांचा केला. अर्थात तो खूप अवघड होता. अगदी नऊ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. त्यात मीही झालो. शालेय शिक्षण लवकर सुरू झाल्यामुळे अवघ्या अठराव्या वर्षीच मी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्या वेळेस इलेक्ट्रॉनिक्स ही स्वतंत्र बॅच नव्हती. पण दुसऱ्या वर्षांत अभ्यासात तो विषय होता. माझ्या जन्माच्या वेळेसच बेल यांच्या प्रयोगशाळेत ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता. आम्ही शिकत असताना आमच्या शिक्षकांनी ट्रान्झिस्टरचे काही भाग आम्हाला दाखविले. ते भाग दुर्मीळ असल्यामुळे त्याचे नुसते दर्शनच आम्हाला घडविले. ते पाहून माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. मग मी स्वत: रेडिओ बनविण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस ही संकल्पना इथे कुणाला माहितीच नव्हती. मग कुणी शिकवायचा प्रश्नच नव्हता. मी आणि माझा भाऊ आम्ही सोल्डरिंग वगैरे स्वत: शिकलो व काम करत राहिलो. अनेक चुका झाल्या पण अथक प्रयत्नांतून ट्रान्झिस्टर रेडिओ तयार झाला. जेव्हा तो रेडिओ टय़ून झाला आणि त्यावर विविध भारती लागलं तेव्हा झालेला आनंद हा महासंगणक बनविल्यानंतर झालेल्या आनंदापेक्षाही खूप खूप मोठा होता. संशोधनाकडे वळलो पदवी मिळाल्यानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत प्रवेश घ्यायचा या उद्देशाने मी मुंबईत दाखल झालो. ज्या दिवशी आमची प्रवेश प्रक्रिया होती त्या दिवशी मुंबईत पूर आला होता. त्यातच आम्ही रात्री त्या वेळच्या व्हीटी स्थानकावर उतरलो आणि रात्रभर तेथेच राहिलो. तेथे माझे पाकीट चोरीला गेले. बॅगेत दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले पैसे काढून मी पुढचा प्रवास केला. आयआयटी मुंबईच्या परिसरात अक्षरश: छातीपर्यंत पाणी साचले होते. आम्ही पोहतच संस्थेत दाखल झालो. पण त्याच वेळी मुंबई नको वाटली. अगदी आयआयटी मुंबईत नंबर लागूनही मी दुसऱ्या पर्यायाचा विचार करायला लागलो. वडिलांनी शिक्षण घेतलेल्या बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्याचे ठरले. त्यानुसार तेथे प्रवेश घेतला. तेथेही समृद्ध ग्रंथालय होते. त्याचा फायदा मला अवांतर वाचनासाठी झाला. एम.ई. पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९६८ आयआयटी दिल्ली येथे दाखल झालो. त्यापूर्वी मला नोकरी मिळाली, पण नोकरी करावी की संशोधनात जावे हा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती तरी आईने मला संशोधनाकडे जाण्याचा निर्णय दिला. आयआयटी दिल्लीत मी सर्व प्रथम संगणक पाहिला आणि माझ्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झाले. अनेक प्रश्न पडू लागले. मग असे कोणते अभियांत्रिकी क्षेत्र आहे की जेथे आपल्याला सर्व शाखांशी जोडता येऊ शकते. मग त्यातून प्रणाली अभियांत्रिकी (सिस्टिम इंजिनीअरिंग)चा पर्याय माझ्यासमोर आला आणि मी त्याकडे वळलो. माझा पीएच.डी.चा अभ्यासही त्याकडे वळविला. इलेक्ट्रॉनिक्स आयोगात समावेश त्या वेळेस बरीच मुलं अमेरिकेत जायची. त्याच वेळेस मी माझा एक प्रबंध अमेरिकी प्राध्यापकासोबत लिहिला. त्यामुळे मलाही अमेरिकेतल्या संधी चालून आल्या. होमी भाभा यांनी साधारणत: ६०च्या दशकात देशाच्या विकासात इलेक्ट्रॉनिक्स महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे हे भाकीत व्यक्त केले होते. पण त्या वेळेस त्याचे महत्त्व कुणाला कळले नव्हते. यालाच अनुसरून साधरणत: १९७०च्या आसपास पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलेक्ट्रॉनिक्स आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. विक्रम साराभाई त्याचे पहिले अध्यक्ष झाले. मग त्यांना जो पहिला मुख्य समूह तयार करायचा होता त्यासाठी त्यांनी माझ्या प्राध्यापकांशी संपर्क साधला आणि त्यात माझी निवड झाली. त्या वेळेस अमेरिकेत जायचे की इथे राहायचे हा माझ्यासमोर प्रश्न होता. आणि मी येथे राहणे पसंत केले आणि आयोगात दाखल झालो. देशातला कलर टीव्ही तयार झाला आयोगाचे काम सुरू झाले त्या वेळेस म्हणजे साधारणत: १९७१ मध्ये इंटेलने चिपचा शोध लावला होता. जगभरात संगणक होते त्यावर संशोधनही सुरू होते. या सर्वात आम्ही असे ठरवले की आपण या सर्वाच्या मूलभूत गोष्टींचा विचार करायचा आणि आमच्या कामाला सुरुवात झाली. त्या वेळेस भारताकडे परकीय चलन नव्हते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कोणत्याही वस्तू येत नव्हत्या. त्या मागवायच्या असल्या तरी भली मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत असे. हे टाळण्यासाठी सर्व भाग भारतातच बनवावे लागत. ते एका दृष्टीने चांगले होते त्यामुळे त्या गोष्टींचा पाया आम्हाला समजला. त्या वेळेस स्वत:ची प्रयोगशाळा असावी अशी गरज निर्माण झाली आणि आम्हाला त्रिवेंद्रमला जागा मिळाली. तेथे वयाच्या ३२ व्यावर्षी मी त्या प्रयोगशाळेचा संचालकही झालो. तेथेच माझी डॉ. अब्दुल कलाम यांची भेट झाली. तेथे आमच्या इलेक्ट्रॉनिक्सवर चर्चा व्हायच्या. या प्रयोगशाळेत संरक्षण खात्याच्या उपकरणांपासून ते कृष्णधवल टीव्हीपर्यंतची संपूर्ण भारतीय बनावटीची निर्मिती होऊ लागली. त्यात सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे १९८२मध्ये. त्या वेळेस आपल्याकडे आशियायी स्पर्धा होणार होत्या. याआधीच्या आशियायी स्पर्धा बँकॉकला झाल्या. तेथे सर्व खेळांचे प्रक्षेपण रंगीत टीव्हीवर करण्यात आले. अर्थात त्यांनी अमेरिकेची मदत घेतली होती. तर आपणही रंगीत टीव्हीवर प्रक्षेपण करावे असे इंदिरा गांधी यांनी सांगितले. आमच्या समोर रंगीत टीव्ही तयार करण्याचे आव्हान होते. या टीव्हीची रचना माझ्या प्रयोगशाळेत तयार झाली. टीव्हीची रचना झाली, पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून रंगीत प्रक्षेपण करता येऊ शकते का हा प्रश्न होता. वेळही खूप कमी होता. त्या वेळेस केरळमधील वैज्ञानिक एबीपी नंबियार यांनी हे आपणही करू शकतो असा आत्मविश्वास दिला आणि सहा महिन्यांत प्रक्षेपण करण्याचे आव्हान स्वीकारले. त्यावर काम करून त्यात आम्हाला यशही आले. त्या वेळेस वसंत साठे हे माहिती आणि प्रसारण मंत्री होते त्यांच्या परवानगीने त्रिवेंद्रम शहरात भारतीय बनावटीच्या पहिल्या रंगीत टीव्हीचे प्रक्षेपण झाले. ते इतके लोकप्रिय झाले की लोक रंगीत टीव्ही खरेदी करू लागले आणि आशियायी स्पर्धाचे प्रक्षेपण रंगीत टीव्हीवर झाले आणि देशाची इलेक्ट्रॉनिक्स क्रांती सुरू झाली. यानंतर प्रत्येक राज्यात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स आयोग उभे राहू लागले. त्या वेळेस सॅमसंग आणि एलजी या कंपन्या आमच्या प्रयोगशाळेत येऊन हे तुम्ही कसे केले हे पाहून गेले. पुढे इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि राजीव गांधी आले. त्यांना यात रस होता. मला एक जोखमीचे आणि गोपनीय काम देण्यात आले ते म्हणजे पंतप्रधान कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षा प्रणाली तयार करण्याचे. ही प्रणाली मी तयार केली आणि ती आत्तापर्यंत कार्यरत होती. या कामादरम्यान राजीव गांधी यांच्याशी विशेष ओळख झाली. ‘परम’चा प्रवास सुरू झाला हवामानाच्या अंदाजासाठी आपल्याला महासंगणक हवा होता आणि आपण तो अमेरिकेकडे मागत होतो. तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचीही त्याला संमती होती, पण हे तंत्रज्ञान आपण कोणत्याच देशाला देऊ नये विशेषत: भारताला, असे अमेरिकी तज्ज्ञांचे म्हणणे होते. रिगन हे उदात्त विचाराचे असल्यामुळे त्यांनी केवळ हवामानाच्या अंदाजासाठी महासंगणक देऊ. त्याचा वापर केवळ हवामानाच्या अंदाजासाठीच झाला पाहिजे. जर दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी केला तर भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लगातील असे सांगितले. हे राजीव गांधी यांना अपमानास्पद वाटले आणि त्यांनी आपण भारतातच महासंगणक तयार करू असे आव्हान दिले. त्या वेळेस योगायोगाने सॅम पित्रोदा भारतात आले होते आणि त्यांनी दूरसंचार क्रांती सुरू केली होती तेही महत्त्वाचे ठरले होते. या महासंगणकाची निर्मिती पुण्यात सीडॅकच्या माध्यमातून होईल अशी संकल्पना मी मांडली आणि त्याला राजीव गांधी यांनी मान्यता दिली. संस्थेत संशोधन पूर्ण होऊन संगणक काम करू लागला. त्यात आम्ही समांतर प्रक्रियेचा वापर केला हे नवीन होते. त्याचे नाव आम्ही ‘परम’ असे नाव दिले. पण त्याच्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. भारताने महासंगणक तयार केला हे कुणी मानायलाच तयार नव्हते. मग मला स्वामी विवेकानंद यांच्या वाक्याची आठवण झाली. ‘आपण आपल्या गोष्टी जोपर्यंत परदेशात जाऊन मांडत नाही तोपर्यंत आपल्या देशातील लोक ते मानणार नाहीत.’ त्यानुसार मी ‘परम’ परदेशात दाखविण्याचे ठरविले. त्या वेळेस महासंगणक या विषयावर झुरीचला एक परिषद होणार होती. तेथे महासंगणक नेण्याचे ठरले. पण संगणक नेणार कसा हा प्रश्न होता. शिवाय राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यामुळे नेमके काय करावे हे समजतच नव्हते. त्याच वेळेस अशी कल्पना सुचली की आम्ही तो महासंगणक पुन्हा वेगवेगळ्या भागात करून तेथे येणाऱ्या लोकांच्या व्यक्तिगत बॅगांमधून घेऊन जायचे ठरवले. अशा रीतीने तो झुरीचला नेला. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी पुन्हा आम्ही तो जोडत होतो. पण एवढी मोठी संगणक प्रणाली जोडणे शक्य होईल की नाही अशी भीती होती. ते काम सुरू असताना आगही लागली. मात्र या सर्वावर मात करून आम्ही तो संगणक जोडला आणि तो सादर केला. त्या वेळेस जगाने ‘परम’ची दखल घेतली आणि बरोबरीने भारतानेही दखल घेतली. मग या प्रकल्पाला गती मिळायला लागली. संगणकात भारतीय भाषा दाखल झाल्या राजीव गांधींनी सुरू केलेला हा प्रकल्प बंद करावा अशी राजकीय भूमिका तयार झाली. आमचे सर्व अनुदानही बंद झाले. महासंगणक तयार झाला तरी तो तळागाळात पोहोचणार नाही, त्यासाठी संगणक क्रांती महत्त्वाची होती. त्या वेळेस अशी अवस्था होती की संगणक इंग्रजीत होता आणि देशात केवळ सात टक्के लोकांनाच इंग्रजी येत होते. यामुळे भारतीय भाषांमध्ये संगणक यावा किंवा संगणकात भारतीय भाषांचा समावेश व्हावा यासाठी आम्ही काम सुरू केले. त्या वेळेसच्या १४ भाषा आणि दहा लिपींचा अभ्यास करू लागलो. यासाठी त्या वेळेस आमच्या प्रयोगशाळेत भाषातज्ज्ञ, संगणकतज्ज्ञ सर्व एकत्र येऊन काम करू लागले आणि पहिली चिप तयार झाली. ज्याचा वापर संगणकात भारतीय भाषेसाठी होऊ लागला. यातून सीडॅकला निधी मिळू लागला आणि पुढचे संशोधन सुरू राहिले. काही काळातच ‘परम १००००’ तयार झाला. हा ‘परम’ आता आपल्या मोबाइलमध्ये सामावलेला आहे. महा महासंगणक हे सर्व काम करत असताना सगळं क्षणिक आहे हे जाणवलं आणि शाश्वत काय आहे याचा शोध मी घेऊ लागलो. यातून मी अध्यात्माकडे वळलो आहे. त्यातही विज्ञानाचं सार शोधत मी रमतोय. आता नुकताच भारत सरकारने महा महासंगणकाच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. त्याचे कामही सुरू झाले असून या नवीन संगणकाच्या माध्यमातून आपण एका सेकंदात दहा लाख खर्व गणिती आकडेमोड करू शकणार आहोत. आम्ही शून्यातून सुरू केलेले माहिती तंत्रज्ञानाचे काम, सध्या भारताची त्यात १०० करोडहून अधिक गुंतवणूक आहे. यामुळे जागतिक स्पध्रेत टिकून राहण्यासाठी आपल्याला या संशोधनाची मोठी गरज भासणार आहे. डॉ. विजय भटकर – शब्दांकन : नीरज पंडित -niraj.pandit@expressindia.com

अदृष्टाच्या वाटेवर..

एका चित्रपटाच्या वेळी क्लॅप देताना चुकलो. माझ्यावर शिव्यांचा भडिमार झाला.. मला सेटवरून हाकलून दिलं गेलं.. पुढचे पंधरा दिवस मी रोज सेटवर जायचो नि ते मला बाहेर काढायचे. रोज रात्री रडायचो, आईचे शब्द आठवायचे. अदृष्टाच्या वाटेवर काय होतं कुणास ठाऊक.. मी इंजिनीअर होतो. तरीही कोणाच्याही शिव्या खात होतो, कारण मला हेच करायचे होते.. आज त्याच वळणाने मला कॅमेरामन, दिग्दर्शक म्हणून ओळख दिली.. किती वळणं आयुष्यात येतात आणि जातात. त्या वळणांवर कधी आपण विसावतो, तर कधी त्या वळणांना वळणं देत देत पुढे जात राहतो. माझ्या आयुष्याच्या वळणवाटाही कधी मला वळणं देत गेल्या, कधी वळणांवर आणून सोडत गेल्या, तर कधी त्यांना मी वळण देत गेलो; पण प्रत्येक वळणावर मला सापडत गेलं ते आयुष्य! मी पहिल्यापासून नाटकवेडा, सिनेमावेडा. आई- मीना जाधव शिक्षिका होती, तर वडील- शांताराम जाधव बँकेत नोकरी करत होते. त्यांना मी अप्पा म्हणायचो. मी एकुलता एक. त्यामुळे माझ्याकडून सर्वसामान्य मध्यमवर्गीय आईवडिलांना ज्या अपेक्षा होत्या, त्याच त्यांच्याही होत्या; पण मी त्यांच्या अपेक्षांपेक्षा वेगळा होतो. ठाण्याच्या एम.एच. हायस्कूलचा मी चांगला विद्यार्थी होतो. शाळेतल्या नाटकात वगैरे कामं करायचो. गडकरी रंगायतनच्या परिसरात भटकत राहायचो. विनय आपटे, संजय मोने हे माझ्या लेखी परमेश्वरच! रंगायतनच्या जवळ विनय आपटे, संजय मोने, विक्रम गोखले दिसले, त्यांनी आमच्यासमोर चहा प्यायला की, आम्हाला वाटायचं यांच्यासारखं स्टायलीत चहा प्यायला हवा, त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारायला हव्यात. माफक अपेक्षा होत्या. आईला हे अजिबात मान्य नसायचं. ती अभ्यासाविषयी जागरूक असायची. तिच्या आग्रहापोटी केमिकल इंजिनीअिरगला प्रवेश घेतला; पण तिथे काही शिकण्याऐवजी मी रंगायतनमध्ये पडीक असायचो. ठाण्यात त्या वेळीही नाटकाचं वातावरण जोरात असायचं. प्रमोद कुलकर्णी, विजय जोशी, अशोक बागवे, उदय सबनीस, श्रीहरी जोशी सर, विनोद कुलकर्णी, शरद बागवे, कलासरगम, मित्रसहयोग, अशा लोकांनी, संस्थांनी नाटकाचं वातावरण पेटतं ठेवलं होतं. घरी अजिबात कळू न देता माझे नाटकाचे उद्योग सुरू असायचे. रंगायतनात सेट मांडायला मदत करण्यापासून सारी कामं हौसेनं करायचो. ‘अदृष्टाच्या वाटेवर अश्वत्थाची मुळं’ यांसारखी महत्त्वाची प्रायोगिक नाटकं आम्ही केली. स्पर्धात जिंकलो. एकदा असंच ‘कल्पना एक : आविष्कार अनेक’ स्पर्धेसाठी आम्ही ‘अश्वत्थाची मुळं’ ही एकांकिका केली. मी यूनकचं काम करत होतो. मुख्य भूमिका होती. घरी सांगितलं की, आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत. स्पर्धा झाल्यावर घरी पोहोचलो. लेक्चर कसं रंगलं, उशीर का झाला याच्या कहाण्या तयार करून आईला सांगितल्या व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रांमध्ये माझा फोटो, बक्षीस वगैरे सगळं छापून आलेलं. झालं. माझं भांडं फुटलं. आईनं झोपेतनं उठवून विचारलं. ती वैतागलेलीच. मग सगळं स्पष्ट केलं व कबुलीजबाब दिला. तिला मी केमिकल इंजिनीअरच व्हायला हवा होतो. मग मी केमिकल इंजिनीअिरग पूर्ण केलं. तिची इच्छा पूर्ण केली. त्या वेळी आई-अप्पांच्या सांगण्यावरून मी नोकरीसाठी कुठे कुठे अर्ज करायचो. त्यांची कॉल लेटर्स यायची; पण मी पोस्टमनला पटवून ठेवला होता. माझी कॉल लेटर्स तो माझ्या हातात आणून द्यायचा व मी ती नष्ट करायचो. आईला प्रश्न पडायचा की, इतरांना नोकरीच्या मुलाखतींसाठी पत्रं येतात, आपल्या संजूलाच का येत नाहीत? आई-अप्पांना एके दिवशी सांगून टाकलं की, मला नाटक, सिनेमातच काही करायचंय. अप्पा निवृत्तीला आले होते. ते म्हणाले, ‘‘अजून वर्षभर तू प्रयत्न कर. नाटकात, सिनेमात काही जमलं नाही तर मात्र नोकरी कर.’’ मी कबूल झालो. माझी धावपळ सुरू झाली. संपूर्ण ठाण्यातून त्या नव्वदीच्या दशकात एकटा नंदू लबडे व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचा. त्या वेळी ‘चारचौघी’ नाटक सुरू होतं. त्यामध्ये काम करणाऱ्या सुनील बर्वेला दुसरं काही करायचं होतं. त्या वेळी मी त्याच्याबदली ‘चारचौघी’मध्ये काम केलं. नंदू लबडे मला म्हणाला की, ‘‘तुला अभिनय वगैरे करायचे असेल तर आधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम कर. त्याचा फायदा होईल. तुला कॅमेऱ्याचं ज्ञान हवं, ते तिथे मिळेल.’’ त्यानंच मला नंतर कुमार सोहोनींकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला पाठवलं व मला चित्रपटाचा कॅमेरा दिसला. त्यांच्याकडे मी ‘आहुती’, ‘अनुराधा’सारखे चित्रपट साहाय्यक दिग्दर्शक म्हणून केले. त्यापूर्वी स्वानंद किरकिरेचे काका डब्बू किरकिरे यांनी मला गिरीश घाणेकरांकडे पाठवलं. त्यांची तेव्हा ‘आमचा हसवण्याचा धंदा’ नावाची मालिका सुरू होती. त्या मालिकेत एक छोटासा रोल होता. भल्या सकाळी मी वरळीच्या एक्सेल स्टुडिओमध्ये पोहोचलो. गिरीश घाणेकरांनी मला बघितलं व म्हणाले, सेल्समनचा रोल आहे. हा त्याला सूट नाही. सगळी स्वप्नं कोसळली; पण आता आलोच आहोत तर शूटिंग काय ते पाहू या म्हणून थांबलो. शूटिंग पाहता पाहता एक माणूस कडक कपडय़ात, डोक्यावर हॅट व सिगरेट तोंडात ठेवून टेचात वावरताना दिसला. प्रत्येक जण त्याच्याशी आदरानं बोलत होता. अगदी अशोकमामा (सराफ) सुद्धा त्याच्याजवळ जाऊन विश करून गेले. सारे जण त्याचं ऐकत होते. तो कोणत्या तरी मोठय़ा डब्यातून बघत लायटिंग वगैरे काही तरी करत होता, लोकांना सांगून कामं करवून घेत होता. ते त्या मालिकेचे कॅमेरामन बेंजामिन होते आणि तेच करायचं मी पक्कं केलं. अप्पांची नोकरी संपण्यापूर्वी स्वत:च्या पायावर उभं राहायला हवं. कॅमेरामनच बनावं म्हणून मग मी फोटोग्राफीवरची पुस्तकं वाचून काढायला सुरुवात केली. अप्पांनी त्या वेळी कर्ज काढून मला पंचवीस हजारांचा कॅमेरा खरेदी करून दिला. (तो कॅमेरा आजही माझ्याजवळ आहे. माझे साहाय्यक तो वापरतात.) दादरला श्रीकांत मलुष्टे यांच्याकडे छायाचित्रण कला शिकलो. छायाचित्रण ही एक अशी गोष्ट आहे की, ती एकदा शिकली की, तुमची गुंतवणूक ठरते.मी कॅमेरामन म्हणून काम करायचं ठरवलं आणि माझी उमेदवारी सुरू झाली. क्लॅप कसा द्यायचा, क्ल्यू कसा द्यायचा वगैरे गोष्टी शिकत होतो. अतिउत्साहात चुकाही करत होतो. त्यासाठी शिव्या खात होतो; पण निमूटपणे शिकत होतो. एका चित्रपटाच्या वेळी क्लॅप देताना चुकलो. माझ्यावर शिव्यांचा भडिमार झाला नि मला सेटवरून हाकलून दिलं गेलं. पुढचे पंधरा दिवस मी रोज सेटवर जायचो व ते मला बाहेर काढायचे. रोज रात्री रडायचो, आईचे शब्द आठवायचे. इंजिनीअर होतो. तरीही कोणाच्याही शिव्या खात होतो; पण मला हेच करायचं होतं. जिद्दीनं पुन्हा सेटवर जायचो. या शिव्या खाताना मी मनात ठरवलं होतं की, ‘उद्या जर काही बनलो तर असं नक्कीच वागायचं नाही.’ या शिव्यातून मी शिकत गेलो, सुधारत गेलो, सतत सावध राहू लागलो, तांत्रिकदृष्टय़ा पक्का होत गेलो.माझ्या चित्रपटात कॅमेऱ्याच्या डावी-उजवीकडच्या उडय़ा दिसणार नाहीत. माझा स्क्रीन प्ले चुकू शकेल, पण तांत्रिक चुका दिसणार नाहीत, याचं कारण त्या दिवसांत दडलेलं आहे. नंतर कुणी तरी कुठे तरी बोलवायचे. मी जायचो. एकदा मला जयवंत राऊत यांनी बोलावलं. मी त्यांना जयूदादा म्हणतो. एक ऋणानुबंध पक्का झाला. दरम्यान अप्पा निवृत्तीकडे झुकले होते. त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा कर्ज घेऊन ‘स्टुडिओ व्हिज्युअल्स’ नावाचा स्टुडिओ सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. स्टुडिओ सुरू असताना मी      गिरीश कर्वेसोबत काम करू लागलो. एका चित्रपटात उषा नाडकर्णी काम करत होत्या. त्यांना मी गिरीश सरांचा मुलगा आहे असं वाटे. त्यांनी मला नरेन कोंडरा यांच्याकडे पाठवले. त्यांच्यासोबत मी सहा वर्षे काम केलं. भरपूर काम केलं. जाहिराती केल्या. कॉपरेरेट फिल्म्स केल्या, माहितीपट केले. खूप शिकायला मिळालं. त्यानंतर शरद बागवे यांच्यामुळे मला नितीन केणी सरांनी ‘झी’ नेटवर्कवर साहाय्यक कॅमेरामन म्हणून घेतलं. ते त्याचे अध्यक्ष होते. ‘झी’वर आम्ही तीनच कॅमेरामन होतो. केली मेस्त्री, गुरू पाटील हे ज्येष्ठ व मी साहाय्यक. त्या दरम्यान ‘झी’नं दुबईला आपलं युनिट उभं केलं. ते दोघे दुबईत गेले व मी मुंबईत. येथे भरपूर काम केलं. ‘फिलिप्स टॉप टेन’, ‘लक्स क्या सीन है’, ‘हमजमीन’, ‘ड्रीम मर्चण्टस’ असे शोज केले. घरी फक्त आंघोळ करण्यास जायला मिळायचं. त्यामुळे एक फायदा झाला की, कॅमेऱ्यावर हात साफ झाला. त्या वेळी लग्नाची शूटिंग्जही घ्यायचो. एका बाजूला टॉक शोज, वॉक, पॉप्स, चॅट शोज, डॉक्युमेंटरीज आणि दुसऱ्या बाजूला वेडिंग शोज. या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लाइट्स असतात, ताबडतोब निर्णय घ्यावे लागतात, कॅमेऱ्याच्या खिडकीतून ताबडतोब लाइट्स अ‍ॅडजेस्ट करून शूटिंग करावं लागत असे. याचाच फायदा पुढे ‘डोंबिवली फास्ट’ करताना झाला. धावत्या ट्रेनमधून प्रकाश सतत बदलत असतो. तेच तंत्र इथे वापरलं. ‘झी’वरची नोकरी सुरू होती. काम होतं; पण मला सिनेमाचे वेध लागले होते. एके दिवशी सकाळी मी ‘झी’चा राजीनामा देऊन टाकला व नंतर वर्षभर अक्षरश: बेकार होतो. काही काम नाही. उत्पन्नाचं साधन नाही. साधारण वर्षभरानंतर मला ‘दलाल स्ट्रीट जर्नल’मध्ये कॅमेरामनची नोकरी मिळाली. ‘पुनश्च हरी ओम’ म्हणून कामाला लागलो. काही महिन्यांनी ही नोकरी सोडली व हिंदी मालिका करायला सुरुवात झाली. तेव्हा आजच्यासारखे भरपूर चॅनेल्स नव्हते. ‘दूरदर्शन’ व ‘झी’ एवढेच. तेव्हा मालिकांना झटकन परवानग्या मिळत नसत; पण पायलट एपिसोड्स बनवण्याचं नवं फॅड आलं होतं. मी त्या वर्षांत ३० पायलट एपिसोड्स बनवले होते. त्यातल्या अनेक मालिका बनल्याही नाहीत. या दरम्यान अरुण गोविलची ओळख झाली. त्याच्या एका मालिकेच्या पायलट एपिसोडबरोबरच भोपाळला जाऊन आम्ही २० भागही चित्रित केले होते. याच काळात माझी लहानपणापासूनची पंजाबी मैत्रीण प्रोमिताबरोबर माझं लग्न झालं. माझ्या तोवरच्या साऱ्या प्रवासात आई-अप्पांइतकीच प्रोमिताची साथ व प्रोत्साहन महत्त्वाचं होतं. तिनेच मला विशीमध्ये सिनेमा जगतात प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्यामुळे मी प्रतिकूल परिस्थितीतही सार्थपणे झगडत राहिलो.पायलट एपिसोड्स करताना मी बदली कॅमेरामन म्हणूनही काम करत होतो. संजय मेमाने, राजू हलसगी यांसारखे मित्र त्या काळात लाभले. आजही ते माझे घट्ट मित्र आहेत. या मालिका करत होतो; पण ओळख मिळत नव्हती. प्रोमिता सांगायची, ‘माझा नवरा कॅमेरामन आहे.’ पण नाव दिसत नव्हतं. नव्वदीच्या अखेरच्या काही वर्षांत मंदार देवस्थळींनी एक टेलिफिल्म बनवली, ‘अभिनेत्री’ नावाची. विनय आपटे व वंदना गुप्ते त्यात होते. विनयजींसोबत काम करायचं बालपणापासूनचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना माझं काम आवडलं. त्यांच्यासोबत खूप जाहिरातपट, कॉपरेरेट फिल्म्स केल्या.   या टप्प्यावर विनय आपटे यांची एक नवी मालिका दूरदर्शनवर येणार होती. प्रारंभी तिचं प्रसारण आठवडय़ातून एकदाच असणार होतं. त्याच वेळी ‘झी’ने मराठी वाहिनी सुरू करायचं ठरवलं व ती मालिका डेली सोपच्या स्वरूपात अल्फा चॅनेलवर सुरू झाली- ‘आभाळमाया’. या मालिकेनं आम्हाला ओळख दिली. मी हिंदी मालिका, चित्रपटातून मराठीत काम करायला गेलो होतो. साहजिकच प्रकाशयोजनेसाठी मी भरपूर वेळ घ्यायचो. व्यवस्थित काम झालं पाहिजे हाच उद्देश होता. सुकन्या कुलकर्णी तेव्हा प्रस्थापित कलाकार होती. तिच्यासकट सारे वैतागायचे. एके दिवशी सुकन्यानं मला सेटवर थोडंसं बाजूला बोलावलं व त्याबद्दल खूप सुनावलं. मी निमूट ऐकून घेतलं. नंतर सारेच बोलू लागले, ‘‘संजय फार वेळ खातो. त्याला बदला.’’ पण विनयजी ठाम होते. ते म्हणाले, ‘‘शो विकायचाय तर संजयच हवा.’’  प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या एक दिवस आधी आम्ही सारे पहिला भाग पाहायला बसलो. तो पाहून पूर्ण झाल्यावर सुकन्या मोठय़ा मनानं साऱ्या युनिटसमोर मला म्हणाली, ‘‘मला माहीत नव्हतं, तू काय करतोयस ते. जे काही केलंस ते अप्रतिम आहे.’’ आजही सुकन्या मला राखी बांधते.‘आभाळमाया’बरोबरच मी हिंदीत शोभना देसाईंसोबत काम करत होतो. त्यांच्या सुपरहिट ‘एक महल हो सपनों का’, प्रारंभी बाबा सावंत करत होते, नंतर ती मालिका मी करू लागलो. शोभना देसाई, जे.डी. मजेठिया, अतीश कपाडिया यांच्यासाठी मी निदान पायलट एपिसोडस् करावेत असा त्यांचा आग्रह असे. ते मला लकी समजत असत. दरम्यान हर्षदा खानविलकर व माझी मैत्री झाली आणि आम्ही ‘हॅपनिंग्ज अनलिमिटेड’ या नावानं निर्मिती संस्था काढली. आम्ही ‘बेधुंद मनाच्या लहरी’ ही मालिका निर्माण केली. ‘झी’वर ही मालिका लोकप्रिय झाली. यामुळे आमचे कॉन्टॅक्स वाढत गेले. उमेश जाधव, अंकुश चौधरी, सोनाली खरे, दीपा तेली या मालिकेत होते. राजीव पाटील या मालिके त साहाय्यक होता. तो पुढे लिहू लागला व नंतर मोठा दिग्दर्शक बनला. त्यानं ‘सावरखेड एक गाव’ हा सिनेमा बनवला. जणू काही तो शेवटचा चित्रपट असावा या पद्धतीनं आम्ही झपाटल्यासारखं काम केलं. हा चित्रपट पूर्ण होतोय तोवर संजय सूरकर यांच्या ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट माझ्याकडे आला. ज्यांच्या चित्रपटांकडे पाहत मी वाढलो त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर गौतम जोगळेकरांचा ‘पक पक पकाक’ हा चित्रपट केला. तिथे नाना पाटेकर यांची ओळख झाली. वेगळाच माणूस! ‘डोंबिवली फास्ट’मध्ये आमची साऱ्यांची काहीतरी करून दाखवण्याची अस्वस्थ ऊर्जा काम करत होती. माझा तो तिसरा चित्रपट होता तर बाकीच्यांचा पहिलाच. एका रात्रीत चित्र बदलतं असं म्हणतात, त्याचा अनुभव आम्हा साऱ्यांना त्यावेळी आला. मी ‘डोंबिवली फास्ट’च्या प्रीमिअरला जाऊ शकलो नव्हतो, कारण त्यावेळी मी पुण्यात ‘आई शपथ’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो. गुरुवारी लोक माझ्याशी जसं वागत होते शुक्रवारचं त्यांचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. लोकांच्या अगदी युनिटच्या पाहण्याचा दृष्टिकोनात सकारात्मक बदल दिसत होता. ‘डोंबिवली फास्ट’नं खूप काही दिलं. त्या चित्रपटानंतर कॅमेरामनला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या मला विनातक्रार कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडून मिळू लागल्या. ‘डोंबिवली फास्ट’ची तामीळ आवृत्ती निघाली होती. तिच्या शूटिंगच्या वेळी आमच्या छायाचित्रण कलेतील दंतकथा मानावी असे प्रतिभावंत पी. सी. श्रीराम त्या सेटवर आले. त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी माधवन व निशिकांतना सोबत घेऊन गेलो. माझ्यावर खूप दडपणं आलं होतं. मी पी.सी सरांसमोर खाली मान घालून बसलो होतो. ते पुढचा तासभर ‘डोंबिवली फास्ट’मधल्या  त्यांना आवडलेल्या गोष्टीसंबंधी माझ्याशी बोलत होते आणि  माझ्या डोळ्यातलं पाणी  थांबत नव्हतं.हळूहळू नाव मिळत होतं. लोकांना काम आवडत होतं. आता मला दिग्दर्शक बनावंसं वाटत होतं. हेमंत देवधरांसोबत वाईला एक जाहिरात शूट करत होतो. अचानक पाऊस आल्यामुळे शूटिंग थांबलं. आता करायचंय काय? मी कोरे कागद मागवले आणि दोन वाजेपर्यंत ‘चेकमेट’ चित्रपटाचा कच्चा स्क्रीन प्ले लिहून काढला. हेमंतसरांना दाखवला. तो त्यांना आवडला. मग दोन तासांचा पूर्ण स्क्रीन प्ले लिहिला. विवेक आपटेंनी त्याचे संवाद लिहिले. हा चित्रपट आपण करू या हा विचार डोक्यात होता. मी वेगवेगळ्या निर्मात्यांना तो ऐकवत होतो. तो चित्रपट गुंतागुंतीचा होता. अखेरीस एक निर्माता मिळाला. काम सुरू झालं. त्या वेळेपर्यंत डोक्यातली हवा निघून गेली होती. यावेळी आर्थिकदृष्टय़ा मी व हर्षदा खूप अडकलो. हर्षदा त्यावेळी ठामपणे उभी राहिली नसती तर हार्ट अ‍ॅटॅकने मेलो असतो. जेवढे पैसे मिळवायचो तेवढे व्याजात जात होते.एकदा रवी काळे डबिंगसाठी आला होता. मीही त्यावेळी तेथे पोचलो. रिक्षानेही जाण्याइतके पैसे खिशात शिल्लक नव्हते. डबिंग स्टुडिओत चालत गेलो. रवीने चहा मागवला. चहावाला पैशांसाठी तिथेच उभा राहिला. त्यालाही देण्यासाठी पैसे नव्हते. संजय मौर्यने खिशात हात घालून त्याचे पैसे दिले. मी विचारात पडलो, एवढं प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा असं का होतंय? कुणाला मी दुखावलं म्हणून असं होतंय का? आणि मग ज्यांना ज्यांना दुखावलंय असं मला वाटत होतं त्यांची मी एक यादी तयार केली. ज्यांचे दूरध्वनी नंबर माहीत नव्हते, त्यांचे नंबर मिळविले व त्यांना प्रत्येकाला फोन केला. अगदी प्रत्येकाला ,‘‘मी तुम्हाला या या वेळी दुखावलंय. मला क्षमा करा.’’ अशा शब्दांत माफी मागितली. आपल्या सवयीनं दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो. आपणास कोणलाही दुखवण्याचा अधिकार नाही. एक व्यक्ती म्हणून माझ्यात त्या दिवशी बदल झाला. या घटनेनंतर माझ्या आयुष्यात फक्त चांगलीच माणसं आली. अनिल सातपुते मला भेटले. त्यांनी ‘चेकमेट’ रिलीज केला. त्याला थोडं यश लाभलं. भविष्यवेत्त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही असं सांगितलं होतं. पण अनिलनं पुण्यात या चित्रपटाच्या प्रिंटची पालखीतून मिरवणूक काढली. ती पालखी खांद्यावरून वाहताना डोळ्यांत पाणी होतं माझ्या.’रिंगा रिंगा’च्या वेळीही असाच प्रश्न उद्भवला होता. गोव्यात अजिंक्य देव, अंकुश, भरत, संतोष, सोनाली यांना घेऊन शूटिंग सुरू होतं. तेवढय़ात मला माझ्या कार्यकारी निर्मात्याचा फोन आला की किती फिल्म शिल्लक आहे?’ मी म्हणालो ‘ऐंशी फूट असेल.’ तो म्हणाला तेवढी संपल्यावर पॅक अप करू या. आपले पैसे संपले आहेत. माझ्या डोळ्यांकडे पाहणारा गोव्यातला शिवा नाईक म्हणाला, तुम्हाला जितका पैसा लागेल तेवढा मी देतो. काळजी नको. शिवाने मला १४ लाख रुपयांचा चेक दिला. मी थोडासा बाजूला जाऊन अनिल सातपुतेला फोन केला. त्याने चित्रपट पूर्ण होईपर्यंत अर्थपुरवठा क रण्याचं मान्य केलं. हाही चित्रपट पूर्ण झाला. समीक्षकांची वाहवा मिळाली. महेश मांजरेकरांनी त्यानंर ‘फक्त लढ म्हणा’ हा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. तो हिट झाला.‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’ या चित्रपटांची मला एक मोठा धडा दिला तो म्हणजे रसिक प्रेक्षक चित्रपटगृहात येताना मनोरंजनासाठी येतो. प्रेक्षक स्वत:ला चित्रपटाबरोबर पाहत असतो. किंबहुना तो चित्रपटापुढे एक पाऊल जात असतो. त्या दृष्टीने डोळ्यासमोर सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ ही कादंबरी होती. मला तिच्यावर चित्रपट बनवायचाच होता. अनेकांनी तसा तो प्रयत्न केला. कोणीही चित्रपट बनवावा, पण माझा त्यात सहभाग असावा अशी माझी इच्छा होती. पण तसं घडत नव्हतं. ‘दुनियादारी’ करू पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक श्रेयस होता. हे डोक्यात सुरू असतानाच मी ‘७२ मैल’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो.२०१२ सालच्या जून महिन्यापासून नंतर पुढे वर्षभर मी कामात व्यग्र असणार होतो. पण काय कसं, कोणाला ठाऊक, पण जुलै २०१२ मधलं शूटिंग पुढे ढकललं गेलं, नंतर ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यानचं संपूर्ण शूटिंग रद्द झालं. मला वाटलं परमेश्वराच्या मनात माझी अतृप्त राहिलेली इच्छा पूर्ण करणं आहे. मी दुनियादारीवर काम करू लागलो. त्याचे तब्बल बारा खर्डे मी लिहिले आणि तेराव्या ड्राफ्टवर चित्रपट बनला. त्यावेळी परत तीच स्थिती. नाव भरपूर होतं. पण खिशात पैसे नव्हते. नेमकं त्याचवेळी मिफ्ता अ‍ॅवॉर्डसाठी आम्ही सारे सिंगापूरला गेलो होतो. विमानात शेजारी नानूभाई जयसिंघानी होते. अख्खं सिंगापूर शहर फेंग शुईवर उभारलं आहे. तिथल्या तळ्यात फिरताना मनात धरलेली इच्छा पूर्ण होते, बरकत येते असे म्हणतात. मुंबईत उतरल्यावर दुसऱ्या दिवशी नानूभाईंना भेटलो. त्यांना दुनियादारीचा प्रकल्प सांगितला. त्यांना तो आवडला. ही गोष्ट सप्टेंबरची. डिसेंबर २०१२ मध्ये शूटिंग सुरू केलं आणि १६ जुलै २०१३  रोजी तो चित्रपट प्रदर्शित झाला! एका रात्रीत जग बदलतं याचा अनुभव मी दुसऱ्यांदा घेतला दुनियादारीमुळे! या चित्रपटानं पुन्हा एकदा समाधान दिलं, मी योग्य क्षेत्रात आहे याचं!जीवनाच्या या वळणवाटांत प्रत्येक वाटेवर, वळणावर प्रोमिता ठामपणे उभी आहे. ती घर चालवते. जेवढे पैसे आहेत, जितके पैसे आहेत, त्यातच! तिनं कधीही तक्रारीचा सूर काढला नाही. मी टी.व्ही मालिका केल्या असत्या तर भरपूर पैसे मिळाले असते, पण मला सिनेमाच करायचा होता. माझ्या या निर्णयामागे ती कणखरपणे उभी राहिली. व्यावसायिक जीवनात हर्षदा खानविलकरची साथ महत्त्वाची ठरली आहे.कॅमेरा माझ्यासाठी देव आहे. न्यूमॅटिक कॅमेऱ्यापासून ते डिजिटल कॅमेऱ्यापर्यंतचे कॅमेऱ्याचे प्रवास मी पाहिले आहेत. तंत्रज्ञानाचा विकास होत गेला. त्यामुळे सफाई येत गेली. पण डिजिटल कॅमेऱ्यामुळे ‘फिल्म मेकिंग’ची ‘ती’ गंमत गेली! असं हळूच मनाला वाटत जातं. जुन्या कॅमेऱ्याचा घर्र्र आवाज तुम्ही काही गंभीर उपक्रम राबवत आहात याची भावना देत असे, ती भावना हरपली. पण मी चित्रपट बनवतो. चित्रपट बनवण्याच्या आनंदासाठी! प्रेक्षकांना रिझविण्याच्या असोशीनेच! प्रेक्षकांसाठी, त्यांच्या आनंदासाठी मी काम करतो. तेच माझ्यासाठी ‘तू ही रे’ आहेत. शब्दांकन : नितीन आरेकर  nitinarekar@gmail.com

कलेनं तारलं..

‘‘फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी काहीही केलं. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केलं. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या.  रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचं. मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेनं माझा सत्कार केला विचारलं, ‘आम्ही तुझ्यासाठी काय करू.’ मी म्हणालो, ‘फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या. मी त्यांची फी भरेन.’ सर म्हणाले, ‘आम्ही यापुढे असं होऊ देणार नाही.’ खूप समाधान वाटलं.‘‘
आम्ही मूळचे आंध्र प्रदेशचे. माझे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा. आम्ही माटुंग्याच्या लेबर कॅम्प, धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचो. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचं कुटुंबही तिथेच राहायचं. म्हणजे त्या घरात कमीत कमी आठ माणसं नक्की राहायची. ते चार आणि आम्ही चार. आमच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होतं. पण मराठी माणसंही भरपूर होती. सतत काही ना काही चालायचं. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नंही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकर चालू असायचा व त्यावर गाणी वाजत राहायची. सर्व दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी! तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व आम्ही सारे एकत्र बसून तो पाहात असू. मी तर एका जागी न बसता अलीकडून पलीकडून असा दोन्हीबाजूने पाहायचो. या वातावरणाचा माझ्यावर नकळत परिणाम घडला.
असं सारं ठीक सुरू असताना वडिलांचं दारूचं व्यसन वाढलं व नशिबाचं चक्र फिरलं. आम्ही किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आलो. अक्षरश: फरफट सुरू झाली. मी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होतो. सात रुपये फी होती तीही देणं परवडत नव्हतं. महिनाअखेरीस बाकावर उभं राहायचं किंवा वर्गाबाहेर जायचं. कधी कधी वेताच्या छडय़ा मिळायच्या. त्या वयातच मला जबाबदारीची जाणीव झाली होती. मी छान नाचायचो, नकला करायचो. रेकॉर्ड डान्स करायचो. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचो. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचो. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर. मग ओरडा. तसा मी मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचो. वर्गात अभ्यासात यथातथाच होतो. पण मनात आलं तर काहीही करायचो. नेहमी पहिला येणाऱ्या मुलानं रुबाब दाखवला, तेव्हा मी त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवलं. सातवीत असताना एकदा असाच रात्री रेकॉर्ड डान्स करून घरी आलो. उशीर झाला. त्यामुळे सकाळी रात्रीचे कपडे न बदलता तसाच शाळेत धावलो. उपमुख्याध्यापकांनी बोलावलं व विचारलं, ‘‘युनिफॉर्म का घातला नाहीस?’’ इतर मुलांचं नेहमी जे उत्तर ऐकायचो, ते उत्तर ठोकून दिलं, ‘‘लॉण्ड्रीत दिलाय.’’ ते म्हणाले, ‘‘अच्छा, वडिलांना दारू प्यायला पैसे आहेत, कपडे लॉण्ड्रीत द्यायला पैसे आहेत आणि शाळेची फी भरायला पैसे नाहीत.’’ त्यांनी मला वेताच्या छडीने फोडून काढला. मला खूप वाईट वाटलं, रागही आला. त्या तिरमिरीत मी मित्रांचा निरोप घेतला व शाळा सोडली. माझ्या वर्गशिक्षिका दमयंती टीचर होत्या. त्यांना हे कळलं. त्यांनी मला ‘‘तुझी फी भरते, पण शाळा सोडू नकोस’’, असं सांगितलं. पण मी गेलोच नाही. त्या आता अमेरिकेत असतात. मी त्यांना तिथे भेटून आलोय.
शाळा सोडली. पुढे मी विनोदवीर म्हणून प्रसिद्ध झालो. शाळेला जेव्हा हे कळलं, तेव्हा १९८३ साली, मला बोलावून माझा सत्कार केला. शाळेला त्या दिवशी सुट्टी दिली, तेच उपमुख्याध्यापक आता मुख्याध्यापक झाले होते. ‘‘मी शाळेकरता काय करू शकेन,’’ असं त्यांनी मला विचारलं. मी शाळेकरता स्वखर्चाने दोन कार्यक्रम केले. त्यातून वीस लाख रुपये जमले. त्यात त्यांनी नवी इमारत बांधली व कॉलेज सुरू केलं. मग शाळेनं मला विचारलं, ‘‘आम्ही तुझ्यासाठी काय करू?’’ मी म्हणालो,‘‘फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या. मी त्यांची फी भरेन.’’ सर म्हणाले, ‘‘आम्ही असं होऊ देणार नाही पुन्हा.’’ खूप समाधान वाटलं.
तर मी शाळा सोडली. जगण्यासाठी काहीही केलं. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केलं. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचं. आवश्यक तेवढे पैसे घरात खर्च करून उरलेल्या पैशात आजूबाजूला कोणी उपाशी-तापाशी नाही ना हे पाहायचो व त्यांना शक्य ते खाऊ घालायचो. स्वस्ताई होती तेव्हा. चार आण्यात पोट भरायचं. आज मागे वळून बघताना आश्चर्य वाटतं, की १२-१४ वर्षांच्या त्या वयात देवानं ही बुद्धी कशी दिली? तो कृपाळू आहे, हे खरं.
नाचता नाचता माझं नाव होऊ लागलं. गल्लीबाहेर लोक ओळखू लागले. आमच्या मित्रांच्या टोळीने ‘सूरज कला झंकार’ नावाची डान्स पार्टी बनवली. त्यांच्यासोबत व बाहेरही मी नाच करू लागलो. थोडेसे जास्त पैसे मिळू लागले. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. ते मित्रांत वाटून टाकले. मला पैशाचं महत्त्व वाटत नाही. मित्र हवेत.
१८ व्या वर्षी मला ‘हिंदुस्थान लिव्हर’मध्ये नोकरी लागली. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळालं- स्वीपरचं. झाडू मारून सुरुवात झाली. फरशा पुसायच्या वगैरे कामं असायची. त्यात एक काम होतं रसायनांचे ड्रम उघडण्याचं व ते साफ करून ठेवण्याचं. पहिल्याच वेळी ड्रम उघडला व तो पुसला, तेव्हा मी त्यात डोकं घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. मला गम्मत वाटली. मी पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसं करू लागलो. मला जाणवलं, त्यामुळे माझ्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. माझ्याबरोबर कोल्हापूर साताऱ्याकडचे कामगार होते. ते म्हणायचे, ‘‘याच्या नादी लागू नगा रं बाबा. हा येडा हाय. अंगावर यील.’’ एकदा ड्रममध्ये तोंड घालून आवाजाचा रियाज करून झाला व मागे वळून पाहिलं तर एक कामगार उभा होता, तो विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहात घाबरून पळून गेला. मग आमच्या सुपरवायझरनं मला बोलावलं व विचारलं, ‘‘ये क्या कर रहा है.’’ मी म्हणालो, ‘‘मी मिमिक्री करतो. त्याची ही प्रॅक्टिस आहे.’’ त्याचा विश्वास बसेना. शेवटी मी त्याला तऱ्हे-तऱ्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला व म्हणाला, ‘‘यार तू तो जबरदस्त है। तेरे को अपने गॅदरिंग में चान्स देते है।’’ ..आणि मी रंगभवनला आमच्या संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून सारं दणाणून सोडलं. क्षणात लोकप्रिय झालो. मग मला कंपनीत जरा कमी कष्टाचं काम मिळू लागलं. एकदा आमचे जनरल मॅनेजर काही परदेशी पाहुण्यांना घेऊन आले. जनरल मॅनेजर म्हणजे नऊ हजार लोकांचा पोशिंदा, काय त्यांचा रुबाब! त्यांनी मला सफाई करताना पाहिलं व जोरात ओरडले, ‘‘अरे जॉनी, कैसा है?’’ माझ्याबद्दल त्या पाहुण्यांना काहीतरी चांगलं सांगितलं. माझा भाव कंपनीत वधारला. काही जण तर म्हणाले, ‘‘इथं काय करतोस. पिक्चरमदी जा, मेहमूदसारखं कर.’’ सोपं नव्हतं ते. मी दुपारच्या वेळात नकला करून मित्रांना हसवायचो. एकदा मी आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होतो व कामगार मित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. आमच्या युनियनच्या लीडरनी, सुरेश भोसलेंनी ते पाहिलं व ते म्हणाले, ‘‘अरे याने तर लीव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लीव्हर म्हणायचं.’’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात मी माझी ओळख जॉनी लीव्हर करून दिली व तेव्हापासून आजतागायत मी माझं व्यावसायिक नाव तेच ठेवलंय. पुढे एकदा हे जनरल मॅनेजर मारबलीसाहेब व मी, कल्याणजी-आनंदजीभाईंच्या कार्यक्रमात नागपूरमध्ये एकत्र होतो. त्यांच्या शेजारी मी खूप अवघडून बसलो होतो. ते म्हणाले, ‘‘अरे तू आता मोठा माणूस झालास.’’ पण माझं अवघडलेपण दूर झालं नाही. आजही ‘लीव्हर’मधले माझे मित्र घरी येत असतात. शेवटी माझं नाव, त्यांनी मला दिलंय.
मला नोकरी लागल्यावर वडिलांनी नोकरी सोडली. सात वर्षांनी मी नोकरी सोडली. पैसे बऱ्यापैकी मिळत होते. माझी पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. मग त्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं. गावाकडे त्यांनी एक मुलगी पाहून ठेवली होती, त्यांनी मला तिकडे बोलावलं. पण त्या मुलीच्या वडिलांनी मला नोकरी नाही म्हणून नकार दिला. मी परत आलो. तर इकडे मुलीच्या वडिलांना त्यांच्या जावयांनी सांगितलं, काय चूक करताय का तुम्ही. मुलगा खूप टॅलेण्टेड आहे. मुंबईत त्याचं नाव आहे. मग पुन्हा मला बोलावलं गेलं. मी नाराजीनंच तिथे गेलो. पण त्याच मुलीशी वडिलांच्या सांगण्यानुसार लग्न केलं, सुजाता तिचं नाव. आज आमच्या लग्नाला ३१ र्वष झाली. आम्ही समाधानी आहोत. जी रुखीसुखी रोटी मी मिळवत होतो, तीच रुखीसुखी सांभाळत तिनं संसार केला. घरच्या साऱ्या चिंता तिनं हसतमुखानं वाहिल्या. लग्नानंतर आम्ही अ‍ॅन्टॉप हिलवर राहायला गेलो आणि आता गेली दोन दशकं आम्ही ओशिवऱ्याच्या घरात आहोत. जेस्सी आणि जॅमी अशी दोन मुलं आम्हाला आहेत.
आमच्या घरात कलेची परंपरा तशी नाहीच, पण माझ्या आईला अभिनयाचं अंग आहे. एकदा आमच्या झोपडपट्टीतल्या घरी एक ब्रीफकेस घेतलेले सुटाबुटातले गृहस्थ येऊन गेले. त्यांचं नाव ती विसरली. तेव्हा फोनही प्रचलित नव्हते. मी अस्वस्थ झालो. कोण आलं असेल मला भेटायला. तेव्हा तिनं मला त्यांची नक्कल करून दाखवली. मी लगेच ओळखलं, ते शो अ‍ॅरेंजर कालिदास होते. कदाचित अभिनयाचा गुण आईकडून माझ्यात आला असावा.
कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबर मी मिमिक्री करत असे. त्यांच्याबरोबर र्अध जग पाहिलं. त्यांनीच मला पहिली लंडन, दुबईची सफर घडवली.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मी पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे मी कॅरम खेळत होतो. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी माझ्याकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, माझ्या हातात मद्रासचं विमानाचं तिकीट आलं. मी बावचळून गेलो होतो. कॅमेरा कधी पाहिलेला नाही. पुरती घाबरगुंडी उडालेली. दुसरं, म्हणजे त्या सेटवर सारखी धावपळ सुरू होती. जो तो आपल्या कामात, मला न कळणाऱ्या अगम्य भाषेत बोलत होते. त्यात ‘‘बॉम्बे आर्टिस्ट आया है,’’ असं चालू होतं. पळून जावंसं वाटत होतं. तेव्हा, मनात दुसरा विचार आला, कल्याणजीभाईंचा शब्द पडलाय, तो वाया घालवायला नको. मग रिहर्सलच्या वेळी मी साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून मी दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले.
माझी चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे मी मिमिक्रीच करायचो. मला अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात मी माझे रंग भरले. त्यानंतर लोकांना वाटायला लागलं, ये बच्चा थोडी अ‍ॅक्टिंग भी करता है. मी एन. चंद्रांच्या आजूबाजूला असायचो. तिथे मला कळलं की दिग्दर्शन काय असतं, अ‍ॅक्टिंग काय असते, लेखन कसं करायचं. ‘तेजाब’साठी मी थोडंसं लेखनही केलंय. मग अब्बास-मस्तान यांनी मला ‘बाजीगर’ दिला. ‘बाजीगर’नंतर मला वेगळीच ओळख मिळाली. मग मी सुटलोच. १९९६-९७ पर्यंत मी जवळजवळ पावणेतीनशे फिल्म केल्या. नंतर मी कामाच्या बाबतीत चोखंदळ होत गेलो. आतापर्यंत चारशेहून अधिक चित्रपट मी केलेत. मध्यंतरी काही काळ माझ्या कारकीर्दीला ब्रेक लागला. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात तशी वेळ कधी तरी येतेच. त्या काळात लोक कोलमडून जातात. पण माझं तसं झालं नाही. कारण, मला वाचनाची खूप आवड आहे. माझ्या घरी स्वत:चं मोठं ग्रंथसंग्रहालय आहे. मी भरपूर वाचन केलं. मंटो वाचला, प्रेमचंद, मोहन राकेश आदी पुन्हा वाचून काढले. विनोदाची व विनोदी अशी भरपूर पुस्तकं वाचली. टी. व्ही. वर चिक्कार चित्रपट पाहिले. आपण काय करायला हवं होतं, काय केलं याविषयी अंतर्मुख होऊन विचार केला, ते तपासून घेतलं. तो एक प्रकारचा रियाज होता. त्यानंतर माझा कमबॅक झाला तो ‘ऑल द बेस्ट’, ‘दे दणादण’, ‘गोलमाल -३’ अशा चित्रपटांमधून.
त्या वेळी मी भरपूर नोट्स तयार केल्या, किस्से जमवले. नवनवे लिहून काढले. १९९६-९७ पर्यंत मी कॉमेडी शोज करायचो. पुन्हा त्याचे शोज करण्याचा निर्णय घेतला तो २०१४ मध्ये. मिमिक्री करणं हा माझा आवडीचा प्रांत आहे. मिमिक्री कलाकाराला दुय्यम लेखलं जातं, ते मला मान्य नाही. खरा कलाकार जेव्हा अभिनय करतो, तेव्हा त्याच्यात, त्या भूमिकेचा आत्मा घुसावाच लागतो, असं मला वाटतं. मिमिक्री आर्टिस्टचं काम त्याहून अवघड असतं. तो एकाच वेळी अनेक भूमिका साकारतो. त्यामुळे मिमिक्रीच्या काळापुरता त्या त्या व्यक्तिरेखांचा आत्मा त्याच्यात घुसलाच पाहिजे. त्या त्या व्यक्तिरेखांचे अस्तित्त्व कलाकारात भिनावेच लागते. त्याशिवाय तो कलाकार तो अनुभव साक्षात करू शकत नाही. ती केवळ नक्कल नसते, तर तो एक स्वतंत्र कलाविष्कार असतो. देवदयेनं माझ्यामध्ये ती प्रतिभा उपजत आहे. त्या आधारावर मी संजीवकुमार, दिलीपसाबना त्यांचीच मिमिक्री करून चकित केलंय. ही एक अद्भुत देणगी आहे. तिचाच वापर मी स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये करतो. या स्टॅण्ड अप कॉमेडीमध्ये एकच माणूस दहा जणांच्याही भूमिका करतो आणि कोणत्याही प्रॉपर्टीशिवाय. मराठीमध्ये पु. ल. देशपांडे आणि प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी तसं केलंय. लक्ष्मण देशपांडे थोडीशी प्रॉपर्टी वापरत होते, पण पु. लं. नी तीही वापरली नाही. मी लक्ष्मण देशपांडेंचं ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ला पाहिलंय, पण दुर्दैवानं पु. लं. चा प्रत्यक्ष कार्यक्रम नाही पाहिला. पण टी. व्ही.वर पाहिलंय. एक माईक व पु. ल.! मीही तसंच करतो. माईक व मी. माझ्या आविर्भावातून ओढणी दिसायला हवी, टोपी, तलवार जे काही आहे ते दिसायला हवं. माझ्या बोलण्याच्या लकबीतून व्यक्तिरेखा बदलली हे कळायलाच हवं. तरच ती स्टॅण्ड अप कॉमेडी यशस्वी ठरते. माझीही नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ते टिकले नाहीत. कारण कुठे तरी त्यांनी स्वत:चे प्रयत्न केले नाहीत. मिमिक्री कलाकाराचे स्वत:चे निरीक्षण हवे, त्याचा स्वत:चा विचार हवा, स्वत:चं विश्लेषण हवं आणि अभ्यास हवा. अभ्यास म्हणजे पाठांतर नाही तर तीच गोष्ट पुन:पुन्हा करत राहणे. जे हे करत नाहीत ते बाजूला फेकले जातात. मी परदेशात गेलो की टी. व्ही. वर हे स्टॅण्ड अप कॉमेडी शोज सतत पाहायचो. निसर्ग पाहण्यापेक्षा हे करणं मला आवडायचं. त्यातून नवनवीन शिकायला मिळायचं. त्यांचं इंग्लिश पटकन कळायचं नाही, पण तरीही मला ते शोज कळायचे हेच त्यांचं यश होतं. मीही तसंच करायचं ठरवलं. माझ्या स्टॅण्ड अप कॉमेडीमध्ये कोणतीही लिखित संहिता नसते. एक आराखडा बनलेला असतो आणि त्या आधारावर शो ऐन वेळी घडत जातो. त्यात प्रेक्षकांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा असतो. कमरेखालचे विनोद मला आवडत नाहीत, माझ्या शोमध्ये तसे मी करत नाही. मेहमूदसाहेब आणि किशोरकुमार यांचा विनोद माझा आदर्श आहे. त्यातही किशोरदा मला अतिशय आवडतात. कारण ते द्वयर्थी संवाद कधीच वापरत नाहीत. त्यांचा ‘पडोसन’मधला गानगुरू आठवा. किती सहजता होती त्यांच्या अभिनयात! हे सर्व मनात ठेवून जेव्हा मी स्टॅण्ड अप कॉमेडी २०१४ पासून करायला सुरुवात केली, तेव्हा पहिले दोन्ही शोज हाऊसफुल्ल झाले होते. पहिल्या शोनंतर एक बाई भेटायला आल्या होत्या. सोबत एक १७-१८ वर्षांचा मुलगा व एक वयस्कर गृहस्थ होते. त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, ‘‘जॉनीभाई, सतरा वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही शेवटचा शो केलात तेव्हा हा मुलगा माझ्या पोटात होता, आज तो आलाय व माझे सासरे आलेत. आम्हाला तुम्ही खूप आनंद दिलात, खूप हसवलंत, हसता हसता खूप शिकवलंतही.’’ तीन पिढय़ांना मी एकाच वेळी आनंदी करू शकलो, हे महत्त्वाचे आहे. देवाची दया आहे. कर्ता करविता तो आहे. पहिल्या पाच मिनिटात जर हास्याचा स्फोट झाला नाही, तर मी अस्वस्थ होईन, काम करणंच बंद करेन.
मी हीच ठाम भूमिका पहिल्यापासून घेतली आहे. लोकांना केवळ हसवायचं नाही, तर त्यांना आनंदाबरोबरच जगण्याचं भान, जबाबदारीची जाणीवही दिली पाहिजे. हे माझे कर्तव्यच आहे. पोटातल्या भुकेची आग काय असते हे मला माहिती आहे. तीही जाणीव माझ्या स्टॅण्ड अप कॉमेडी शोमधून देण्याचा माझा प्रयत्न असतो.
जवळपास र्अध जग मी फिरलोय. कलेनं खूप काही दिलंय. त्याहीपेक्षा तिनेच मला घडवलंय. दोन शोज माझ्या लक्षात आहेत. ‘होप-८६’ आणि ‘न्यू जर्सी’चा. ‘होप -८६’ मध्ये खरं तर मी नव्हतो. त्या दिवशी वापीला माझा कार्यक्रम होता. पण काही कारणानं आम्ही वाटेतून परतलो. ‘होप -८६’ मध्ये कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, भप्पी लाहिरी आणि आर.डी. बर्मन सहभागी होते. ‘नुक्कड’, ‘ये जो है जिंदगी’ या मालिकांच्या कलाकारांची दोन आणि कोणाची तरी एक अशी तीन स्किट्स होती. तिसऱ्याची काही अडचण निर्माण झाली होती आणि वापीला न गेलेला मी नुसताच बॅज लावून फिरत होतो. आनंदजीभाईंनी संयोजकांना सांगितलं की आपण जॉनीला काही करायला सांगू या. ते तयार झाले. आनंदजीभाईंनी मला तसं सांगितलं व ब्रेबॉर्न स्टेडियमवर हजारो लोकांसमोर नाव अनाऊन्स करून सरळ ढकललं. मी गेलो, जे सुचेल ते केलं, त्या रंगमंचानं माझ्याकडून ते करवून घेतलं. समोर दिलीपसाहेबांपासून बच्चनसाहेबांपर्यंत अख्खी फिल्म इंडस्ट्री बसली होती. साऱ्यांनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतून अमिताभ बच्चन आणि जॉनी लीव्हर यांच्याच बातम्या लागलेल्या. न्यू जर्सीला असाच कार्यक्रम होता. ५०,००० लोक जमलेले. पुन्हा सारी फिल्म इंडस्ट्री हजर होती. आता नवं काय करू? या विचारात असताना त्या वेळी जगभरात लोकप्रिय असणारे मायकेल जॅक्सन, अपाची इंडियन, टीना टर्नर आणि हॅमर यांच्या गायन-नृत्याच्या शैलीची आपण मिमिक्री करू या असा विचार आला. एका म्युझिशियनला बोलावलं, मला असलेल्या अपेक्षा सांगितल्या आणि या सर्वाना एकत्र आणेल अशा प्रकारचं संगीत तयार करायला सांगितलं. तो
‘आयटम’ तुफान गाजला. लोकांनी अक्षरश: उभं राहून कौतुक केलं. पण मी हे सारं करतच नव्हतो. तो सर्वसाक्षी परमेश्वर माझ्या माध्यमातून ते करवून घेत होता. आमच्या घरात, ‘येशू मसिहा या घराचा कुटुंबप्रमुख आहे,’ अशी पाटी आहे व तीच माझी धारणा आहे. येशू शत्रूवरही प्रेम करा असं सांगतो, मीही तसंच मानतो. शत्रूवर प्रेम केलंत तर मित्रावर किती कराल? देवावर श्रद्धा ठेवा. सर्व धर्म तेच सांगतात. माझ्या मुलाला कर्करोगाची बाधा झाली होती. मी समूळ हादरून गेलो होतो. त्याच्याजवळ तीन दिवस बसून देवाची करुणा भाकली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. जॅमी माझी मुलगी. ती विदेशात मास्टर्स करून आली. ती म्हणाली, स्टॅण्ड अप कॉमेडी शोज करायचेत. मी तिला लंडनच्या शोमध्ये संधी दिली. म्हणालो, आज तगलीस तर तगलीस, नाही तर हे करायचं नाही. आज तिचं स्वत:चं नाव आहे.
मी देवाचा ऋणी आहे. जे आजवर हातून झालं, ते त्यानंच करवून घेतलं, हा कृतज्ञतेचा भाव कायम मनी राहो हीच इच्छा. आमेन!
शब्दांकन: प्रा. नीतिन आरेकर
(सदर समाप्त)
nitinarekar@gmail.com
- See more at: http://www.loksatta.com/valanwata-news/johnny-lever-actor-and-comedian-in-bollywood-industry-telling-about-his-life-journey-1175904/?SocialMedia#sthash.3ZyOfnzo.dpuf