Saturday, June 18, 2016

पाण्याची कमाल
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
एकदा एक प्रवासी वाळवंटात हरवला! तो आपली वाट शोधत निघाला. पण लवकरच त्याच्याकडचे पाणी संपले. दोन दिवस झाले पण त्याला काही पाणी मिळाले नाही. पाण्यावाचून त्याची अवस्था अत्यंत सोचनीय अशी झाली. तहानेने तो व्याकुळ झाला. अशीच जर अवस्था राहिली तर आपण काही फार दिवस तग धरू शकत नाही हे त्याच्या ध्यानात आले. आपण मृत्युच्या जवळ पचलो आहोत असे त्याला वाटू लागले. पण पाणी शोधण्याचे प्रयत्न काही त्याने थांबवले नाहीत,
त्याला लांबवर झोपडीसारखे काहीतरी दिसले. आता ती झोपडी होती का नुसताच आभास होता हे काही त्याला कळेना. कारण वाळवंटात असे आभास बरेच होत असतात. पण त्याचा नाईलाज होता. पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. म्हणून तो झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो झोपडीजवळ पोचला तेव्हा त्याला आढळून आले की ती खरोखरची झोपडी होती, आभास नव्हता. पाण्याच्या आशेने तो झोपडीत घुसला पण त्याची निराशा झाली कारण झोपडीत कुणीच नव्हते. त्या झोपडीतील माणसे ती झोपडी खाली करून गेल्याचे दिसत होते. पण त्या झोपडीत एक पाण्याचा पंप बसवलेला दिसला. त्या पंपाचा एक पाईप खाली जमीनीमध्ये घुसलेला दिसला. कदाचीत खाली विहीर असवी व त्यात पाणी असावे. तो हाताने चालवण्याचा पाण्याचा पंप बघून त्या वटसरूला हायसे वाटले. आता आपल्याला पाणी मिळणार या आशेने त्याने अंगातील सगळी ताकद एकवटून जोरजोरात पंपाचे हँडल चालवायला सुरवात केली. पण ओम फस! पंपातून काही पाणी येईना. जणुकाही खालच्या विहिरीतील पाणी आटले असावे किंवा संपले असावे.
त्या वाटसरूला पुन्हा एकदा निराशेने घेरले पण त्याने आपले प्रयत्न काही सोडले नाहीत. झोपडीत दुसरीकडे कोठे पाणी मिळते का याचा शोध घ्यायला सुरवात केली. बर्याच प्रयत्नानंतर त्याला पाण्याने अख्खी भरलेली बाटली सापडली. त्याला फार आनंद झाला. बाटलीचे बुच उघडून तो घटाघटा पाणी पिणार एवढ्यात त्याचे लक्ष त्या बाटलीला अडकवलेल्या चिठ्टीकडे गेले. त्या चिठ्ठीत लिहीले होते,' कृपया हे पाणी पिऊ नये. हे पाणी हँडपंपात ओतावे म्हणजे तुम्हाला भरपूर पाणी मिळेल. जाताना या बाटलीत पहिल्यासारखे पाणी भरून ठेवावे. धन्यवाद!'
ही चिठ्ठी वाचून काय करावे हे त्या वाटसरुला कळेना. एकीकडे तर प्रचंड तहान लागली होती. पाण्याची नितांत आवश्यकता होती. दुसरीकडे जर हे पाणी पंपात ओतले आणि पाणी नाही आले तर? थोडक्यात हे पाणी पंपात ओतल्यावर त्या पंपातून पाणी येईलच याची शाश्वती नव्हती आणि हे हातचे पाणी पण जाणार होते. काय करावे हे समजत नव्हते.
त्या चिठ्ठीवर विश्वास ठेऊन त्याने ते पाणी पंपात ओतले व पंप सुरू केला. अहो काय आश्चर्य? त्या पंपातून भरपूर पाणी येऊ लागले. त्या प्रवाश्याची तहान तर भागलीच पण त्याला मस्तपैकी आंघोळ पण करता आली. त्याने पुढील प्रवासासाठी भरपूर पाणी भरून घेतले. तिथेच त्याला पेन्सिलने काढलेला एक नकाशा पण दिसला. त्या नकाशात झोपडीचे ठिकाण नक्की कोठे आहे, तसेच सर्वात जवळची मनुष्यवस्ती किती दूर आहे हे दाखवले होते. अर्थात ही मनुष्यवस्ती काही फार जवळ नव्हती पण पण तेथे पोचेपर्यंत आपल्याला पाणी पुरेल याची त्याला खात्री पटली होती. आधी आपण कोठे आहोत हेच त्या प्रवाश्याला कळत नव्हते. पण त्या पेन्सिलने काढलेल्या नकाशामूळे आपण कोठे आहोत हे तरी त्याला कळले. त्या चिठ्ठीत लिहील्याप्रमाणे पाण्याची बाटली भरून ठेवली व त्या चिठ्ठीतील मजकुरापुढे स्वतःच्या हाताने मजकूर लिहीला, ' विश्वास ठेवा! हे असे घडते.'
तात्पर्य
'त्याग' केल्याशीवाय 'लाभ' होत नाही. छोटासा त्याग करा भला मोठा लाभ मिळवा.
त्या प्रवाशाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना सुद्धा त्याने बाटलीभर पाण्याचा त्याग केला व भरपूर पाण्याचा लाभ मिळवला.
दुसरी गोष्ट
विश्वास ठेवा, श्रद्धा बाळगा! परिणामांची चिंता अजीबात करू नका. सगळे चांगलेच होईल.
त्या तहानलेल्या प्रवाश्याने चिठ्ठीवर विश्वास ठेवला, श्रद्धा बाळगली. परिणामांची पर्वा न करता त्या चिठ्टीतील सुचनांचे पालन केले. त्याला भरपूर पाणी मिळाले म्हणजेच भरपूर लाभ मिळाला.
या ठिकाणी 'पाणी' याचा अर्थ जिवनातील आनंद असा आहे. आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी की ज्यामुळे आपल्या चेहेर्यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य उमटते. कोणाला हे विद्वत्तेमुळे मिळते, कोणाला ते धन संपत्तीमुळे मिळते, कुणाला प्रेमामुळे-कुटुंबामुळे-मित्र मैत्रीणींमुळे मिळते तर कुणाला ईतर कार्णांमूळे मिळते,
पाण्याचा पंप म्हणजे 'कर्माचे' मेकॅनिझम' आहे.
त्याग करा, कर्म करा व लाभ मिळवा असे या गोष्टीचे सांगणे आहे.
अर्थातच असा 'लाभ' मिळवायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?
(व्हॉट्सअपच्या सौजन्याने)

No comments: