Monday, January 25, 2016

Rohit vemmula

रोहित वेमुला यास,

तुला अनावृत्तपत्र लिहायचे कारण तुलाही पक्के ठाऊक असेलच. ज्याला उद्देशून असे पत्र लिहीले जाते त्याने ते वाचू नये, पण इतरांनी अगत्याने वाचावे, म्हणून लिहीतात, त्यालाच अनावृत्तपत्र म्हणतात ना? तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास? पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास? म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का? इतरांना वाचून दाखवणे दूर, आज उर बडवणार्‍या कोणीही तेव्हा तुझ्या शब्दांकडे वळून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. पण आज तुझ्या शब्दांना राजकीय प्रसिद्धीच्या बाजारात तेजी आली आहे, म्हटल्यावर तुकडे पाडून वा वाटे घालून त्या पत्राचा व्यापार जोरात चालला आहे. ज्यांच्या सोयीने शब्द त्यात नाहीत, त्यांनी तुझ्याच जुन्यापान्या शब्द वा लेखनाचे उत्खनन चालविले आहे. यातल्या कोणालाही त्या शब्द वा त्याच्या मतितार्थाशी काडीमात्र कर्तव्य नाही. प्रत्येकाला आपापला उल्लू सीधा करण्यासाठी त्यातला वाटा हिस्सा हवा आहे. मृतदेहाभोवती घिरट्या घालणारी, गर्दी करणारी गिधाडे असावित, तशी तुझ्या आत्महत्येभोवती कशी झुंबड उडाली आहे बघ. तुझ्या बलिदानाला केविलवाणे करून टाकले या लोकांनी!

ज्यांना आपला युक्तीवाद किंवा इझम पुढे न्यायचा असतो, त्यांच्या बाजारात यापेक्षा काहीच वेगळे होत नसते रोहित! म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती झुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना? दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना? मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे? आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब्द भावनांशी काय कर्तव्य असणार? पण त्यांच्या अशा मतलबाला शह देण्यासाठी दुसर्‍या बाजूला आपला बचाव मांडताना तुझ्या जुन्या शब्दांचे शोध घ्यावे लागत आहेत. मात्र शब्दात आशय कोणता आहे किंवा त्यातून रोहितची मनोव्यथा काय आहे, याविषयी संपुर्ण अलिप्तता आहे.

हेच होत आले आजवर रोहित! कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना? फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय? अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्‍यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग! पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित! कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना? अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित! दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी! आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्‍याला राहिली आहे काय? सहा महिन्यांनी रोहितही कुणाच्या स्मरणात नसेल.

हा पुरोगामी बाजार आहे रोहित! इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला सॉफ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित! पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित! भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड! फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित! त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल? तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना? मग झेंडे कुठले मिरवायचे? तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग? व्हायचे ते होऊन गेले ना? व्यापारी लौकरच पुढल्या अखलाख, रोहित वा कलबुर्गीच्या प्रतिक्षेत दिसतील. व्याकुळलेले तुझे मुठभर आप्तस्वकीय सोडून अन्य कुणाला तुझे शब्द तेव्हा आठवणारही नाहीत....

©® भाऊ तोरसेकर

No comments: