Tuesday, October 13, 2015

आपल्या शहराची ओळख (संदीप वासलेकर)

आपल्या शहराची ओळख (संदीप वासलेकर)
- संदीप वासलेकर
रविवार, 11 ऑक्टोबर 2015 - 01:45 AM IST

शहर म्हणजे केवळ वास्तव्य करण्याचं एक ठिकाण नव्हे. प्रत्येक शहराचा एक आत्मा असतो. एक रूप असतं. एक पेहराव असतो. शहराची ही ओळख, हे रूप काही प्रमाणात राजकीय व ऐतिहासिक वस्तुस्थितीमुळं निश्‍चित होत असतं, तर काही प्रमाणात नागरिकांच्या उत्स्फूर्ततेमुळंही ते ठरतं.

आयर्लंडची राजधानी डब्लिन इथं ‘सेंट स्टीफन्स ग्रीन’ नावाचा मोठा बगीचा आहे. तो चौरस आकाराचा आहे. त्याच्या दक्षिण सीमेला समांतर व सुमारे अर्धा मैल अंतरावर ट्रिनिटी कॉलेज हे जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे. ‘सेंट स्टीफन्स ग्रीन’कडून ट्रिनिटीला जायला दोन रस्ते आहेत. ‘सेंट स्टीफन्स ग्रीन’कडं पाठ करून आपण उजव्या रस्त्याने गेलो तर वाटेत एक महत्त्वाची वास्तू दिसते; तसंच आपण डाव्या रस्त्यानं गेलो तरी देखील वाटेत एक महत्त्वाची वास्तू लागते.
डब्लिनमधल्या लोकांना डावीकडच्या रस्त्यावरच्या वास्तूचा अभिमान आहे. ते आपल्याला तिथं अवश्‍य जायला सांगतात. उजवीकडच्या रस्त्यावरची वास्तू भव्य-दिव्य व आकर्षित असली, तरी तिथून जाताना टॅक्‍सीचालक तिचा उल्लेखही करत नाहीत.

डावीकडची रस्त्यावरची वास्तू म्हणजे एक पुस्तकाचं दुकान आहे. तिथं साहित्य, तत्त्वज्ञान व इतर वैचारिक पुस्तकांचं भांडार आहे. सध्याच्या ‘ॲमेझॉन’च्या युगात पाश्‍चिमात्य जगातली पुस्तकांची दुकानं बंद होण्याच्या मार्गावर आहेत; पण डब्लिनच्या डॉसन स्ट्रीटवर असलेलं ते दुकान अतिशय लोकप्रिय आहे. तिथं चैतन्यपूर्ण वातावरण असते. बऱ्याच संध्याकाळी तिथं साहित्यिक कार्यक्रम होतात. उजवीकडच्या रस्त्यावरच्या भव्य-दिव्य वास्तूला फार महत्त्व न देता लोक पुढं मार्गक्रमण करतात. ती वास्तू म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचं कार्यालय आहे.
‘स्टेट स्टीफन्स ग्रीन’ या बगीच्यातही आयर्लंडच्या सुप्रसिद्ध लेखकांचे पुतळे डौलानं उभे आहेत. तिथंच रवींद्रनाथ टागोरांचा पुतळाही आहे. कुण्या राजकीय नेत्याला त्या बगीच्यात स्थान नाही.
इंग्लिश वाङ्‌मयातले सुप्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार आयर्लंडचे होते. ऑस्कर वाईल्ड, सॅम्युअल बेकेट, जेम्स जॉईस, जोनाथन स्विफ्ट, विल्यम यीट्‌स ही काही जगप्रसिद्ध नावं. भारतातल्या लोकांना वाटतं, की हे साहित्यिक इंग्लंडचे होते. मात्र, तो गैरसमज आहे. हे सर्व साहित्यिक आयर्लंडचे सुपुत्र आहेत. त्याशिवाय अजूनही ५०-६० अग्रगण्य साहित्यिक आयर्लंडमध्ये होऊन गेले.

‘संध्याकाळी काय करू?’ असं जर समजा डब्लिनच्या मित्राला आपण विचारलं तर उत्तर मिळतं ः ‘‘साहित्यिक पब पाहा, म्हणजे ज्या पबमध्ये यीट्‌स अथवा ऑस्कर वाईल्ड अथवा जेम्स जॉईस बसून बिअर पीत असत, तिथं जाऊन गिनिस बिअरचा आस्वाद घ्या. डब्लिन शहरातले लोक आपल्या शहराची ओळख ‘एक साहित्यिक शहर’ अशी करून देण्यात अभिमान मानतात. वास्तविक लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कमध्ये अनेक साहित्यिक होऊन गेले; परंतु, लंडन व न्यूयॉर्कची ओळख ‘जागतिक महत्त्वाची आर्थिक केंद्रं’ अशी आहे. पॅरिसची ओळख ‘कलेचं केंद्र’ म्हणून करून दिली जाते. त्यात चित्रकलेपासून फॅशनपर्यंत सर्व काही आलं.
आपल्या शहराची ओळख कशी असावी, याबाबत जगातल्या अनेक शहरांतले नागरिक जागरूक असतात. काही शहरांना ऐतिहासिक कारणांमुळं विशिष्ट रूप प्राप्त होतं. काही शहरांतले नागरिक नियोजनबद्ध प्रयत्न करून आपल्या शहराला विशिष्ट स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात.
अमेरिकेत आपण राजधानी वॉशिंग्टनला गेलो, तर ‘जागतिक सत्ताकेंद्र’ हे तिचं रूप मोठ्या प्रमाणात दिसतं.

डब्लिन इथल्या ‘स्टेट स्टीफन्स ग्रीन’ या बगीच्यात असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्यासमवेत संदीप वासलेकर.
डब्लिनमध्ये जसे तिथले लोक आपल्याला डॉसन स्ट्रीटवरच्या पुस्तकांच्या दुकानात अथवा ट्रिनिटी कॉलेजमधलं वाचनालय पाहायला जायचा आग्रह करतात, तसे वॉशिंग्टनचे लोक आपल्याला राष्ट्रपतीनिवास अर्थात व्हाइट हाउस, संसद व अब्राहम लिंकनचं स्मारक पाहायला जाण्याचा आग्रह करतात. वॉशिंग्टनच्या मॅसॅच्युसेट्‌स ॲव्हेन्यूवर एकाला एक लागून अनेक संशोधनसंस्था आहेत. तिथं शेकडो संशोधक काम करतात. त्यांची महत्त्वाकांक्षा लेखक बनण्याची नसते. त्यांना व्हाइट हाउस अथवा परराष्ट्र मंत्रालयात सल्लागार म्हणून पद मिळालं, तर आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं.

सॅनफ्रान्सिस्कोला ‘नवीन युगाचं शहर’ म्हणून ओळख करून देण्यात अभिमान वाटतो. त्यात मेन्लो पार्क, बर्कले, सॅनडिएगो या उपनगरांचाही समावेश आहे. इथं संगणकशास्त्रापासून अध्यात्मापर्यंत सर्वच क्षेत्रांत भविष्याला वर्तमानकाळातच पृथ्वीवर आणण्याची आकांक्षा दिसते. गुगल व फेसबुकचं हेच माहेरघर. पर्यावरणविषयक चळवळीतले नवीन प्रयोगही इथंच प्रथम पाहायला मिळतात व नवीन पंथ आणि धार्मिक प्रयोगही इथं होतात.

दुबईला ‘संपत्तीचं ओंगाळवाणं प्रदर्शन करणारं शहर’ म्हणून ओळख करून देण्यात आनंद मिळतो. दहा वर्षांपूर्वी दुबईच्या राज्यकर्त्यांनी इंग्लंडचे सुप्रसिद्ध गायक बॉब गेल्डॉक व माझं संयुक्त व्याख्यान ठेवलं होतं. एक दिवस आधी येऊन त्यांचा पाहुणचार घेण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं. म्हणून मी, गेल्डॉफ व आमचे सहकारी एक दिवस आधी गेलो. संध्याकाळी तिथल्या वरिष्ठ मंडळींनी आमच्यासाठी दुबईदर्शन कार्यक्रम आखला होता. म्हणजे आम्हाला एका उंची हॉटेलमध्ये नेलं व चहापानाचा कार्यक्रम केला. नंतर दुसऱ्या उंची हॉटेलमध्ये गेलो. शेवटी समुद्रात असलेल्या ‘बुर्ज अल्‌ अरब’ या हॉटेलात मेजवानीचा कार्यक्रम होता. त्या हॉटेलमध्ये संपत्तीचं नुसतं उघडं-नागडं प्रदर्शन होतं. मला ते पाहून खूप उबग आला. मी त्यानंतर पुन्हा कधीही दुबईला गेलो नाही. बॉब गेल्डॉफ नंतर पुन्हा कधी तिथं गेले की नाही माहीत नाही; पण पुन्हा जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा ‘‘बरं झालं, आपण दुबईऐवजी एका चांगल्या शहरात भेटत आहोत,’’ असं ते म्हणाले.

दुबईच्या जवळ असलेलं दोहा हे शहर तसंच दिसतं. सर्वत्र नवीन बांधकाम, त्यात निरपराध मजुरांचा मृत्यू, रस्त्यावर महागड्या गाड्या; पण कतारच्या राज्यकर्त्यांना दोहा हे शहर ‘वैचारिक शहर’ म्हणून ओळखलं जावं अशी इच्छा आहे व त्यासाठी ते धडपड करतात. दोहामध्ये कोट्यवधी डॉलर खर्च करून जॉर्जटाऊन, कार्नेगी मेलन अशा प्रसिद्ध विद्यापीठांच्या शाखा उघडल्या आहेत. शास्त्रीय संशोधनाची अनेक केंद्रं उघडली आहेत. इस्लामिक कलेचं संग्रहालय उघडलं आहे. दोहाला गेल्यावर तिथले राज्यकर्ते दोहा दाखवण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये नेत नाहीत, तर कलेचं संग्रहालय व शैक्षणिक शहर पाहण्याचा आग्रह करतात. तिथलं सरकार तेलनिर्मितीपासून मिळालेले पैसे खर्च करून दर आठवड्याला जागतिक विचारवंतांच्या परिषदा भरवतं. त्यातून फार काही निष्पन्न होत नाही; परंतु, दोहाची ओळख एक ‘वैचारिक केंद्र’ म्हणून जगाला व्हावी, ही इच्छा दिसते.

जीनिव्हातल्या नागरिकांना व स्थानिक राज्यकर्त्यांना आपलं शहर ‘जागतिक शांतीचं केंद्र’ म्हणून ओळखलं जावं, अशी महत्त्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न अहोरात्र सुरू असतात. वास्तविक, जीनिव्हा हे संयुक्त राष्ट्रसंघाचं दुसरं केंद्र आहे. तिथं जागतिक व्यापार संघटना, जागतिक कामगार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, रेडक्रॉस, ग्रीनक्रॉस अशा अनेक संस्थांची कार्यालयं आहेत; पण तेवढ्यावर जीनिव्हातल्या लोकांचं समाधान नाही. अलीकडंच त्यांनी शांती व सहकार्य या विषयांवर शिक्षण आणि संशोधन करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी शांती निवासाची उभारणी केली. अशा अनेक नवनवीन संस्थांची उभारणी तिथं सतत सुरू असते.

जीनिव्हात बहुसंख्य युवकांना आपण जागतिक शांततेसाठी काम करावं असं वाटतं. एकदा मी जीनिव्हा सरोवराच्या कडेनं मोकळी हवा घेण्यासाठी फेरी मारत होतो. माझ्या बाजूनं एक प्रेमी युगुल चाललं होतं व मोठ्यानं एकमेकांशी बोलत होतं. त्यांच्या प्रेमाच्या आणाभाका चालल्या होत्या व त्यातच आपण जागतिक शांततेसाठी व मानवी अधिकारासाठी एकत्र काम कसं करू, याचे मनसुबे ते रचत होते.

आपल्या शहराची कोणती ओळख व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत का? शहर म्हणजे केवळ वास्तव्य करण्याचं एक ठिकाण नव्हे. प्रत्येक शहराचा एक आत्मा असतो. एक रूप असतं. एक पेहराव असतो. हे काही प्रमाणात राजकीय व ऐतिहासिक वस्तुस्थितीमुळं ठरतं, तर काही प्रमाणात नागरिकांच्या उत्स्फूर्ततेमुळं घडतं. ते केवळ शहरातल्या इमारती व वास्तूतून दिसत नाही, तर शहराचं खरं स्वरूप तिथल्या लोकांच्या आकांक्षेतून ओळखलं जातं.
मला डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमधल्या तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व प्लोटो संशोधन संस्थेचे प्रमुख व्हासिलिस पॉलिटिस भेटले. त्यांना विचारलं ः ‘‘तुम्ही विद्यापीठात एवढ्या मोठ्या पदावर आहात. तत्त्वज्ञानाचे सुप्रसिद्ध संशोधक म्हणून संपूर्ण युरोप खंडात प्रसिद्ध आहात. आता पुढं काय? मी पुन्हा डब्लिनला येईन तेव्हा तुम्ही ट्रिनिटीचे कुलगुरू असाल.’’ ते म्हणाले ः ‘‘बिलकूल नाही, आता मला साहित्यिक व्हायचं आहे.’’

No comments: