Friday, October 9, 2015

मुलगी म्हणजे काय? (संदीप वासलेकर)

मुलगी म्हणजे काय? (संदीप वासलेकर)
- संदीप वासलेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2015 - 02:00 AM IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिले चार क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. यश मिळवलेल्या या युवक-युवतींना संवर्धन, न्याय, सामंजस्य, प्रामाणिकपणा, लोकहित, कमकुवत वर्गांना सक्षम करण्याची मनापासून इच्छा... ही मूल्यं जोपासूनच येत्या ३० वर्षांत सरकारमध्ये काम करावं लागेल. प्रश्‍न केवळ विकासाचा नाही. येत्या ३० वर्षांत मानवतेच्या अस्तित्वाचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत या युवक-युवतींनी स्त्रीप्रधान मानसिकतेला प्राधान्य देऊन, स्वार्थ बाजूला ठेवून शाश्‍वत मूल्यांवर आधारित प्रशासन देशाला द्यावं, ही सदिच्छा!

गेल्या महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिले चार क्रमांक मुलींना मिळाले. महाराष्ट्रात अबोली नरवणे ही युवती प्रथम आली. या मुलींच्या हाती येत्या काही वर्षांत सरकारच्या महत्त्वाच्या खात्यांचा कारभार असेल. लाखो लोकांचं भवितव्य त्यांच्यावर अवलंबून असेल.

मला हे निकाल वाचून काही आश्‍चर्य वाटलं नाही. गेल्या १० वर्षांत ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप’ या आंतरराष्ट्रीय थिंक टॅकमध्ये हजारो उमेदवारांनी अर्ज केले. अर्जदारांमध्ये मुला-मुलींचं प्रमाण जवळजवळ एकसारखंच होतं; परंतु १० वर्षांत जे उमेदवार शेवटच्या मुलाखतीपर्यंत पोचले, त्या ३००-४०० उमेदवारांपैकी दोन-तीन अपवाद सोडले, तर इतर सर्व मुलीच होत्या. सतत १० वर्षं जबाबदारीच्या जागांवर युवतींची निवड झाली. दहशतवादापासून, युद्ध करण्यापासून संबंधित देशांना परावृत्त करणं, आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर या २५ ते ३५ वर्षं वयोगटातल्या मुली महत्त्वाचं काम करतात.
संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) जेव्हा नवीन अधिकारी नेमतो, तेव्हा त्यात मुलींचं प्रमाण जास्त दिसतं. युनो, जागतिक बॅंक, निरनिराळ्या देशांतले थिंक टॅंक हल्ली बहुतेक वेळा मुलींचीच निवड करतात.

येत्या काही वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त करण्यात; तसंच भारतातल्या व जगातल्या राज्य प्रशासनासंबंधी ज्या संस्था आहेत, त्या सर्व ठिकाणी मुलींचं प्रमाण वाढत जाईल. पाश्‍चिमात्य देशांत ते आपल्यापेक्षा जास्त वाढेल; पण आपल्याकडंही ते वाढेल. हे मी खात्रीनं का सांगू शकतो?
गेल्या १० वर्षांत काही हजार उमेदवारांचे अर्ज पाहिल्यावर व गेल्या तीन-चार वर्षांत माझ्या ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकामुळं व ‘सप्तरंग’मधल्या या सदरामुळं असंख्य युवक-युवतींशी संवाद साधल्यावर मला कळलं, की युवकांच्या व युवतींच्या मानसिकतेतच मोठा फरक आहे व समाजाची जडणघडण, राज्य प्रशासन, परिवर्तन या दिशेनं विचार केला तर मुलींची मानसिकता जास्त अनुरूप आहे. म्हणून सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, सामाजिक संस्था इथले वरिष्ठ अधिकारीही मुलींना जास्त प्राधान्य देतात.

जेव्हा मला युवक भेटतात तेव्हा ते विचारतात ः ‘‘मी आंतरराष्ट्रीय पटलावर चमकण्यासाठी तुम्ही मला काय मदत कराल? सरकारच्या नजरेस येईल असं संशोधन करण्याची संधी मला द्याल का? माझी अमुक तमुक महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख करून द्याल का? माझ्या या प्रोजेक्‍टमध्ये तुम्ही भाग घ्याल का? मी लवकरात लवकर श्रीमंत व प्रसिद्ध होण्यासाठी काही मदत कराल का?’’
जेव्हा मला युवती भेटतात, तेव्हा त्या विचारतात ः ‘‘मी राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खरोखर परिणाम होण्यासाठी एखादं छोटं काम करून सुरवात करू शकते का? मला श्रेय घेण्याची घाई नाही; पण सुखी व समाधानी राहाता येईल एवढं अर्थार्जन होऊ शकेल का? मला इतरांबरोबर समान पातळीवर काम करण्याची संधी मिळेल का?’’
मुलांच्या प्रश्‍नाचा रोख हा ‘मी कर्तृत्ववान आहे; पण एक-दोन ओळखी मिळाल्या तर पटकन वर चढेन. मी, माझं, माझ्यासाठी हेच ध्येय घेऊन मला सरकारमध्ये अथवा एखाद्या थिंक टॅकमध्ये जायचं आहे,’ अशा प्रकारचा असतो.
मुलींच्या प्रश्‍नाचा रोख समाजाचं संवर्धन कसं करता येईल, यावर असतो. ते करताना जीवन समाधानी झालं पाहिजे ही त्यांची रास्त अपेक्षा असते. हे निरीक्षण मी बहुतांश पाहणीच्या आधारावर मांडलेलं आहे. खरोखरच सामाजिक बदल करण्यासाठी दूरदृष्टीचे युवकही मला भेटलेले आहेत व अतिमहत्त्वाकांक्षी आणि स्वयंकेंद्रित युवतीही भेटल्या आहेत; परंतु अशी प्रवृत्ती कमी प्रमाणात दिसते.
जगात आज अनेक ठिकाणी विषमता, संघर्ष, द्वेष व हिंसाचार पसरला आहे. भारतातही आपण त्याचं प्रतिबिंब पाहतो. जगाचा अंत जर तिसऱ्या महायुद्धात होणं टाळायचं असेल तर जगाच्या राजकारणाला संवर्धन, सहकार्य, सामंजस्य, सहनशीलता हे गुण जे बहुसंख्य मुली-युवती-महिलांमध्ये दिसतात त्यांची गरज आहे. स्वार्थ, अभिमान, लोभ, महत्त्वाकांक्षा हे स्वभावगुण मुलांमध्ये व पुरुषांमध्ये बहुसंख्य प्रमाणात दिसतात. त्याआधाराने जगातले देश राज्य कारभार करत राहिले, तर येत्या काही दशकांत ‘इसिस’सारख्या संघटना वाढतील. निर्वासितांचे लोंढे पसरतील, हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते निवडून येतील व ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी युद्ध करतील. त्यातून कदाचित महायुद्धही होईल.

मुलगा अथवा मुलगी, युवक किंवा युवती, पुरुष अथवा स्त्री हा एक मानसिक फरक आहे. अर्थात त्याला अपवाद आहेत व या अपवादाचं जगातलं मोठं उदाहरण म्हणजे बराक ओबामा व हिलरी क्‍लिंटन.
ओबामा त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर सर्वप्रथम गरीब लोकांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व खर्च केलं. जगाची आर्थिक अधोगती थांबवली. जॉर्ज बुश यांनी महायुद्धाच्या दिशेनं जी वाटचाल सुरू केली होती, त्याची गती संथ केली. इराक व अफगाणिस्तानमधून अमेरिकेचं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. इराण व क्‍यूबा या अमेरिकेच्या शत्रूंबरोबर पुन्हा मैत्री केली. अर्थात ओबामा यांनी रशियाबरोबर वैरही निर्माण केलं. इतरही काही चुका केल्या. मात्र, बहुतांश त्यांनी महिलेची मानसिकता वापरून संवर्धन व सामंजस्य यावर भर दिला.
हिलरी क्‍लिंटन यांनी परराष्ट्रमंत्री झाल्यावर ज्यांनी ओबामांसाठी निवडणुकीत काम केलं होतं, त्यांना परराष्ट्र मंत्रालयात नोकरी मिळणार नाही याची व्यवस्था केली. लीबियावर हल्ला केला. इतरही ठिकाणी युद्ध करण्याचा ओबामांकडं आग्रह धरला; पण तो त्यांनी ऐकला नाही.

पुढच्या निवडणुकीत जर हिलरी निवडून आल्या तर त्या श्रीमंतांना मदत करतील, गरिबांकडं दुर्लक्ष होईल व एखाद्या छोट्या-मोठ्या कारणावरून त्या युद्ध करण्यास मागं-पुढं पाहणार नाहीत. कारण त्या एक स्त्री असल्या तरी त्यांची मानसिकता पुरुषाची आहे. असंच वर्णन पूर्वी मार्गारेट थॅचर यांचंही केलं जाई.
युरोपमध्ये नॉर्वे व जर्मनीत महिला पंतप्रधान आहेत. तिथं आर्थिक वृद्धी, सामाजिक स्वास्थ्य व जागतिक शांती या धोरणांवर भर आहे. युरोपमधला ब्रिटन व फ्रान्स सोडून इतर जवळजवळ सर्व देशांत महिला महत्त्वाच्या मंत्रिपदांवर आहेत. हे सर्व देश संशोधन, सामंजस्य व शांतता या मतप्रणालीचा पुरस्कार करतात.
कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन या देशांचं पूर्ण नेतृत्व महत्त्वाकांक्षी पुरुषांच्या हातात आहे. हे देश कडवा राष्ट्राभिमान, मोजक्‍या उद्योगपतींचे हितसबंध, शस्त्रास्त्र स्पर्धा व वेळ पडल्यास युद्धाची तयारी अशा मतांचे आहेत.
एकदा एका संशोधन संस्थेनं भारतातल्या पंचायत कारभाराचं सर्वेक्षण केलं, तेव्हा असं समजलं की, ज्या पंचायतींमध्ये महिलांचं राज्य होतं, तिथं आरोग्य, शिक्षण व पाळणाघर यावर खर्च केला गेला होता... जिथं पुरुषांचं राज्य होतं, तिथं देवळं अथवा दुसरी एखादी मोठी दिमाखदार वास्तू बांधण्यावर खर्च केला गेला होता.

गेल्या पाच हजार वर्षांत जगातल्या सर्वच देशांनी विषमता, अन्याय, हिंसाचार यांचा अनुभव घेतला. पूर्वी तर गुलामगिरी होती. धार्मिक मतभेदांवरून रस्त्यात सुळावर चढवण्याची प्रथा होती. काही शतकं वसाहतवाद होता. यामुळं दर ३०-४० वर्षांनी कुठं ना कुठं तरी युद्धं होत असत. गेल्या एक हजार वर्षांत तर युद्धामुळं ५० कोटी लोकांचा वध रणांगणावर झाला. त्याशिवाय अप्रत्यक्षरीत्या जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांची गणतीच नाही. ही सर्व युद्धं व जीवितहानी पुरुषप्रधान राजे व नेते यांनी केली.
यापुढं जे महायुद्ध होईल, ते अखेरचे असेल. आण्विक, जैविक व अवकाशस्थ शस्त्रांमुळं सारं विश्‍व उद्‌ध्वस्त होईल. सर्व मनुष्य, प्राणी व वनस्पती संपुष्टात येतील.
या युद्धाची सुरवात भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. पाकिस्ताननं जर क्षेपणास्त्र सोडून मुंबईवर अणुबॉम्बचा हल्ला केला, तर क्षेपणास्त्र पाकिस्तानहून निघाल्यानंतर केवळ आठ मिनिटांत मुंबईवर अणुबॉम्ब पडेल. पुढच्या तीन मिनिटांत मुंबई बेचिराख होईल. त्यानंतरच्या ३० मिनिटांत पुण्यापर्यंत विषारी किरणं पसरतील. भारतानं प्रतिहल्ला केला, तर संपूर्ण पाकिस्तान नष्ट होईल; पण त्याआधी पुण्यापर्यंतचा संपूर्ण भाग येत्या ५०० वर्षांपर्यंत मनुष्यवस्तीसाठी उपयोगी राहणार नाही. शिवाय युद्ध भारत व पाकिस्तान यांच्यापुरतंच मर्यादित राहणार नाही. एक-दोन दिवसांत ते जगभर पसरू शकेल.
विश्‍वाचा असा अंत होऊ नये म्हणून जागतिक संस्था, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय संघटना, थिंक टॅक व सरकारे उमेदवार निवडताना हुशारीपेक्षा मानसिकतेला प्राधान्य देतात.

अबोली नरवणे व तिच्याबरोबर निवड झालेले युवक आणि युवती यांना संवर्धन, न्याय, सामंजस्य, प्रामाणिकपणा, लोकहित, कमकुवत वर्गांना सक्षम करण्याची मनापासून इच्छा ही मूल्यं जोपासूनच येत्या ३० वर्षांत सरकारमध्ये काम करावं लागेल. प्रश्‍न केवळ विकासाचा नाही. येत्या ३० वर्षांत मानवतेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत या वर्षी निवडून आलेले युवक व युवती हे स्त्रीप्रधान मानसिकतेला प्राधान्य देऊन, स्वार्थ बाजूला ठेवून व शाश्‍वत मूल्यांवर आधारित असं प्रशासन आपल्या देशाला देतील, ही सदिच्छा!

No comments: