Tuesday, October 6, 2015
कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)
० ऑगस्ट रोजी माझ्या ‘जागता पहारा’ ब्लॉगने दहा लाखाचा पल्ला ओलांडला आणि पुढल्या ४३ दिवसात २२ सप्टेंबर रोजी आणखी दोन लाखाची त्यात भर पडून बारा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. नेमके सांगायचे तर पंचवीस महिन्यात इतकी झेप झाली. पण त्यात मागच्या सात-आठ महिन्यात ब्लॉगचे वाचक कमालीचे वाढत चालले आहेत. पण त्याच दरम्यान अकस्मात काही विपरीत प्रतिक्रीया व अस्वस्थ आत्मे सतावू लागल्यासारखे अंगावर येऊ लागले. म्हणून त्यावर सविस्तर लिहायचा विचार केला.
मागले काही दिवस एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली, की अनेक तथाकथित पुरोगामी, सेक्युलर सोशल माध्यमातून माझ्यावर व्यक्तीगत हल्ला करू लागले आहेत. त्यातही अनेक पत्रकार व मोठ्या माध्यमातील भुरट्यांचा समावेश आहे. खेरीज त्यांचे सहप्रवासी म्हणजे त्यांच्यातले अन्य टोळीबाजही समाविष्ट आहेत. अशा लोकांनी अकस्मात माझ्याविरुद्ध आघाडी उघडल्यासारखे हल्ले कशाला सुरू करावेत, याचे कोडे मला पडलेले आहे किंवा होते. कारण माझ्या लिखाणातून ज्या भूमिका वा मुद्दे मी मांडत असतो, त्यात नवे असे काहीच नाही. मागल्या तीन दशकात सातत्याने मी हेच करत आलेलो आहे. ते म्हणजे जे काही प्रचलित व प्रस्थापित माध्यमातून प्रसिद्ध होत असते, किंवा टाहो फ़ोडून सांगितले जात असते, त्याची उलटतपासणी करणे. त्यात लपवल्या गेलेल्या दुसर्या बाजूवर प्रकाश टाकणे, इतकीच माझी भूमिका राहिली आहे. मग विषय शिवसेना, भाजपा, संघ वा हिंदूत्वाचा असो, किंवा मोदी-ठाकरेंचा विषय असो. त्याविषयी जेव्हा काहूर माजवले जाते, तेव्हा त्यामध्ये सराईतपणे जी माहिती वा तपशील दडवलेला असतो, त्याला समोर आणायचे काम मी अगत्याने केलेले आहे. अर्थात माझ्या हाताशी साधने म्हणाल तर काहीच नाहीत.
आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते.
अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे.
दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो.
पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले.
गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:)
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment