...जेव्हा मी ऐश्वर्य पाहिलं! (संदीप वासलेकर)
| |
- संदीप वासलेकर
रविवार, 27 सप्टेंबर 2015 - 02:30 AM IST
| |
Tags: saptarang, sundeep waslekar
| |
आफ्रिका खंडाचं पश्चिमेकडचं सर्वांत दूरचं टोक म्हणजे गोरी बेट. या बेटाकडून सरळ रेघ पश्चिमेच्या दिशेनं मारली तर ती अमेरिकेच्या किनाऱ्याला पोचते. बेटावर सतत अटलांटिक महासागराच्या लाटा आदळत असतात.
या बेटावर सागराला लागून एक मोडकं घर आहे. आत खूप खोल्या आहेत; पण न्हाणीघर अथवा संडास नाही. त्या घरात दोन-तीन भुयारंही आहेत. तिथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गेले व भोवतालचे मंत्री, पत्रकार, सुरक्षा सैनिक या सगळ्यांना विसरून ढसाढसा रडले. त्याआधी काही वर्षांपूर्वी तिथं नेल्सन मंडेला गेले होते. तेही अश्रू आवरू शकले नव्हते. ओसाड पडलेल्या त्या घरात पोपसुद्धा गेले होते. त्यांनी जमिनीवर डोकं ठेवून वंदन केलं. नंतर त्यांनी चेहरा वर केला तर त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
मी तिथं ऑगस्ट महिन्यात गेलो होतो. मला रडू आलं नाही; पण माझं मन विषण्ण झाले. काही सहकारी माझ्याबरोबर होते. आमची सर्वांची खाण्यावरची वासना उडाली. कसाबसा एक पेला आल्याचा रस प्यायलो व जेवणाचा बेत रद्द केला. अतिशय खिन्न मनःस्थितीत, एकमेकांशी न बोलता आम्ही बंदराचा रस्ता धरला व बोटीत बसून डाकारला निघालो.
गुलामगिरी संपली तरी पिळवणूक संपली नाही. हे गोरी बेट सेनेगाल देशात आहे. बाजूचे देश म्हणजे गिनी, माली, मॉरिटानिया, गांबिया. या सर्व देशांतून गुलाम पकडण्यात येत असत. नंतर तिथली खनिज संपत्ती व नैसर्गिक विविधता यांची लूटमार सुरू झाली. तिथं अनेक वर्षं फ्रेंचांनी राज्य केलं. सुमारे ५० वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं; पण अजूनही आर्थिक नाड्या परकीय शक्तींच्याच हातात आहेत.
सेनेगालची राजधानी डाकार इथं गरिबीची चिन्हं सर्वत्र दिसतात. रस्त्यावरचा कचरा, छोट्या बसमध्ये भरगच्च बसलेले लोक, रस्त्याच्या बाजूला स्वस्तात माल विकणाऱ्या गाड्या. खेड्यांमध्ये गेल्यावर बकालपणा दिसत नाही; पण गरिबी दिसते. बाजूच्या गिनी, माली व मॉरिटानिया या देशांत तीच परिस्थिती.
अशा या गुलामगिरीचा कटू इतिहास असलेल्या, गरिबीत राहणाऱ्या, कठीण जीवन जगणाऱ्या देशात एक अनोखा अनुभव आला. लोक अतिशय आनंदी दिसत होते. एकमेकांशी मैत्रीनं वागत होते. भरगच्च भरलेल्या बोटींमध्ये व बसमध्ये एकमेकांना मदत करत होते. गप्पा मारत होते. आम्ही भारतातून आलो हे समजल्यावर जेवणाचा आग्रह करत होते. ‘फकीरा, चल चला चल’ हे गाणं हिंदीत गात होते. अगदी रस्त्यात कोणतीही टॅक्सी थांबवली तरी ‘अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, ‘फकीरा, चल चला चल’ ’ असं म्हणत टॅक्सीचालक आमचं स्वागत करत होते. त्या देशात फारशी भारतीय वस्ती नाही. भारतीय पर्यटकही तिथं विशेष जात नाहीत. मग हे ‘फकीरा, चल चला चल’ हे काय प्रकरण आहे? मला उत्सुकता होती म्हणून मी अनेक सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला.
अनेकांशी बोलल्यावर समजलं, की सेनेगालमध्ये ९५ टक्के मुस्लिम आहेत व पाच टक्के अल्पसंख्याक ख्रिश्चन आहेत. अनेक जनजाती आहेत; पण त्या लोकांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म अंगीकारलेला आहे. ख्रिश्चन फक्त पाच टक्के असून त्यांना आपण अल्पसंख्याक आहोत ही जाणीव नाही. सर्व धर्मांमध्ये व जनजातींमध्ये सद्भावना आहे. मुस्लिम धर्मगुरू ‘अल् कायदा’ व इसिस’ला झुगारून देऊन इतर धर्मांवर प्रेम करण्याचा उपदेश देतात, तर ख्रिस्ती धर्मगुरू गरिबांचं धर्मांतर करण्याच्या विरोधात असतात.
सेनेगालचे पहिले राष्ट्राध्यक्ष लिओपोल्ड सेंघार हे ख्रिश्चन होते. त्यानंतर मुस्लिम राष्ट्राध्यक्ष झाले; पण त्या सर्वांच्या अर्धांगिनी ख्रिश्चन होत्या. सध्याचे राष्ट्राध्यक्ष मॅकी साल व त्यांच्या पत्नी मुस्लिम आहेत. म्हणजे बहुसंख्याक मुस्लिम असलेल्या सेनेगालमध्ये स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्षं होऊन गेल्यावर प्रथमच मुस्लिम पत्नी राष्ट्राध्यक्षांसाठीच्या निवासात राहायला आली.
सेनेगालने प्राधान्य देऊन सर्व धर्म व जनजातींमध्ये अतिशय मैत्रीचं वातावरण निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर, शेजारच्या गिनी, मॉरिटानिया व माली या देशांबरोबर एक अद्भुत सहकार्य निर्माण केलं आहे. या चारही देशांतून सेनेगाल नावाची नदी वाहते. ती नदी व त्या नदीवरची सर्व धरणं, बंदरं व कालवे यांवरचा आपला मालकी हक्क सर्व देशांनी सोडला व चारही देशांचा संयुक्त मालकी हक्क निर्माण केला.
म्हणजे नदी सेनेगालमध्ये आहे; तीवरचं ज्यामा धरण सेनेगालमध्ये आहे; पण दोन्हींवरचा मालकी हक्क सेनेगालनं स्वखुशीनं इतर देशांनाही दिला आहे. या नदीवर सेनेगालचे राष्ट्राध्यक्ष अथवा मंत्रिमंडळ संयुक्त समितीच्या परवानगीशिवाय एक फूटही बांधकाम करत नाहीत अथवा कालवा खोदण्याचा आदेश देत नाहीत. मालीमध्ये मनाताली धरण आहे; पण त्यात पाणी किती राहणार हा निर्णय माली सरकार घेत नाही. सर्व काही ‘संयुक्त समिती’ ठरवणार. गिनीमध्ये एकही धरण नसल्यानं गिनीचे माजी पंतप्रधान कबिन कोमारा संयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडं चारही देशांच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा जास्त अधिकार आहेत. केवळ आपल्या निसर्गसंपदेवरचं प्रभुत्व शेजारच्या देशांना वाटून सेनेगालचे लोक थांबलेले नाहीत, तर आफ्रिकेच्या बाहेरून काय काय शिकता येईल याचा शोध घेण्यास त्यांनी सुरवात केली, तेव्हा त्यांना ‘भारतातले सिनेमा खूप चांगले असतात’ हे कळलं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन ही नावं सेनेगालच्या घराघरात पोचली आणि ‘फकीरा, चल चला चल’ या गाण्याची लय काही टॅक्सीचालकांना आवडल्यामुळं हळूहळू ती सर्व टॅक्सीचालकांमध्ये पसरली.
एवढी गरिबी असताना देशात सर्वधर्मसद्भावना, शेजारी देशांबरोबर महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांचं सार्वभौमत्व वाटून घेणं व दुसऱ्या देशाची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणं यामागं काय रहस्य आहे?
हवामान खात्यात काम करणारा एक युवक मला विमानतळावर भेटला. तो म्हणाला ः ‘‘हे बघा, गरिबीनिर्मूलन करून देशाचा विकास करण्यासाठी अनेक वर्षं लागतील; पण एकमेकांशी मैत्री, विश्वास व सर्व काही शेअर करण्याची भावना जोपासण्यासाठी मानसिकता लागते; वेळ लागत नाही. तुम्हीच सांगा की श्रीमंती व सामाजिक सुख या दोन्ही गोष्टींमध्ये खरं ऐश्वर्य कोणतं?’’
मी त्याच्याकडं अवाक् होऊन पाहत राहिलो व मला ऐश्वर्य म्हणजे काय ते कळलं!
आफ्रिकेतले पश्चिम विभागातले देश आर्थिक परिमाणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर मागासलेले आहेत. प्रत्येक देशाला व देशातल्या प्रदेशाला आपल्या विभागातली संपदा संकुचितपणे फक्त आपल्याच लोकांसाठी वापरायचा मोह झाला, तर मी समजू शकलो असतो; पण जिथं ऐश्वर्याची व्याख्याच सद्भावना, मैत्री, परस्परविश्वास, प्रेम, दया अशी केली जाते, तिथं विकास ही कल्पना खूप लहान वाटते आणि तरीही विकास सहजासहजी होतो. चार देश एकत्र येऊन त्यांनी सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यायला सुरवात केल्यापासून शेती, वीज, जलवाहतूक वाढली आहे. व्यापार वाढला आहे व अजूनही आर्थिक आव्हानं असली तरी गरिबीचे निर्मूलन व्हायला चांगल्या प्रकारे सुरवात झाली आहे.
डाकार ते मुंबई या परतीच्या प्रवासात विमानात काही नियतकालिकं चाळत होतो. त्यात आशिया खंड कसा एकविसाव्या शतकातला समृद्ध खंड होईल याची वर्णनं होती व विशेषतः चीन, भारत, कोरिया या तीन देशांत जास्तीत जास्त श्रीमंती येईल, अशा आशयाचं ते विश्लेषण होतं.
मुंबईत आल्यानंतर काही दिवस कामाचा बोजा वाढल्यानं वर्तमानपत्रं वाचण्यास वेळ मिळाला नाही. शेवटी २३ ऑगस्टच्या रविवारी आशियातली वर्तमानपत्रं वाचायला घेतली. त्यात या प्रमुख बातम्या होत्या ः-
* भारत व पाकिस्तान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधली बोलणी होण्याआधीच फिसकटली. भारतातली वर्तमानपत्रं म्हणाली ः ‘पाकिस्तानी नेते घाबरले.’ पाकिस्तानी वर्तमानपत्रं म्हणाली ः ‘आता पुन्हा एकदा युनोत दार ठोठावून भारताची कोंडी करावी.’
* उत्तर व दक्षिण कोरियात सीमेवर परस्परांवर गोळ्यांचा वर्षाव. उत्तर कोरियाची दक्षिण कोरियावर बॉम्ब टाकण्याची धमकी.
* चीननं पुन्हा एकदा दक्षिण समुद्रातल्या बेटांवर मालकी हक्क बजावला. व्हिएतनामला तंबी दिली.
मी वर्तमानपत्रं बाजूला ठेवली व सेनेगालच्या दौऱ्यात काढलेले फोटो पाहायला सुरवात केली!

No comments:
Post a Comment