‘ति ची’ आपली ओळख तशी लहानपणीच होते. नकळत्या वयात आई-आजी / काकी-मामी, कुणीतरी कुणालातरी सांगत असतं. ‘विक्रांत मुखदुर्बळ. त्याच्या वयाची असताना राधा किती बोलायची.’ ‘मित्रांशी भांडण झाल्यावर, शार्दूल अजूनही बुळ्यासारखा रडतो. धाकटा अक्षयच जातो दादाचं रक्षण करायला,’ असे संवाद पुन्हापुन्हा ऐकू येतात. उपस्थित हसतात, ते आपल्याला आवडत नाही. अशाच काहीशा प्रसंगांतून आपल्या आयुष्यात ‘तिची’ एंट्री होते, ती कायमचीच. पुढे शाळा-कॉलेजात आपल्यापेक्षा चांगलं खेळून कोणी राज्यपातळी गाठतं, कुणी चित्रकलेत ‘ए’ ग्रेड मिळवतं, तर कोणी भाषणात, नाटक-गाण्यात बाजी मारतं. आपण त्यांच्यापेक्षा मागं असतो. नाटकातलं काम कधी जमलं, तरी गणित येत नसतं. अशा वेळी तिथे ‘ती’ असतेच आणि सोबत ‘अस्वस्थता’ नावाची तिची मैत्रीण. हळूहळू त्या दोघी आपल्या अंगवळणी पडतात. वाढत्या वयाबरोबर ‘ती’चं अस्तित्व आपल्या आत मुरतं. याच्या‘सारखी’ चांगली नोकरी, त्याच्या‘पेक्षा’ जास्त पैसा, करिअर, अमक्या‘सारखा’ नवरा, तमकी‘सारखी’ किंवा तिच्या’पेक्षा’ स्मार्ट बायको, हुशार मुलं, आयुष्यातल्या अचिव्हमेंट.. सगळीकडे तुलनेच्या मापदंडाची सवय आपल्याला लागते आणि आयुष्यातलं समाधान संपून जातं. आपण स्पर्धेच्या ताणात तरी जगतो किंवा हरल्याच्या. ‘ती’ आणि ‘अस्वस्थता’ आपल्याला चहूबाजूंनी वेढतात.
‘ती’ म्हणजे अर्थात, ‘तुलना’ हे आता लक्षात आलंच असेल. प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्ट आपल्याला कोणा‘सारखी’ तरी हवी असते किंवा कोणा‘पेक्षा’ जास्त. त्यापेक्षा कमी मिळाली, की आपल्याला कमीपणा वाटतो आणि त्या न्यूनगंडातून अस्वस्थता, दु:ख, असहायता, पराभूत भावना, ताण, संताप, निराशा अशा नकारात्मक भावना आलटून पालटून येत राहतात. मार्क ट्वेन तर म्हणतो,‘तुलना म्हणजे आनंदाचा अंत.’
थोर लोकांशी उदा. गांधीजी, बिल गेट्स, चर्चिल, अमिताभ बच्चन, लतादीदी, सचिन अशा माणसांशी स्वत:ची तुलना केल्यानं फार त्रास होत नाही, कारण ते थोर आहेत हे मान्यच असतं. (अपवाद असतीलही). पण सर्वसामान्यांमधून येऊन विशिष्ट विषयांत चांगली उंची गाठणाऱ्या लोकांशी स्वत:ची तुलना केली तर कुठल्या भावना येतात? याबाबत एका कार्यशाळेत एक खेळ घेतात. काही अप्रसिद्ध, चारचौघांसारख्या माणसांची माहिती सांगितली जाते. उदा. अमुक व्यक्ती वयाच्या दहाव्या वर्षी पाच भाषा बोलू शकत होती, कुणी चौदाव्या वर्षी अमुक केलं होतं, अशी माहिती दिली जाते. त्यानंतर ‘तुम्हाला याबद्दल कसं वाटतंय,’ असं विचारलं जातं. लोकांना कौतुक वाटतं, अचंबा वाटतो, काहींना वैषम्यही वाटतं. त्यानंतर प्रश्न विचारले जातात. उदा. ‘तुम्ही दहाव्या वर्षी किती भाषा बोलत होतात? चौदाव्या वर्षी काय काय येत होतं?’ या प्रश्नांनंतर ‘आता कुठल्या भावना जाणवल्या?’ असं विचारलं जातं. या तुलनेनंतर मात्र बहुतेक जण नर्व्हस झालेले असतात. आपल्याकडे यातलं काहीच नाही, आपण कुठेच पोचत नाही, असं निराश वाटत असतं, भीती, ताण वाटत असतो. अनोळखी, असंबद्ध लोकांच्या अर्धवट तपशिलाशी क्षणभरासाठी तुलना केल्यावर ताण, निराशा वाटत असतील, तर आयुष्यभर दिवसातून दहा वेळा कुणाशी ना कुणाशी तुलना करत आपण जगतो, तेव्हा या भावना किती व्यापून उरत असतील? तो बॅरिअर मनात किती घट्ट, कायमचा रुतलेला असेल? त्यामुळे ‘जोशांच्या मुलानं केवढा सुंदर बंगला बांधलाय,’ असं आईनं सहज सांगितलं तरी मुलाला ते सरळ अर्थानं घेता येत नाही. ‘तुला नाही जमलं तेवढं कमवायला,’ असं तो ते ऐकतो. तुलनेचा बॅरिअर असा सतत मध्ये येतो, मन गढूळ करतो. निखळपणे पाहता न आल्यामुळे कुठल्याही संवाद, कृती, कटाक्षातून अपमान, टोमणा बोचतो. अस्वस्थताच गोळा केली जाते.
तुलनेच्या बॅरिअरमधून सुटण्याचे दोन मार्ग असू शकतात. एक तर तिची वेगवेगळी रूपं ओळखून तिच्यापासून दूर राहायचं. ‘तुलना जिथे संपते, तिथेच स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची सुरवात होते’ हे सुभाषित प्रमाण मानून राहायचं. स्वत:च्या वेगळ्या असण्यावर प्रेम करायचं, त्यातूनच आत्मविश्वास मिळवायचा. तुलना स्वत:शीच करायची. कालच्यापेक्षा आज आपण कुठे आहोत? ते मोजत पुढे जायचं, हे काहींना जमतं. काहींना कधीकधी जमतं; पण अनेकांच्या मनावर दुसऱ्यांची मतं, अपेक्षाच बरेचदा राज्य करत असतात. त्यामुळे सर्वांना सदैव जमणं अवघड असतं. अशा वेळी तुलनेशी दोस्ती करायची. हवं तसं तिला वळवायला शिकायचं. न्यूनगंडामुळे काही न सुचण्याएवढी अस्वस्थता येते, तेव्हा आपल्यापेक्षा खाली असलेल्यांशी तुलना करायची. याउलट आभाळाला हात टेकल्यासारखे वाटतात असा अहंगंड येतो, तेव्हा आभाळाच्या वर पाहायचं. ज्यांच्या कर्तृत्वापर्यंत आपली नजरही पोचत नाही, त्यांच्याशी तुलना करायची. मग आपण स्वत:कडे वस्तुनिष्ठपणे पाहू शकतो. बॅरिअर दरवेळी तोडलाच पाहिजे असं काही नसतं. त्यात अडकायचं नाही हे महत्त्वाचं. त्यातून बाहेर पडण्यासाठी छोटी फट तयार असेल, तरी हवं असेल तेव्हा आपण मुक्त असू शकतो.

No comments:
Post a Comment