आटोक्याबाहेरची लोकशाही (उत्तम कांबळे)
| |
- उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 4 ऑक्टोबर 2015 - 04:00 AM IST
| |
Tags: saptarang, uttam kamble
| |
ऑगस्टमध्येही कोकणात पाऊस नव्हता हे एक इपरितच; पण ते मान्य करत मुंबई-गोवा हायवेवरचं माणगाव ओलांडलं. खरंतर या रस्त्याला हायवे का म्हणतात, ते कळत नव्हतं. पूर्णपणे खड्ड्यानं भरलेला रस्ता हायवे कसा काय होऊ शकतो, हे माय-बाप सरकारलाच ठाऊक. माणगाव ओलांडल्यानंतर ढालघर, गोरेगाव, वडघर ही छोटी गावं भेटतात. हायवेच्या उजव्या बाजूला तीन किलोमीटरवर वडघर... तिथं पोचेपर्यंत अनेकदा मोबाईलची रेंज जाते-येते. एमएसईबीच्या विजेसारखी... वडघरच्या जवळच समाजवादी साथींनी अथक् परिश्रम घेऊन सानेगुरुजींचं सुंदर स्मारक उभं केलंय... महाराष्ट्रात इतकं सुंदर स्मारक, भव्य स्मारक आणि युवा पिढी घडवणारं, तिला माणूस पाहायला शिकवणारं, विचारी बनवणारं स्मारक बहुतेक अन्यत्र कुठं नसावं... स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. आर्थिक विवंचनेमुळं काम रोडावलंय... महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मस्थळांचा, देवालयांचा जीर्णोद्धार करण्याची मोहीम देशभर सुरू आहे; पण उद्याचा नागरिक घडवणाऱ्या या स्मारकाकडं शासनचं म्हणावं तितकं लक्ष नाही. स्मारकात फिरत असताना फोन येत होता; पण रेंजअभावी तो तुटायचा, ऐकायला काहीच यायचं नाही. या स्मारकात ‘मनोविकास प्रकाशन’चे अरविंद पाटकर यांनी कार्यकर्त्यांसाठी एक वैचारिक शिबिर ठेवलं होतं. दरवर्षी आपला वाढदिवस ते हेच कारण घेऊन साजरा करतात. मीही शिबिरासाठी गेलो होतो. स्मारकाबाहेर कुठंतरी फोनसाठी रेंज मिळेल म्हणून मी चालू लागलो. जंगलात केकावली, कोकिळेचं गुंजन, छोट्या-मोठ्या पक्ष्यांचा चिवचिवाट, गलबलाट ऐकत चालणं केवळ अवर्णनीय असतं...
हे सारं आठवतच मी त्याचा फोन घेतला.
‘‘हॅलो, कसा आहेस? काय म्हणतेय निवडणूक?’’ या माझ्या प्रश्नावर तो अतिशय गंभीर होऊन म्हणाला ः ‘‘लोकशाही आटोक्याबाहेर जातेय.’’
मला त्याच्या वाक्याचा अर्थ नीट कळला नाही म्हणून मीच म्हणालो ः ‘‘मला काही कळलं नाहीय. काय म्हणतोयस तू? इथं रेंजही नीट मिळत नाहीय. मी कोकणात आहे.’’
उपहासानं तो म्हणाला ः ‘‘आपली लोकशाहीही आमच्यासाठी फोनप्रमाणंच ‘आउट ऑफ रेंज’ होऊ पाहतेय... आटोक्याबाहेर जातेय. आता नीटच सांगतो ः आमच्या गावातल्या विरोधी पॅनलनं प्रत्येक मताला दीड हजार रुपयांचं वाटप सुरू केलं आहे. याशिवाय आडवी पडणारी बकरी, कोंबड्या वेगळ्याच. कॅन कॅन दारू आणली जातेय. आमचा टिकाव कसा लागणार?’’
आश्चर्य व्यक्त करत मी म्हणालो ः ‘‘बाप रे बाप! खेडेगावात ग्रामपंचायतीच्या एका निवडणुकीत मताला दीड हजार रुपये म्हणजे फारच झालं; पण तुम्ही खचू नका. लढत राहा.’’
तो म्हणाला ः ‘‘कसं लढणार? काय घेऊन लढणार? आम्ही स्वप्नं ठेवतोय आणि ते थैल्या ठेवत आहेत.’’
मी ः ‘‘कुठून आणले त्यांनी पैसे?’’
तो ः ‘‘ते कुठून आणणार? त्यांचा धनी वेगळाच आहे. आमच्या गावाजवळ एक खूप मोठा कारखाना उभा राहणार आहे. त्याला ग्रामपंचायतीकडून बरंच काही मंजूर करून घ्यायचं आहे. आमचे विरोधकच निवडून येण्यात त्यांचा फायदा आहे. त्यांनीच थैल्या उघडल्या आहेत यांच्यासाठी. प्रत्येक उमेदवाराला आणि मतदाराला पैसा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. हरेक मत विकत घेण्याची त्यांची तयारी आहे. मतदार पिसाळल्यासारखे वागतात. निवडणुकीत तीन-चार लाख गुंतवायचे आणि दोन-चार कोटींची कामं करून घ्यायची असा हा प्रकार आहे; पण मतदारांना कळत नाहीय. घरटी चार-पाच हजार मिळतात.’’
मी म्हणालो ः ‘‘पण तुम्ही प्रबोधन का करत नाही? मत विकणं पाप आहे. गुन्हा आहे. आत्मा विकण्यासारखं आहे, हे का सांगत नाही?’’
तो ः ‘‘सांगतोयच आम्ही; पण निवडणुकीनंतर पुण्य मिळवण्यासाठी बऱ्याच मतदारांना तीर्थाटनासाठी नेलं जाणार आहे. काय काय घडतंय, काही सांगता येत नाही. खचल्यासारखं होतं आहे. कसं लढायचं, मतं कशी मिळवायची आणि निवडून कसं यायचं? विरोधक तर आताच विजयी वीरासारखे वागत आहेत. नसत्या लफड्यात पडलोय, असं वाटायला लागलंय. उगीचंच तुम्ही पाठिंबा दिला.’’
मी म्हणालो ः ‘‘हे बघ, तू मागितला होतास म्हणून पाठिंबा दिला होता, हे एकदा नीट समजून घे. पाठिंबा देणाऱ्यांना गुन्हेगार ठरवू नये. चांगल्याच कामासाठी पाठिंबा दिला होता. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी पाठिंबा दिला होता. मला वाटतं की तुम्ही तुमचा विकासाचा कार्यक्रम घेऊनच प्रचार करायला पाहिजे. लोकांवर विश्वास ठेवायला पाहिजे.’’
तो ः ‘‘कसा काय ठेवणार? ते तर खुलेआम पैसे घेत आहेत.’’
मी ः ‘‘तरीही विश्वास ठेवायला पाहिजे.’’
तो ः ‘‘कमाल आहे तुमची. तुम्ही इकडं या आणि ठेवा विश्वास.’’
मी ः ‘‘हे बघ, व्यापक लोकशिक्षण आणि विश्वास एवढ्या दोनच गोष्टी तुमच्याकडं आहेत. मला वाटतं, त्या तुम्ही भरपूर वापराव्यात. पुनःपुन्हा त्याच वापराव्यात. सगळाच माणूस काही आतून-बाहेरून खराब नसतो आणि जो बदलत असतो, तोच माणूस असतो.’’
बोलता बोलता दोन-चार वेळा तरी फोन तुटला असावा; पण तरीही ट्राय-रिट्राय करत आम्ही बोलतच राहिलो. पुन्हा फोन लागला तेव्हा मी म्हणालो, ‘‘अवघड सोपं करून सांग...’’ पण पुढचं बोलण्यापूर्वी फोन कटला...असो.
निवडणुकीत गैरप्रकार हा काही आता नवा विषय राहिलेला नाही; पण वरून खालपर्यंत तो इतक्या वेगानं जाईल, असं कधी वाटलं नव्हतं. छोटंसं गाव, चार-पाच सदस्य आणि गाव जिंकण्यासाठी होत असलेली आर्थिक उलाढाल लोकशाहीबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण करणारी होती. महात्मा गांधींनी गावावर किती विश्वास ठेवला होता. आपली राज्यघटनाही ग्रामकेंद्रित व्हावी, अशी इच्छा अनेक गांधीवाद्यांनी व्यक्त केली होती. ‘गाव म्हणजे मूल्य’, ‘गाव म्हणजे नैतिक व्यवहार’ अशा कितीतरी गोष्टी गृहीत धरण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गांधींना स्वातंत्र्यात तसंच स्वतंत्र राष्ट्रांत फार रस नव्हता. त्यांना स्वराज्य हवं होतं. १५ ऑगस्ट १९४७ ला देशभर उत्साह, आनंद व्यक्त केला जात असताना या राष्ट्रपित्यानं स्वतःला अंधारात कोंडून घेतलं होतं... दिल्लीपासून लांब कुठं तरी खेड्यात...राज्यात विशिष्ट लोकांच्या हातात सत्ता राहते...स्वराज्यात ती साऱ्यांच्या हातात जाते, राज्य स्पर्धेलाच उभं राहतं....राजकीय स्पर्धा टोकाला जातात...स्वराज्यात सारेच सत्तेचे वाटेकरी असतात...गांधीजींनी काँग्रेस बरखास्त करण्याचा आग्रह धरला होता. त्याऐवजी ‘लोकसेवक’ नावानं संघटन करण्यास सांगितलं होतं; पण इतक्या लवकर तसं केल्यानं अराजकता येईल, असं काँग्रेसला वाटत होतं...शेवटी काँग्रेस कधीच बरखास्त झाली नाही...तिची जागा घेणारा भारतीय जनता पक्ष आला...पक्षीय स्पर्धा टोकाला गेली की स्वराज्याचा संकोच होतो....आता स्वराज्यही नाही आणि लोकशाही टिकवण्यासाठी रोज निवडणुका...रोज स्पर्धा. आता सारं काही राजकारणातल्या बाजारानं विकत घेतलं की काय, असं वाटायला लागलं आहे. जे राजकारणात गुंतवणूक करतात, ते आपली गुंतवणूक दामदुपटीनं काढतही असतात. फुकट कुणी गुंतवणूक करणार नाही. त्याचं काही कारण नाही.
जंगल फिरत असताना मित्राचं एकच वाक्य कानावर आदळू लागलं. ‘लोकशाही आटोक्याबाहेर गेलीय...!’ त्याच्या दृष्टीनं ते खरंही होतं... मग प्रश्न पडला आटोक्याबाहेर गेली म्हणजे कुठं गेली, कुणाच्या मुठीत गेली आणि कुणाच्या एटीएममध्ये जाऊन बसली...? मित्राच्या गावातच असं घडत होतं, असं नाही. जळगाव जिल्ह्यात एरंडोलमध्ये डॉ. पाटलांचा असाच पराभव झाला होता. अनेक गावांमध्ये अशी तक्रार सुरू झालीय, की लोकशाही आमच्या आटोक्याबाहेर जातेय. गावाला एवढे सगळे अधिकार, एवढ्या सुविधा, एवढे हक्क मिळताहेत; पण हे सारं लोकशाहीतून वापरता येत असेल का? मनगटशाहीच्या आणि थैलीशाहीच्या जोरावर गाव ताब्यात घेणारे खरंच लोकशाहीसाठी वाट मोकळी करून देत असतील का?
माझ्या मित्राची व्यथा मी अनेकांशी बोलत होतो. माझं मन मला सांगत होतं, की काही झालं तरी माझ्या मित्राचं पॅनलच निवडून येईल... काय होणार, ठाऊक नव्हतं... मतदान व्हायचं होतं, निकाल लागायचा होता.. पण विश्वास गमावून चालत नाही... लोकशाही जशी मनात असते तशी विश्वासातही असते... मला तरी रोजच स्वप्न पडतंय की थैलीशाहीशी टक्कर देणारा हा माझा मित्रच विजयी होईल...
(ता. क. ः हा मजकूर प्रसिद्ध होण्यापूर्वी निकाल लागला आणि मित्राचं पॅनल विजयी झालं. मित्र म्हणतो ः ‘हा चमत्कार आहे’ आणि लोकशाही तर चमत्कारावर नाही चालत...!)

No comments:
Post a Comment