'का' आणि 'काय' मधला फरक (संदीप वासलेकर)
| |
- संदीप वासलेकर
रविवार, 29 मार्च 2015 - 02:30 AM IST
| |
Tags: saptarang, sundeep waslekar
| |
व्हेनिस शहरात अँतोनिया सॉतर नावाची एक फॅशन डिझायनर आहे. तिनं केलेल्या प्रत्येक पोशाखाची किंमत सुमारे ३० ते ५० लाख रुपये असते. जगातले अनेक श्रीमंत लोक ते कपडे विकत घेतात व दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात एका समारंभात घालतात. तेव्हा सर्वांनी चेहऱ्यावर मुखवटा घालणं सक्तीचं असतं.
एवढे महागडे कपडे घालून चेहऱ्यावर मुखवटा असल्यानं ते घालणाऱ्यांना कुणी ओळखत नाही. ते कपडे इतर समारंभांत घालणंही कठीण. असं असूनही अनेक श्रीमंत लोक एका रात्रीसाठी ३०-५० लाख रुपये का खर्च करतात?
अँतोनिया सॉतर कधीही ‘माझे कपडे अनोखे आहेत अथवा सुंदर आहेत,’ अशी जाहिरात करत नाही, तर आपण फॅशन डिझाईनचा व्यवसाय का करतो, हे सांगते. ती म्हणते ः ‘‘लोकांना आपण एका वेगळ्या युगात अथवा वेगळ्या विश्वात वास्तव्य करत आहोत, याची अनुभूती मिळण्यासाठी मी हा व्यवसाय करते.’’
म्हणजे ती जे काम करते ते ‘का’ करते हे सांगते, ‘काय’ करते (पोशाखनिर्मिती) हे ती सांगत नाही. जगातले सर्वांत श्रीमंत व सामर्थ्यवान लोक तिची भेट घेण्यासाठी आतुर असतात.
प्राध्यापक श्वॉब फक्त हा खटाटोप ‘का’ करतात हेच सर्वांना सांगतात. ते म्हणतात ः ‘‘मला जगाची परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व क्षेत्रांतल्या नेत्यांना एकत्र आणून विचारविनिमयाची प्रक्रिया घडवून आणायची आहे; म्हणून मी प्रयत्न करतो.’’ ‘काय’ करतो हे कधीही न बोलता ते संपूर्ण जगातल्या उद्योगपतींच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
***
गेल्या ६५ वर्षांत भारतात अनेक पंतप्रधान, शेकडो मंत्री व हजारो खासदार, आमदार, नगरसेवक होऊन गेले. कुणी एखादा सत्तेत असेल तेव्हा लोक त्याचे गुणगान गातात. त्याचं निधन झाल्यावर काही वर्षांनी लोक त्या नेत्याला विसरून जातात.
महात्मा गांधींना मात्र भारतातले व संपूर्ण जगातले लोक अजून विसरलेले नाहीत. गांधीजींनी मला ‘काय’ व्हायचं आहे, याबद्दल कधीच काही वाच्यता केली नाही, तर ‘भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळावं व अंत्योदय व्हावा म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत’ असंच ते म्हणत असत. थोडक्यात, ते जीवन ‘का’ जगतात हे महत्त्वाचं समजत होते. जीवनात ‘काय’ व्हायचं आहे, हे ते महत्त्वाचं मानत नसत.
महात्मा गांधी हे पंतप्रधान, मंत्री, खासदार, आमदार अथवा इतर ‘काय’ झाले नाहीत. ते संपूर्ण जगात अजरामर झाले.
***
मला ‘सकाळ’चे अनेक युवा वाचक पत्र पाठवतात. सर्वच जण म्हणतात ः ‘‘मला मोठा उद्योगपती व्हायची इच्छा आहे... ‘युनो’मध्ये अधिकारी होण्याची इच्छा आहे... मला राजकीय नेता व्हायचं आहे... तर मी कोणतं शिक्षण घेऊ? कोणत्या प्रकारची मेहनत घेऊ?’’
हे विद्यार्थी प्रामाणिक असतात. परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असते; पण ते ‘मला काय व्हायचं’ या प्रश्नातच गुरफटलेले असतात. मी त्यांना काही उत्तर देऊ शकत नाही. मी लहानपणापासून ‘काय’ व्हायचं, याचा विचारच केला नाही. परिणामी मी नेता, राजदूत, उद्योजक, संपादक, प्राध्यापक वगैरे ‘काय’ पण झालो नाही. कायम मी अस्तित्वात ‘का’ आहे अथवा मी अमुक अमुक गोष्ट ‘का’ केली पाहिजे, हा प्रश्न स्वतःला विचारत असतो.
अजूनही पूर्ण समाधान होईल, असं उत्तर मिळालेलं नाही; पण मी ‘का’ या प्रश्नाचा पाठपुरावा सोडलेला नाही.
युवकांनी ‘काय’च्या मागं लागण्यापेक्षा स्वतःला ‘का’ हा प्रश्न विचारला, तर त्यांना एक वेगळी दिशा सापडेल. स्टीव्ह जॉब्जना संगणकनिर्मिती करण्याची इच्छा नव्हती. धीरूभाई अंबानींना केवळ कापड तयार करण्याची इच्छा नव्हती. स्टीफन हॉकिंग यांना शास्त्रज्ञ बनण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. या सर्वांना प्रस्थापित समज व शक्ती भेदून समाजाला एक नवं वळण देण्याची इच्छा होती. ते स्वतःला ‘का’ हा प्रश्न विचारत राहिले. संगणक, ‘विमल’चं कापड आणि ब्लॅक होल हे निमित्त झालं. कदाचित स्टीव्ह जॉब्ज शास्त्रज्ञ झाले असते व स्टीफन हॉकिंग ‘ॲपल’चे संस्थापक झाले असते!
आपल्याला अनोळखी व्यक्तीलाही नेहमी ‘तुम्ही काय आहात?’ हा प्रश्न विचारायची घाई झालेली असते. मला विमानात शेजारी भारतीय प्रवासी भेटला, तर पहिल्या पाच मिनिटांत तो ‘‘वासलेकर म्हणजे मराठी आहात का?’’ अथवा ‘‘तुम्ही काय एखाद्या कंपनीचे अधिकारी आहात का?’’ असे प्रश्न विचारतो.
एकदा लंडनला जाताना माझ्यासमोर एक कुटुंब बसलं होतं. लहान मुलं पाहून मी त्यांना सामान विमानातून बाहेर नेण्यासाठी मदत केली. हे काम दोन मिनिटांत संपले. तीन-चार तासांनी मी लंडनच्या एका दुकानात काही वस्तू आणायला गेलो. तिथं त्या कुटुंबातला पुरुष भेटला. मला भेटल्याबरोबर तो म्हणाला ः ‘‘तुम्ही काय करता?’’ म्हणालो ः ‘‘मी खरेदी करतोय.’’ तो म्हणाला ः ‘‘तुम्ही व्यवसायानं काय आहात?’’ म्हणालो ः ‘‘त्या विक्रेत्याच्या दृष्टीनं मी एक खरेदीदार आहे व सध्या या दुकानात तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे.’’
ज्या युवकांना एका नवीन तंत्रज्ञानाला जन्म द्यायची जबरदस्त इच्छा आहे, ते संशोधन अथवा उद्योग यातला कोणताही मार्ग निवडतील. ते ‘ॲपल’ अथवा ‘स्काईप’सारख्या गोष्टीचे निर्माते म्हणून जगभर ओळखले जातील. ज्यांना मोठे श्रीमंत उद्योगपती व्हायचं आहे, ते एका स्पर्धेत धावत राहतील व कायमच इतर काही उद्योगपतींच्या मागं राहतील.
ज्यांना युनोचं अधिकारी व्हायचं आहे, ते नेहमी इकडं-तिकडं फोन करत राहतील. ज्यांना जगात शांतता आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ते युनो असो, रेडक्रॉस असो किंवा एखादी छोटी संस्था असो तिथून कार्य करून त्यांच्या कार्याच्या परिणामामुळं जगभर ओळखले जातील.
जे आयुष्यात ‘काय’ प्रश्नाचं उत्तर शोधतील, त्यांच्या मनात ‘आपण एक पोकळ आयुष्य जगलो,’ अशी भावना उतारवयात निर्माण होईल; पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. जे आयुष्यात ‘का’ या प्रश्नाचं उत्तर शोधत राहतील, ते अर्थपूर्ण जीवनप्रवासाचा अनुभव घेतील.

No comments:
Post a Comment