Wednesday, October 28, 2015

लबाडी-शास्त्रा’चं तत्त्वज्ञान; वास्तवात कोरडे पाषाण ! (संदीप वासलेकर)

आपण भारतीय मंडळी ‘लबाडी-शास्त्रा’त पारंगत झालो आहोत. त्या ‘लबाडी-शास्त्रा’ला ‘तात्त्विक मुलामा’ चढवण्यातही आपण तरबेज आहोत. मात्र हे तत्त्वज्ञान सांगत राहून आपण ‘कोरडे पाषाण’च राहणार, की आपल्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणून मूलभूत संशोधनात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार? खोटा अभिमान बाळगून आपण छाती फुगवणार, की खरं संशोधन करून इतरांना आपला अभिमान वाटावा असे दिवस देशाला आणणार? 

अलीकडं तीन मोठ्या घटना घडल्या. भारतातल्या वृत्तपत्रांनी त्यांची फारशी दखल घेतली नाही. एखाद्या वृत्तपत्रात आतल्या पानावर बातमी आली असेल, तर ती माझ्या नजरेस आली नाही.

पहिली घटना गुगल कंपनीत झाली. त्या कंपनीच्या एका विभागानं स्वतःला शिकवणारं सॉफ्टवेअर तयार केलं. आत्तापर्यंत सॉफ्टवेअर हे नेहमी त्यात केलेल्या प्रोग्रॅमिंगप्रमाणे चालत असे. म्हणजे एखाद्या संगणकाला बुद्धिबळ खेळायला शिकवलं, तर तो संगणक जगज्जेत्या खेळाडूवर मात करतो. एक संगणक अवकाशात जाणारं रॉकेट चालवतो. एक संगणक घर साफ करतो. मात्र, हे सर्व मानवानं जशी सॉफ्टवेअर्स बनवली असतील, त्यानुसार चालतं.

गुगलमधील शास्त्रज्ञांनी स्वतःला शिकवणारे व विचार करणारं सॉफ्टवेअर निर्माण करून मानवाला आव्हान दिलं आहे. हे सॉफ्टवेअर बसवलेला संगणक रात्री काही व्हिडिओंवर खेळायला सुरवात करतो, तेव्हा सुरवातीला हताश होतो. हळूहळू तो खेळ शिकतो व सकाळपर्यंत त्या खेळात तरबेज होतो.
या घटनेमुळं मानवाचं विज्ञानावरचं आधिपत्य संपुष्टात आले आहे. याचे अनेक विधायक व विघातक परिणाम होऊ शकतात. 
उदाहरणार्थ ः समजा सध्या आपण युद्धात एक क्षेपणास्त्र कराचीच्या दिशेनं सोडलं, तर ते कराचीलाच जाईल; पण स्वतःला शिकवणारं व विचार करणारं सॉफ्टवेअर त्यात असलं तर ते क्षेपणास्त्र कदाचित कराचीला जाणार नाही, तर त्याला योग्य वाटल्यास ते रावळपिंडी, बीजिंग अथवा दिल्लीवर जाऊन हल्ला करेल. त्या क्षेपणास्त्रानं काय करायचं, ते त्यातलं सॉफ्टवेअर ठरवेल. त्यावर हवाई दलाचं नियंत्रण राहणार नाही.

असं सॉफ्टवेअर जर शेअर बाजारात वापरलं, तर ते स्वतःच शेअर बाजाराचा चढ-उतार करेल व सर्व दलाल फक्त हसण्यापलीकडं किंवा रडण्यापलीकडं काही करू शकणार नाहीत.
यापलीकडं म्हणजे असं सॉफ्टवेअर स्वतःच शस्त्रास्त्रं निर्माण करू शकेल व त्यांचा जैविक क्रांतीत उपयोग केला तर ते मानवाच्या पेशीच्या आत जाऊन बदल घडवेल.
संपूर्ण मानवजीवन येत्या ३०-४० वर्षांत बदलवू शकणारी ही घटना आपल्या माध्यमांना महत्त्वाची वाटली नाही. असो.
   
बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात दुसरी एक घटना घडली. तिथल्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण विश्वाचा नकाशा करण्याचा प्रयत्न सुरू केला व त्यात त्यांना यश मिळण्यास प्रारंभ झाला. आइनस्टाइनच्या सिद्धान्ताप्रमाणे विश्व हे कायम पसरत जातं आणि त्याचबरोबर अवकाशही पसरत जातं. अवकाशात बहुतांश कृष्ण-पदार्थ, कृष्ण-ऊर्जा व कृष्णवलयं आहेत. हे सर्व असताना विश्‍वातल्या अब्जावधी आकाशगंगांची छायाचित्रं घेऊन नकाशा करायचा म्हणजे ते अशक्‍यच असणार; परंतु बर्कलेच्या शास्त्रज्ञांनी असा नकाशा प्रत्यक्षात आणण्यास सुरवात केल्याचं नुकतंच जाहीर झाल आहे.
  
अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी हे प्रयोग करत असताना तिसरी घटना स्कॉटलंडमध्ये घडली. तिथल्या शास्त्रज्ञांना प्रकाशाचा वेग कमी करण्यात यश मिळालं. वास्तविक आइनस्टाइनच्या सिद्धान्ताप्रमाणे प्रकाशाचा वेग हा कायम असतो; पण प्रथमच तो कमी करण्यात मानवाला यश मिळालं आहे.
  
या तीन घटना संपूर्ण विश्व, मानवी जीवन व शास्त्रीय नियम बदलू शकतात; परंतु इतरही अनेक प्रचंड महत्त्वाच्या घटना केवळ जानेवारी ते जून २०१५ या अर्धवर्षाच्या कालावधीत अमेरिका, युरोप, रशिया, इराण व चीन या ठिकाणी घडल्या. पृथ्वीतलावरचा प्रत्येक जीव - त्यात सर्व प्रकारचे पशू, पक्षी, मानव, कीटक वगैरे आले - समजून घेण्यासाठी प्रत्येक जिवातला डीएनए गोळा करणारी मोठी प्रयोगशाळा रशियातल्या एका विद्यापीठानं उघडली. ‘नासा’नं गुरूच्या एका उपग्रहावर व मंगळावरच्या जमिनीच्या खाली पाणी शोधले. इराणमधील रसायनशास्त्रज्ञांनी सोयाबीनपासून इंधन तयार केलं. इराणमधल्या इतर काही शास्त्रज्ञांनी केवळ नाकाबाहेर श्‍वास पाहून शरीरातली रक्तामधली साखर मोजण्याची पद्धत शोधून काढली. 

गेल्या सहा महिन्यांत त्या घटना घडल्या असताना मे महिन्यात ‘नेचर’ या शास्त्र विषयावरच्या मासिकानं भारतातल्या वैज्ञानिक संशोधनाचे प्रयत्न हे आफ्रिकेतल्या केनया व लॅटिन अमेरिकेतल्या चेने या देशांपेक्षादेखील कमी आहेत, असं जाहीर केलं.
आपण संशोधनात जगाच्या मागं राहूनही आपल्याला लज्जा का वाटत नाही? कारण, आपण अनेक प्रकारच्या लबाड्या करायला शिकलो आहोत!
आपली पहिली लबाडी म्हणजे, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीनं काही कामगिरी केली, तर ते भारताचं यश आहे, असं आपण जाहीर करतो व स्वतःची पाठ थोपटून घेतो. वास्तविक शोध व संशोधन हे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवस्था यांवर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वंशाशी त्याचा काहीही संबंध नसतो. भारतीय किंवा आफ्रिकी किंवा कोरियन शास्त्रज्ञानं अमेरिकेत अथवा युरोपमध्ये मोठं संशोधन केलं तर ते अमेरिका व युरोपमधल्या व्यवस्थेचं यश असतं; पण आपले नेते, प्रसारमाध्यमं व सर्वसामान्य लोकही परदेशातल्या भारतीय संशोधकांचं श्रेय लबाडीनं भारताला देतात. 
आपली दुसरी लबाडी म्हणजे, परदेशात एखादा शोध लागला असेल आणि त्याचीच पुनरावृत्ती कमी खर्चात एखाद्या भारतीय शास्त्रज्ञानं केली, तर आपण त्याला जणू काही मूलभूत शोध लावल्याचं श्रेय देतो. एखादा महासंगणक, एखादं लढाऊ विमान, एखादं औषध इथं कुणी भारताची गरज भागवण्यासाठी स्वस्तात निर्माण केलं, तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे; पण अशी निर्मिती म्हणजे मोठी वैज्ञानिक कामगिरी अथवा मूलभूत संशोधन आहे, असं म्हणणं म्हणजे लबाडी आहे किंवा भोंदूपणा आहे. जी कल्पना पृथ्वीतलावर कुणी मानवानं अद्याप प्रत्यक्षात आणली नाही, असं मूलभूत संशोधन केलं गेलं, तरच त्याला शोध म्हणायला हवं. बाकी सर्व काटकसरीची हुशारी, भोंदूपणा व लबाडी!

आपली तिसरी लबाडी म्हणजे, सुमारे दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेल्या मूलभूत शोधांचा आसरा घेऊन आजचे आपले वैज्ञानिक प्रयत्न किती महान आहेत, याचा आपण आव आणतो. शून्य, योग, बीजगणित असे आपण अनेक शोध लावले; परंतु हे सर्व २५ शतकांपूर्वी झालं. गेल्या २५-५० वर्षांत भारतात राहून, भारतीय प्रयोगशाळांत कार्य करून, संपूर्ण जगाला बदलवू शकणारे किती मूलभूत शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावले? आपल्या अकार्यक्षम सद्यस्थितीकडं दुर्लक्ष करून भूतकाळात केलेली कामगिरी मिरवत राहायचं हीसुद्धा एक लबाडीच आहे!

या तिहेरी लबाडीचा परिणाम असा झाला आहे, की आपण स्वतःचा मोठेपणा जाहीर करण्यात यशस्वी झालो आहोत; परंतु प्रत्यक्ष संशोधनात आंतरराष्ट्रीय अहवालानुसार आपण इराण, ब्राझील, केनया अशा देशांच्या खूप मागं राहिलेलो आहोत. अमेरिका, युरोप, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर, इस्राईल हे तर एवढ्या वरच्या पातळीवर पोचले आहेत, की आपण त्यांच्याकडं फक्त आता दुरूनच पाहू शकतो.

भारताने अणुऊर्जा, अवकाशशास्त्र व वैद्यकीय शास्त्रात खूप चांगली प्रगती केली आहे; परंतु मूलभूत  संशोधन काही केलेलं नाही. परदेशात झालेल्या संशोधनांत आपल्या गरजांनुसार बदल करून आपल्या विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षतेसाठी आपण ते संशोधन उपयोगात आणलं व या क्षेत्रांमध्ये चांगले उपक्रम राबवले आहेत. अणुभट्ट्या, क्षेपणास्त्रं, चांद्रयान, दक्षिण भारतातले काही वैद्यकीय प्रयोग ही उदाहरणं आपल्या क्षमतेचीच निदर्शक आहेत; परंतु त्यांचा संबंध मूलभूत विज्ञानाशी जोडला, तर आपली आपणच फसवणूक करू! या सर्व कार्यात लागणारी बरीचशी उपकरणं व उपकरणांचे भाग आपण आयात करत असतो, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

आपल्याकडं संशोधनाची स्थिती कशी आहे, हे पाहायचे असेल तर फार लांब जाण्याची गरज नाही. हल्लीच १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना काय करिअर करायचे आहे, म्हणून विचाराल तर बहुसंख्य विद्यार्थी इंजिनिअर, व्यवस्थापक, अकाउंटंट व्हायचं आहे, असं सांगतील किंवा मीडियात जायचं आहे असं सांगतील. संशोधन म्हणजे नक्की काय ते कळून त्यासाठी आयुष्य समर्पित करण्याचा विचार करणारा विद्यार्थी खूपच अपवादात्मक मिळेल. इतकंच काय तर बी. टेक. झालेले विद्यार्थिदेखील पुढं एमबीए करायचं आहे, ही महत्त्वाकांक्षा असल्याचं सांगतील.

यापलीकडं जाऊन पाहायचं असेल तर भारतातल्या उद्योगपतींना ते भारतात मूलभूत संशोधनासाठी किती गुंतवणूक करतात ते पुराव्यासह दाखवायला सांगा व जी रक्कम दिसेल त्याच्या किती पट रक्कम करमणुकीच्या विविध उपक्रमांत ते खर्च करतात ते पाहा. म्हणजे आपल्याकडचे धनाढ्य लोक कशाला प्राधान्य देतात ते कळेल. मात्र, जर अनेक कंपन्या, विद्यापीठं व संस्था यांना भेट दिली तर ‘ग्लोबल रीसर्च’ हे शब्द त्यांच्या नावात आढळतील. म्हणजे सवलतींसाठी व सरकारी योजनांचा फायदा करून घेण्यासाठी संशोधनाचं नाव घ्यायचं, वरवर काहीतरी करून परदेशात होणाऱ्या प्रयोगांचं थोडं अनुकरण करायचं; पण सर्व लक्ष क्रिकेटपटू विकत घेण्याकडं लावायचं, हा ढोंगीपणा की लबाडी, हे तुम्हीच ठरवा!

थोडक्‍यात, ‘लबाडी-शास्त्रा’त आपण पारंगत झालो आहोत आणि त्याचं तत्त्वज्ञान सांगून आपण ‘कोरडे पाषाण’ राहणार की आपल्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणून मूलभूत संशोधनात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार? खोटा अभिमान बाळगून आपण छाती फुगवणार, की खरं संशोधन करून इतरांना आपला अभिमान वाटावा असे दिवस देशाला आणणार? गुगलच्या शास्त्रज्ञांच्या चमूतले भारतीय शास्त्रज्ञ शोधून ‘मानवाला पराभूत करू शकणारं सॉफ्टवेअर आपलंच आहे,’ अशी बढाई मारणार, की विध्वंस न करता केवळ विधायक विचार करणारं सॉफ्टवेअर आपण निर्माण करणार?

No comments: