Friday, October 9, 2015

जगाला हादरवणारे युवक (संदीप वासलेकर)

जगाला हादरवणारे युवक (संदीप वासलेकर)
- संदीप वासलेकर sonali.navangul@gmail.com
रविवार, 18 जानेवारी 2015 - 01:30 AM IST

नवयुवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. मुंबई, पुणे, नाशिक इथल्या उच्च माध्यमिक शाळांतले विद्यार्थी केवळ पार्ट्या करणं, परदेशी शिक्षण घेण्यासाठी ‘सॅट’ची परीक्षा देणं, व्हॉट्‌सॲपवर दिवस घालवणं व वडिलांचा व्यवसाय चालवण्याचं १५-१६ व्या वर्षी ठरवणं, असं मोठ्या प्रमाणावर करत असले, तरी बाहेरच्या जगात मात्र त्याच वेळी वेगळंच काही घडत आहे...

दशावतारात एक प्रसिद्ध संवाद आहे. अनेक वर प्राप्त करून घेऊन स्वतःला अजिंक्‍य करणाऱ्या हिरण्यकश्‍यपूला देव सांगतात, ‘‘तुझा मृत्यू करेल ती शक्ती मनुष्य नसेल अथवा पशू. घराच्या आत नसेल अथवा बाहेर. त्या वेळी दिवस नसेल अथवा रात्र.’’

येत्या काही वर्षांत संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या घटना घडतील व जग हलवणाऱ्या या व्यक्ती राष्ट्राध्यक्ष नसतील...सरसेनापती नसतील... दहशतवादीही नसतील... त्या व्यक्ती जगात जेव्हा उलथापालथ करतील, तेव्हा दिवस नसेल अथवा रात्र. ज्या ठिकाणाहून त्या व्यक्ती जग हादरवतील ते ठिकाण युद्धस्थळ नसेल अथवा एखाद्या सैन्याची ‘वॉररूम’ही नसेल. इतकंच काय, तर तिथं डोंगर अथवा जंगलंही नसतील.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सध्या भयंकर काळजीत आहेत. अमेरिकेनंतर सध्या चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा शक्तिमान असा देश झाला आहे. केवळ लष्करी व आर्थिक सामर्थ्याची परिमाणं लावून नव्हे, तर चिनी विचारसरणीही अनेक देशांत पसरत आहे.
‘चीनप्रमाणे कणखर नेतृत्त्व असलं, तरच आर्थिक विकास होऊ शकतो,’ हा विचार जगाच्या अनेक देशांत बळकट होत चालला आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचं नेतृत्व लोकांना हवेसं वाटू लागले आहे. हा चीनचा जागतिक पातळीवरचा वैचारिक विजय आहे.

जोशुआ वाँग ः महाकाय चीनच्या नेत्यांना अमेरिकेची अथवा रशियाची भीती वाटत नसून, या विद्यार्थी -नेत्यानं त्यांना सध्या घाबरवून सोडलं आहे!

अशा या महाकाय चीनच्या नेत्यांना अमेरिकेची अथवा रशियाची भीती वाटत नाही, तर त्यांना घाबरवून टाकलं आहे जोशुआ वाँग यानं.
जोशुआ सध्या १७ वर्षांचा शालेय विद्यार्थी आहे. तो केवळ १५ वर्षांचा असताना एक प्रसंग घडला. चिनी राज्यकर्त्यांनी आधुनिक शिक्षणाचे विषय कमी करून त्यांच्या राजकीय सोईचे व विद्यार्थ्यांचं देशप्रेम वाढविण्यासाठी संकुचित राष्ट्राभिमानाचा पुरस्कार करणारं शिक्षण द्यायचं ठरवलं. विद्यार्थ्यांचं लहानपणापासूनच ‘ब्रेन वॉशिंग’ करायचं, हा उद्देश त्यामागं होता. १७ वर्षांच्या जोशुआला वाटलं, की असलं शिक्षण घेतलं तर आपल्याला आधुनिक अर्थव्यवस्थेत किंमतच राहणार नाही.
एके दिवशी पहाटे उठून जोशुआनं काहीही साधन नसताना सोशल मीडियाद्वारे १४ ते १६ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचं आंदोलन पुकारलं. हाँगकाँगच्या रस्त्यावर १४-१५ वर्षांची सुमारे एक लाख मुलं-मुली उतरली. त्यांनी शांततापूर्ण मार्गानं रस्त्यारस्त्यावर निदर्शनं केली व रस्ते बंद केले. हाँगकाँगची अर्थव्यवस्था ढासळायला लागली.

चिनी राज्यकर्ते हतबल झाले. १४-१५ वर्षांच्या मुलांवर गोळीबार केला, तर जगभर नाचक्की होईल व ‘युनो’मध्ये चीनची कोंडी होईल, अशी भीती होती. त्यांना काहीच मार्ग दिसेना. मुलं कोणत्याही आमिषाला बळी पडायला तयार नव्हती. अखेरीस शी जिनपिंग यांनी माघार घेतली. राष्ट्रप्रेमाच्या नावानं विद्यार्थ्यांना भूतकाळात ढकलणारे विषय मागं घेतले व शिक्षणपद्धतीत ढवळाढवळ न करण्याचं आश्‍वासन दिलं.
ते प्रकरण तिथंच संपलं. नंतर शी जिनपिंग यांनी सर्व सत्ता एकहाती केंद्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले. पक्षांतर्गत विरोधकांना बाहेर फेकलं अथवा खाली मान घालून आपलं वर्चस्व मानण्यास भाग पाडलं. सर्वांवर त्यांचा दरारा बसला. मग त्यांनी विविध राज्यांत स्वतःच्या मनानं मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा घाट घातला.

गेल्या वर्षी याच तऱ्हेनं त्यांनी हाँगकाँगवर स्वतःचा मुख्यमंत्री लादण्याचं ठरवलं. आता जोशुआ १७ वर्षांचा झाला होता. त्यानं पुन्हा एकदा ‘बालकसेना’ रस्त्यावर आणली. हाँगकाँगमधले कॉज वे बे, सेंट्रल व ॲडमिरॅलिटी अशा मोक्‍याच्या जागांवर लाखो विद्यार्थी आले व त्यांनी नाकेबंदी केली. हाँगकाँगमधले सारे व्यवहार ठप्प झाले.

आता याचा परिणाम चीनच्या बाहेर होऊ लागला. तैवानामध्ये चीनविरुद्धचा प्रक्षोभ वाढला व चीनचे प्रखर विरोधक निवडून आले. आशियातल्या इतर देशांत चिनी वैचारिक पद्धतीला तडा गेला. केवळ आर्थिक विकास करण्यासाठी हुकूमशाहीला मोकळं रान देणाऱ्या चिनी पद्धतीला विरोध होऊ लागला. आर्थिक विकास झाला पाहिजे; पण देशाचं भवितव्य एका पक्षाच्या हातात सुपूर्द करून शी जिनपिंगसारख्या नेत्याला सर्वाधिकार देण्यात धोका आहे, हा विचार म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम इथं पसरू लागला.
जिनपिग व चिनी नेतृत्वाचं धाबं दणाणलं; पण ते लहान मुलांच्या फौजेविरुद्ध काहीच करू शकत नव्हते. एके दिवशी जोशुआ स्वतःच आपल्या मित्रांसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेला व आपल्या अटकेची मागणी करू लागला. त्याला अटक केली तर दोन-तीन लाख युवक स्वतःच्या अटकेची शांततापूर्ण मागणी करतील, अशी भीती राज्यकर्त्यांना वाटली.
अखेर ख्रिसमसच्या काही दिवस आधी पोलिसांनी आंदोलन चिरडून काढलं. जोशुआ व त्याचे मित्र शाळेत जाऊन अभ्यास करायला लागले. शी जिनपिंग यांनी आपल्या निवडीचा मुख्यमंत्री हाँगकाँगवर लादला; पण अनेक जाणकारांना वाटतं, की शी जीनपिंग यांनी जोशुआची धास्ती घेतली आहे. २०१५ मध्ये तो काय करेल व चीनची राजकीय व्यवस्था, आर्थिक नाड्या आणि जगातलं स्थान याबाबत काय स्थिती करेल, हे भाकीत करणं कठीण आहे. येत्या दोन-तीन वर्षांत साऱ्या जगाचं लक्ष जोशुआकडं असणार आहे.

******
थियागो ओल्सन या १७ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यानं शांतपणे व गुप्तपणे आपल्या घराच्या बेसमेंटमध्ये असताना संकरण पद्धतीचं अण्वस्त्र बनवलं. जगातली सगळी सद्यः अणुशक्ती अणूंचं विघटन करून होते. अणुमीलन करून ऊर्जा निर्माण करण्यासाठी जगातले प्रमुख शास्त्रज्ञ एकत्र प्रयोग करत आहेत. त्यांच्यावर अब्जावधी डॉलरचा खर्च होत आहे.
पण आठ वर्षांपूर्वी थियागोनं अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातल्या एका छोट्याशा खेड्यात आपल्या घरीच प्रयोग करून अणुमीलन करणारं उपकरण बनवलं. त्यासाठी त्याने ४० हजार व्होल्ट वीज वापरली.
चीन व अमेरिकेत हा फरक, की थियागोचे प्रताप उघडकीला आल्यावर, अवैध प्रयोग केल्याबद्दल अमेरिकी राज्यकर्त्यांनी घाबरून जाऊन त्याच्यावर खटला भरला नाही. उलट, त्याला शिष्यवृत्ती देऊन प्रिन्स्टन विद्यापीठात त्याच्या उच्चशिक्षणाची सोय केली. नंतर तरुण वयातच अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात त्याला मोठी नोकरी दिली. इतकंच नव्हे, तर अवकाशातल्या एका ग्रहाला थियागो ओल्सन हे नाव देऊन त्याला सन्मानित केलं.
थियागोचा आता जरी अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेत समावेश झालेला असला, तरी त्याच्यासारखे युवक घरात बसून वैज्ञानिक प्रयोग करून जग हादरवतील, याची धास्ती अमेरिकेतल्या राज्यकर्त्यांना वाटते.
१७ वर्षांच्या जोनाथन जेम्सनं ही भीती खरी करून दाखवली. अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचा सर्वांत महत्त्वाचा विभाग विश्‍वसंहारक अस्त्रांसंबंधी काम करतो. जोनाथननं शाळेतला अभ्यास करताना याच विभागात हॅकिंग करून प्रवेश मिळवला व अण्वस्त्रं व जैविक अस्त्रांसंबंधी नाजूक माहिती मिळवली. त्याला सरकारनं पकडलं व शिक्षा दिली.

थियागो, जोनाथन ही उघडकीस आलेली उदाहरणं आहेत; पण घरात बसून संहारक अस्त्रं निर्माण करणं अथवा संरक्षण व्यवस्थेत हॅकिंग करून पेंटॅगॉनला शह देणं, हा शालेय मुलांचा खेळ झाला आहे. अशाच एखाद्या विद्यार्थ्यानं ठरवले तर तो महासंहारक अस्त्रांचा वापर घराच्या बेसमेंटमधून करू शकेल. त्यासाठी त्याला युद्धस्थळ अथवा दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या डोंगराळ भागात जाण्याची गरज भासणार नाही.
लहान वयात अभूतपूर्व कार्य केलेल्या अनेक व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. येहुदी मेनुहिन यांनी जाहीर कार्यक्रमात जेव्हा
प्रथम व्हायोलिनवादन केलं, तेव्हा त्यांचं वय केवळ सात वर्षं होतं, तर मोझार्टचा पहिल्या ऑपेरा त्याच्या केवळ १४व्या वर्षी निर्माण झाला. अंधांना वाचायला उपयोगी पडेल असं ब्रेलतंत्र लुई ब्रेल यांनी वयाच्या केवळ १५व्या वर्षी विकसित केलं होतं.

अलीकडच्या काळात मात्र युवकांमधली क्षमता प्रामुख्यानं दहशतवादी गट ओळखतात व त्यांचा वापर करतात. अल्‌ कायदा, आयसिस, युगांडामधली लॉर्डस रेझिटन्स आर्मी, श्रीलंकेत आता नामशेष झालेली ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम’ (LTTE) या सर्व गटांचं तंत्र १५-१६ वर्षांच्या मुलांना दहशतवादी प्रवाहाकडं आकर्षित करण्यावर आधारलेलं आहे. ‘लिबरेशन टायगर्स’कडं तर १३-१४ वर्षांच्या मुलींची फौज असे. त्या फ्रॉकमध्ये बाँब लपवत असत व श्रीलंकेचं सैन्य आलं की त्यांच्यावर फेकत असत.

नवयुवकांमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे. मुंबई, पुणे, नाशिक इथल्या उच्च माध्यमिक शाळांतले विद्यार्थी केवळ पार्ट्या करणं, परदेशी शिक्षण घेण्यासाठी ‘सॅट’ची परीक्षा देणं, व्हॉट्‌सॲपवर दिवस घालवणं व वडिलांचा व्यवसाय चालवण्याचं १५-१६ व्या वर्षी ठरवणं, असं मोठ्या प्रमाणावर करत असतील, तरी बाहेरच्या जगात मात्र त्याच वेळी वेगळंच काही घडत आहे...

जोशुआ, थियागो यांच्यासारखे अनेक विद्यार्थी संपूर्ण जगाला कलाटणी देण्याचं कार्य करण्याच्या तयारीत आहेत. ते येत्या काही वर्षांत जगाला कशाप्रकारे हादरवतील, ते काही सांगता येत नाही. जोशुआ व थियागो यांनी आपली कामगिरी पहाटे केली...तेव्हा दिवस नव्हता अथवा रात्र, युद्धस्थळ नव्हतं अथवा दहशतवाद्यांचं ते गुप्त स्थानही नव्हते. यापुढंही त्याच्यासारखे युवक आपल्याला अंदाज करता येणार नाही, असं स्थान व वेळ निवडतील व संपूर्ण जगाला हादरवून टाकतील...!

No comments: