Friday, October 9, 2015

सीरियातील यादवीला दाहक शीतयुद्धाची किनार

सीरियातील यादवीला दाहक शीतयुद्धाची किनार
- डॉ. अशोक मोडक
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 - 12:00 AM IST

Tags: isissyriarussiaterrorglobalasia,
"इस्लामिक स्टेट‘ला ताळ्यावर आणण्यासाठी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी रशियाची भूमिका आहे. तेव्हा अमेरिकेने रशियाचा पारंपरिक द्वेष बाजूला ठेवून रशियाच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे.

मार्च 2011 पासून म्हणजे गेली साडेचार वर्षे सीरियातली यादवी जागतिक चिंतेचा विषय ठरली आहे. कारण या काळात अडीच लाख नागरिक मरण पावले आहेत. सव्वा कोटी लोक निर्वासित झाले आहेत. (सीरियाची लोकसंख्या 2 कोटी 30 लाख, म्हणजे निम्मी लोकसंख्या निवाराहीन झाली आहे.) पैकी 40 लाख लोक युरोपमध्ये आसरा मागताहेत. या यादवीचे काही विशेष पैलू सगळ्यांच्या लक्षात आले आहेत. एक तर जे असद घराणे गेली 45 वर्षे सीरियाच्या सत्तास्थानी विराजमान आहे. त्याच घराण्याच्या राजपुत्राच्या म्हणजे बशर अल्‌ असद यांच्या विरोधात रान पेटले आहे. हे असद घराणे अलावी या शिया पंथाची एक फळी आहे, तर सीरियातले बहुसंख्य नागरिक सुन्नी पंथाचे आहेत. तात्पर्य या यादवीला पंथयुद्धाची असलेली किनार हा या घडामोडींचा दुसरा पैलू आहे. सुन्नी बहुसंख्याकांना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्कस्थान या देशांप्रमाणेच अमेरिका, इस्राईल आदी देशांनीही सर्व ते बळ पुरविले आहे; तर बशर अल्‌ असद यांची पाठराखण करण्यासाठी रशिया, चीन, इराण, इराक अशा देशांनी पुढाकार घेतला आहे - हा झाला या घटनाचक्राचा तिसरा पैलू! प्रत्यक्षात गेल्या आठवड्यापासून रशियाने बशर अल्‌ असद यांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या "इस्लामिक स्टेट‘ला चिरडून टाकण्यासाठी बॉंबफेकी लढाऊ विमाने सीरियाकडे रवाना केली आहेत व त्यांनी तिथे हवाई हल्ले करून या घडामोडींना अधिक रक्तबंबाळ केले आहे. अमेरिका, ब्रिटन या देशांनी रशियाचा कडाडून निषेध केला आहे. सारांश, मॉस्को विरुद्ध वॉशिंग्टन यांच्यातले दाहक शीतयुद्ध हा आहे. या घटनाचक्राचा चौथा पैलू! वर्तमानात हाच पैलू केंद्रस्थानी झळकत आहे.
मॉस्कोने 1979 मध्ये अफगाणिस्तानवर लष्करी चढाई केली, आता 36 वर्षे उलटल्यावर मॉस्कोने सुदूर भूमध्य समुद्रात पाय सोडून बसलेल्या सीरियावर लष्करी कारवाई केली आहे. 1991 मध्ये सोव्हिएत महासंघ कोसळला व इतर चौदा देशांबरोबर रशियाही स्वतंत्र - सार्वभौम झाला. त्यानंतर किमान दोन वर्षे मॉस्कोने वॉशिंग्टनवर जिवापाड प्रेम केले, मार्क्‍सवादाला सोडचिठ्ठी देऊन भांडवलशाही स्वीकारली, कम्युनिस्ट पार्टीचे एकपक्षीय राजतंत्र लाथाडून बहुपक्षीय प्रजातंत्र आत्मसात केले. सोव्हिएत प्रतिमान त्याज्य ठरविले आणि रशियन भावविश्व शिरोधार्य मानले. या अशा धोरणांमुळे युरो अमेरिकन्स्‌ खूष होतील व आपल्या नव्या वाटचालीला सर्व ते सहकार्य देतील, ही खुळी समजूत बाळगून नवे रशियन राज्यकर्ते खास करून अमेरिकेची पूजाअर्चा करू लागले. पण अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सर्व भांडवलशाही देश रशियाच्या प्रभाव क्षेत्रावरच कुरघोडी करू लागले. रशियाला अधिकाधिक दुर्बल करायचे हेच अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. हे रशियाला कळून चुकले, तेव्हा 1993 मध्ये रशियाने काहीसा आक्रमक पवित्रा पत्करला व भूतपूर्व सोव्हिएत महासंघाची भूमी म्हणजे रशियाची वर्चस्व भूमी आहे, तिथे अमेरिकेने कुरघोडी करू नये, हे ठणकावून सांगितले. नंतरच्या पंधरा वर्षांत रशियाने आपले म्हणणे खरे करून दाखवले. 2008 मध्ये रशियाने जॉर्जियाचा रणक्षेत्रात दारुण पराभव केला... हे सर्व आज आठवते, कारण सीरियावर लष्करी कारवाई करून रशियाने भूमध्य समुद्रात वसलेल्या भूभागावरही आपले वर्चस्व आहे, हे दर्शविले आहे. गेल्या बावीस वर्षांत (1993 ते 2015) मस्क्वा नदीतून केवढे पाणी वाहून गेले आहे!
अमेरिका व अवघा "नाटो‘गट या पृष्ठभूमीवर बेचैन झाला तर त्यात आश्‍चर्य कसले? रशियाची भूमिका रास्त आहे. सीरियात बशर अल्‌ असद यांना सत्तेवरून खाली उतरविण्यासाठी तकफिरी, सलाफी टोळ्या शिया पंथियांना व सर्वच बिगर सुन्नी मंडळींना हालहाल करून ठार मारत आहेत. जगभर खिलाफत साम्राज्य उभे करण्याची त्यांची इच्छा आहे. "इस्लामिक स्टेट ऑफ इराक व सीरिया‘ या सघटनेच्या झेंड्याखाली सारे बशर विरोधक एकवटले आहेत. तेव्हा या क्रूर, रानटी टोळ्यांचा प्रथम खातमा करा, ही रशियाची भूमिका आहे, तर बशर यांना प्रथम खुर्चीवरून खाली उतरवा, हा अमेरिकेचा हट्ट आहे. आज सीरियात बशर विरोधक बशर यांच्याप्रमाणे पुतीन हेही आमचे दुश्‍मन आहेत, असे नारे देत आहेत, तर रशियाची तळी उचलण्यासाठी इराण व इराक हे देश सरसावले आहेत.
लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट ही, की बशर अल्‌ असद यांनी 23 जून 2014 या दिवशी अध्यक्षीय निवडणुकीत 89 टक्के मते मिळविली. पहिल्यांदाच दोन स्पर्धकांना पराभूत केले. म्हणजे सुन्नी पथियांकडूनही स्वतःच्या विजयावर शिक्कामोर्तब प्राप्त केले. आज बशर अल्‌ असद यांच्या सेनेत व कारभारात अनेक सुन्नी सहभागी झाले आहेत. बशर यांची पत्नी सुन्नी पंथीय आहे. हाच खरे म्हणजे चमत्कार आहे. तात्पर्य, हटवादी, पंथवेड्या "इस्लामिक स्टेट‘ला ताळ्यावर आणण्यासाठी बशर यांना पाठिंबा दिला पाहिजे ही आहे रशियाची भूमिका. अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 ला "अल्‌ कायदा‘ने हल्ला केला, तेव्हा पुतिन यांनी अमेरिकेला सर्वतोपरी साह्य देऊ केले, आता अमेरिकेने रशियाचा पारंपरिक द्वेष बाजूला ठेवून रशियाच्या भूमिकेचे समर्थन करावे, जगातल्या पंथवेड्या, हिंसक दहशतवादाला नष्ट करावे, यांवर मतैक्‍य निर्माण व्हावे हीच अपेक्षा आहे. 

No comments: