Wednesday, October 28, 2015

आपण घड्याळ का वापरतो? (संदीप वासलेकर)

कोणतीही कृती न करता एक सेकंद वाया गेला आणि फक्त एक सेकंद फुकट गेला, अशी जर मानसिकता झाली, तर कळत-नकळत वर्षं निघून जातात, सगळी समीकरणं बदलतात. भारतापुढील आणि संपूर्ण जगापुढील आव्हानं खूप मोठी आहेत, गुंतागुंतीची आहेत. त्यावर मात करून जटिल प्रश्‍नांची उत्तरं शोधायची असतील तर एकच मार्ग आहे. आपल्या घड्याळातला एक तास नव्हे, एक मिनिट नव्हे, तर एक सेकंद हा किती मोठा कालावधी आहे, याची आपल्या सगळ्यांना जाणीव व्हायला हवी.

सुमारे ७-८ वर्षांपूर्वी स्पेन, नॉर्वे, स्वीडन व युरोपियन समुदाय यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एकत्र येऊन पश्‍चिम आशियातल्या नेत्यांची गोलमेज परिषद बोलावली होती. त्यास संयुक्त राष्ट्रसंघ, इंटरनॅशनल क्राइसिस ग्रुप व स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप यांनाही आमंत्रित केलं होतं, त्यामुळं मीही तिथं उपस्थित होतो.

माद्रीदमध्ये झालेल्या बैठकीत सक्त पोलिस पहारा होता, वातावरण गंभीर होतं; परंतु स्पेनचे परराष्ट्रमंत्री मिगेल मोरातीनोस यांनी वातावरणात हलकेपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मनगटावर बांधायचं एक घड्याळ भेट दिलं व स्वागत करून म्हणाले, ‘‘मला पश्‍चिम आशियातल्या समस्यांवर काहीच बोलायचं नाही, प्रश्‍न काय आहेत व उत्तरं काय आहेत, हे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. आपण जर उत्तरं स्वीकारून त्वरित अमलात आणली नाहीत, तर वेळ निघून जाईल. तसं झालं तर उत्तरं निष्प्रभ ठरतील व काही काळानं प्रश्‍नही बदलतील.’’

मोरातिनोस नंतर म्हणाले, ‘‘आपण घड्याळात पाहिलं व एक सेकंदाचा काटा जर कृती न करता तसाच पुढं सरकू दिला, तर आपल्याला वाटतं, की फक्त एक सेकंद फुकट गेला; पण एकदा जर तशी मानसिकता झाली, तर आपल्याला एक सेकंद, एक मिनीट, एक तास वाया गेल्याचं दुःख वाटत नाही. हळूहळू एक दिवस अथवा एक वर्ष वाया गेलं तरी वाईट वाटत नाही. मग, कळत- नकळत अनेक वर्षं निघून जातात व सर्व समीकरणं बदलतात.’’

मोरातिनोस यांचे उद्‌गार भविष्यवाणी ठरले. त्यावेळेस परिस्थिती अशी होती, की इस्राईल - पॅलेस्टाईन, सीरिया, लेबेनॉन आदी सर्व प्रश्‍न सहज सुटू शकत होते. काय करायला हवं हे त्यांना चांगलं माहिती होतं. यातल्या काही वाटाघाटीत माझा प्रत्यक्ष भाग होता, त्यामुळं इस्राईल, पॅलेस्टाईन, सीरिया, लेबेनॉन व तुर्कस्तान हे देश शांतता प्रस्थापित करण्याच्या किती जवळ आले होते, याची मला जाणीव होती. परंतु, सर्व काही समजूनदेखील प्रत्यक्षात कृती कोणी केली नाही.

आता पश्‍चिम आशियात सर्वच काही बदललं आहे. सीरिया व इराकमध्ये ‘इसिस’चा प्रभाव वाढल्यानं जॉर्डन, लेबेनॉन व भोवतालच्या देशांनी सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त निर्वासितांना आसरा दिला आहे. काही हजार निर्वासित युरोपकडं निघाले आहेत. अर्थात, इंग्रजी प्रसारमाध्यमं युरोपमधल्या काही हजार निर्वासितांबद्दल लिहितात; परंतु जॉर्डन, लेबेनॉन, तुर्कस्तान व इराकमधल्या ५० लाखांपेक्षा जास्त असलेल्या निर्वासितांबद्दल एक ओळही लिहीत नाहीत. सीरियाचे अध्यक्ष बशार अल असाद यांना समर्थन देण्यासाठी रशियाचं सैन्य दमास्कसमध्ये उतरलं आहे. इराणचा प्रभाव वाढला आहे व इराणच्या अणुकरारामुळं इस्राईलचं वजन खूप कमी झालं आहे. परिणामी, कमकुवत झालेला इस्राईल आता भारत व चीनशी मैत्री करू पहात आहे. थोडक्‍यात, सर्वच गणितं बदलली आहेत; पण हा गोंधळ, मनुष्यहानी, दहशतवाद का वाढला? जेव्हा ५-६ वर्षांपूर्वी संधी होती, तेव्हा तह करण्याऐवजी पश्‍चिम आशियातल्या सर्वच देशांनी वेळ दवडला. म्हणून मोरातिनोस यांच्या शब्दांत सांगायचं म्हणजे नेतेमंडळी आपण घड्याळ का वापरतो, हेच विसरून गेली आहेत.
जे पश्‍चिम आशियात झालं ते कुठंही होऊ शकतं. आपल्याला ते शिकण्यासाठी स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचं भाषण ऐकण्याची काही जरूरी नाही. सुमारे ६०० वर्षांपूर्वी कबीरानं आपल्याला सांगितलं होतं.
‘कल करे सो आज कर, आज करे सो अब
पलमें परलै होयगी, बहुरी करेगा कब?’
आपल्याकडं पूल, रस्ते, मेट्रोची लाइन बांधण्यासाठी वर्षानुवर्षं का लागतात? रस्ते स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधानांच्या पातळीवर आवाहन करूनही सर्वत्र कचरा व घाण का दिसते? छोट्या उद्योजकांच्या भोवतालचे सरकारी अधिकाऱ्यांचे विळखे एका रात्रीत का जात नाहीत?
मी सरकारी अधिकाऱ्यांना याबद्दल विचारलं तर त्यांची उत्तरं ठराविक असतात. ‘‘अहो, तुम्हाला लिहिणं सोपं आहे; पण हे प्रत्यक्षात करण्यात खूप अडचणी येतात. त्यामुळं आपल्याला एक रस्ता बांधण्यासाठी देखील अनेक वर्षं लागतात, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे.’’
त्यावर माझा प्रश्‍न, ‘‘पण त्या अडचणी अख्ख्या जगात तुम्हालाच का येतात? मलेशिया, सिंगापूर, कोरिया इतकंच काय, तर आफ्रिकेतल्या रवांडा, सेनेगाल या देशांत का येत नाहीत?’’
सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तर, ‘‘तिथं लोकसंख्या कमी आहे.’’ माझा प्रश्‍न, ‘‘चीनमध्ये का अडचणी येत नाहीत?’’
त्यांचं उत्तर, ‘‘तिथं हुकूमशाही आहे.’’ माझा प्रश्‍न, ‘‘जपानमध्ये लोकशाही आहे. दर मैलाची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे. मग, तिथं का अडचणी येत नाहीत?’’
सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तर, ‘‘जपानमध्ये एकजिनसी समाज आहे.’’
माझा प्रश्‍न, ‘‘अहो, बाकीचे देश विसरा. सुमारे २० वर्षांपूर्वी सुरतमध्ये प्लेग झाला होता. नंतर तेथील मुख्य अधिकारी राव यांच्या प्रयत्नानं संपूर्ण शहर काही दिवसांत स्वच्छ झालं. अनधिकृत बांधकामं तोडली गेली. असे भारतात अनेक प्रयोग झाले आहेत.’’
अधिकाऱ्यांचं उत्तर, ‘‘तो भूतकाळ होता, सध्या भारतात खूप मोठी आव्हानं आहेत.’’
अशा अनेक चर्चांनंतर माझं अनुमान असं आहे, की आपले अनेक अधिकारी कारणं दाखविण्यात तरबेज आहेत किंवा ते हाताला घड्याळच लावत नाहीत व त्यांच्या ऑफिसमधल्या कॅलेंडरमध्ये फक्त सुट्ट्यांचे दिवस असतात. बाकी कॅलेंडर कोरं असावं असं वाटतं.
अर्थात, सर्वच अधिकारी असे नसतात. प्रशासकीय सेवा, पोलिस, महसूल खाते या ठिकाणी काम करणारे अनेक कार्यक्षम अधिकारी मला माहीत आहेत. त्यांची देशाबद्दलची तळमळ प्रामाणिक असते; परंतु काही ठराविक राजकीय नेते व अकार्यक्षम अधिकारी यांनी अशी व्यवस्था निर्माण केली आहे, की बिचाऱ्या प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या मार्गात अनेक अडथळे येतात.

भारतापुढील व खरं तर संपूर्ण जगापुढील, आव्हानं खूप मोठी आहेत, गुंतागुंतीची आहेत, किचकटही आहेत. त्यावर मात करून जटिल प्रश्‍नांना उत्तरं द्यायची असतील व अंमलात आणायची असतील तर एकच मार्ग आहे. आपल्या घड्याळातला एक तास नव्हे, एक मिनीट नव्हे, तर एक सेकंद हा किती मोठा कालावधी आहे, याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे.

एक मिनीट केवढं मोठं असतं, याचा अनुभव मला काही महिन्यांपूर्वी आला. मी २५ एप्रिलला जिथं होतो, तिथं अचानक अख्खी इमारत हलू लागली. सुमारे १-२ मिनिटांनी हादरण्याची थांबली. त्या १-२ मिनिटांत नेपाळची अर्थव्यवस्था, इतिहास, जनता यांची पूर्ण वाट लागली. १ ते २ मिनिटांचा तो अवधी होता. म्हणून १-२ मिनिटांच्या कालावधीस ‘फक्त’ म्हणून चालत नाही. घड्याळाचा काटा जेव्हा मार्गक्रमण करत असतो, तेव्हा १-२ मिनिटं पूर्ण करण्यासाठी सेकंद काट्याच्या १०० पेक्षा जास्त फेऱ्या होतात. प्रत्येक क्षणी तो काटा पुढे सरकत असतो. आपण परत न येणारा क्षण हरवून जात असतो.

एकदा ‘सकाळ’ समूहानं ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चा उद्‌घाटन समारंभ मुंबईत भरवला होता, त्याप्रसंगी मी, अभिजित पवार व सुधीर गाडगीळ अशा तिघांनी महाराष्ट्रातून आलेल्या युवक- युवतींशी संवाद साधला. तिथं उपस्थित असलेल्या एका विद्यार्थिनीनं हात वर करून प्रश्‍न विचारला, ‘‘सर, वेळेचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं असतं?’’

अनेकदा उत्तरापेक्षा प्रश्‍न जास्त महत्त्वाचा असतो. हा तसाच एक प्रश्‍न होता. जेव्हा भारतातील प्रत्येक विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, नेते आणि अन्य सगळ्यांना या प्रश्‍नाचं महत्त्व अतिशय सखोलपणानं समजेल, तेव्हाच भारताचा उत्कर्ष होण्यास सुरवात होईल.

No comments: